व्यष्टी भाव असूनही समष्टी भाव नसल्याने गुरुकृपेस अपात्र ठरणारे साधक !
‘काही साधकांमध्ये गुरु किंवा ईश्वर यांच्याप्रती व्यष्टी भाव असतो; पण समष्टी भाव तेवढा नसतो. ‘समष्टी गुरुकार्य तळमळीने करणे’, हे समष्टी भाव असण्याचे प्रमुख लक्षण आहे. साधकांमध्ये समष्टी भाव नसल्याचे दर्शवणारी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
१. ‘चुका होतील’, या भीतीपोटी गुरुकार्याचे दायित्व न घेणे
२. गुरुकार्याचे दायित्व घेतांना स्वतःला सोप्या वाटतील तेवढ्याच सेवांचे दायित्व घेऊन कठीण वाटतील अशा सेवांचे दायित्व न स्वीकारणे
३. ज्या सेवांमध्ये इतर साधकांशी जुळवून घेण्याचा भाग अधिक असतो, अशा सेवा जितक्या टाळता येतील तितक्या टाळणे
४. सेवा करतांना ‘स्वतःला अल्प शारीरिक आणि बौद्धिक श्रम पडावेत’, यासाठी इतरांचे साहाय्य मागणे
५. सेवा स्वतः पूर्ण करणे अपेक्षित असतांना ती चतुराईने इतरांवर ढकलणे
६. ‘आपण सेवेचे दायित्व न घेण्यामुळे अन्य साधकांवर सेवांचा अधिक भार पडेल’, हे ठाऊक असतांनाही त्याचा विचार न करणे
७. गुरुकार्यापेक्षा स्वतःच्या व्यावहारिक गोष्टींना अधिक महत्त्व देणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी शिकवलेल्या गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये व्यष्टी साधनेला ३० टक्के, तर समष्टी साधनेला ७० टक्के महत्त्व आहे. समष्टी साधना करतांना मनाविरुद्ध सेवा मिळाली तरी ती स्वीकारणे, स्वतःला होणार्या श्रमांचा विचार न करता दायित्व घेणे, सहसाधकांशी आनंदाने जुळवून घेणे, गुरुकार्य वाढवण्यासाठी साधकांना प्रेमाने समजून घेणे आणि प्रसंगी त्यांच्यापुढे नमतेही घेणे यांसारख्या कृती कराव्या लागत असल्यामुळे मन, बुद्धी आणि अहं यांचा लवकर लय होण्यास साहाय्य होते. समष्टी साधनेत मन, बुद्धी आणि अहं यांचा लवकर लय होत असल्यामुळेच समष्टी साधनेमुळे आध्यात्मिक उन्नतीही शीघ्र गतीने होते. यासाठीच सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरही साधनेत समष्टी भावाला पुष्कळ महत्त्व देतात.
या पार्श्वभूमीवर काही साधकांकडून समष्टी भावाच्या संदर्भात वरील प्रकारच्या चुका होत असल्यामुळे त्यांच्यात व्यष्टी भाव जरी असला, तरी एकंदरित साधनेच्या संदर्भात विचार करता त्याचे मोल असून नसल्यासारखेच आहे ! ‘माझ्यात व्यष्टी भाव असल्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगती होत आहे’, अशा भ्रमात रहाणारे असे साधक ‘गुरुकृपेस पात्र होत नाहीत’, ही मात्र वस्तूस्थिती आहे !
‘साधकांकडून वरील प्रकारच्या चुका होत नाहीत ना’, याकडे दायित्व असणार्या साधकांनी गांभीर्याने लक्ष देऊन साधकांना त्यासंदर्भात आवश्यक ते मार्गदर्शन करून त्यांच्याकडून योग्य साधना करवून घ्यावी.’
– पू. संदीप आळशी (३.४.२०२३)