सप्तबंदीचे म्युरल आणि रत्नागिरीचा इतिहास लिहिला जातोय ! – अधिवक्ता बाबा परुळेकर
रत्नागिरी – ऐतिहासिक पतित पावन मंदिराच्या समोरच्या बाजूला सप्तबंदीविरुद्ध सावरकरांनी लढा दिला, त्याचे ‘म्युरल’ (म्युरल म्हणजे भित्तीचित्र) केले आहे. मंदिर पूर्ण व्हायच्या आधी हिंदु धर्मातील अनिष्ठ रुढींविरुद्ध म्हणजे रोटी, बेटी, स्पर्श, व्यवसाय बंदी या सर्वांच्या विरोधात उठाव केला.रत्नागिरीकरांच्या साक्षीने सप्तबंदीचा बीमोड केला. म्हणून येथे हे ‘म्युरल’ उभारले आहे.
हा इतिहास आहे. हा बराचसा इतिहास लिहिला गेला नाहीये. त्याकरता आय.सी.एच्.आर्.ची परिषद झाली. जे इथे घडलेय ते लिहून ठेवले पाहिजे. ते काम चालू झाले आहे, अशी माहिती पतित पावन मंदिराचे माजी अध्यक्ष अधिवक्ता बाबा परुळेकर यांनी दिली. सावरकरांच्या १४० जयंतीनिमित्त पतित पावन मंदिरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
अधिवक्ता बाबा परुळेकर पुढे म्हणाले की,
१. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगल्यानंतर ‘सरकारवर टीका करायची नाही, राजकारणात भाग घ्यायचा नाही’, अशा अटी घालून वीर सावरकरांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले; पण त्या वेळी सावरकर म्हणाले होते, ‘कितीही संकटे येऊ देत, जोपर्यंत बुद्धी, वाणी आणि लेखणी या गोष्टी माझ्यापाशी आहेत, तोपर्यंत कुणीही मला भारतमातेला मुक्त करण्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाहीत.’ त्यामुळेच रत्नागिरी ही ऐतिहासिक जागा ठरली. त्यांनी प्रथम शिरगावमध्ये कार्यक्रम केला. तुम्ही आम्ही सकल हिंदु बंधु बंधू हे गीत लिहिले.
२. रत्नागिरी खूप छोटी होती; पण कर्मठ होती. संपूर्ण कर्मठ रत्नागिरीला सुधारण्याचे काम एका बॅरिस्टरने केले. ज्याला सनद दिली नाही. जिथून आपण मिरवणूक काढली, तिथे सावरकरांनी गाडा घेऊन ओरडून स्वदेशी वस्तूंची विक्री केली. असा हा पुण्यप्रद रस्ता आहे. या लहानशा रत्नागिरीत सावरकर १६ वर्षे वास्तव्यास होते. प्रत्येक कानाकोपर्यात सावरकरांची स्मृती आहे. लक्ष्मी चौक, व्यायामशाळा असो वा सोने लुटण्याचा कार्यक्रम असेल किंवा मेळे असतील. सावरकरांनी राष्ट्रभक्ती जागृत केली.