गोव्याचा वैभवशाली इतिहास !
आज ‘गोवा राज्यदिन’ आहे. त्या निमित्ताने….
गोवा हा कोकणीमध्ये ‘गोंय’ आणि मराठीमध्ये ‘गोवे’ म्हणून ज्ञात आहे. मद्रास शब्दकोशामध्ये त्याला संस्कृतमधील ‘गो’ म्हणजे गाय या शब्दाशी जोडले असून त्या अर्थाने त्याला ‘गोपालांचा देश’ असे संबोधले आहे. ‘गोमंत’ या शब्दाचे ते संक्षिप्त रूप आहे. महाभारत पुराणाच्या भीष्मपर्वाच्या ९ व्या कांडामध्ये ‘गोमंतक’ या शब्दाचा उल्लेख आढळतो. गोमंतक हा शब्द ‘गो’ + ‘गोमंत’ + ‘क’ असा उत्पन्न झाला आहे. ‘गो’ म्हणजे ‘गाय’, ‘गोमंत’ म्हणजे ‘गायींचे पालन करणारा’ आणि ‘क’ हा प्रत्यय त्याला जोडला असून तो दुर्मिळ स्थिती दर्शवतो.
हरिवंश पुराणामध्ये ‘गोमांचल’ या पर्वताचा उल्लेख आढळतो. त्या पर्वतामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि मगध देशाचा राजा जरासंध यांच्यात घनघोर युद्ध होते अन् त्यात जरासंधाचा पूर्ण पराजय होतो. शिलहारा राजा गणरादित्य (इ.स. १११५) यांच्या कोल्हापूर सनदमध्ये ‘गोमांचल’सदृश ‘गोमंत दुर्ग’ या शब्दाचा उल्लेख आहे. यावरून कोल्हापूरच्या शिलहारा राजाकडे ‘गोमंत दुर्ग’चे स्वामित्व होते, हे लक्षात येते. या दुर्गला वेढलेल्या प्रदेशालाच ‘गोमंतक’ असे म्हटले गेले आहे. गोव्याच्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वत आणि पश्चिमेकडील अरबी समुद्र येथून गोव्यात अनेक वर्षांपासून संस्कृतीची परस्पर देवाणघेवाण झाली. गोव्याच्या सांस्कृतिक विकासामध्ये त्याचा अमिट ठसा उमटला आहे. (१९.१२.२०२०)