रुग्णाला मालवण येथून सिंधुदुर्गनगरी येथे नेतांना रुग्णवाहिका बंद पडल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ
आरोग्य विभागाच्या गलथान कारभारावरून नागरिक संतप्त !
मालवण – येथील ग्रामीण रुग्णालयातील एका रुग्णाला २८ मे या दिवशी अधिक उपचारासाठी तातडीने सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात नेत असतांना १०८ (तातडीने सेवा देणारी) ही शासकीय रुग्णवाहिका मार्गातच बंद पडली. यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ झाली. अखेर खासगी रुग्णवाहिकेने त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.
याविषयी मिळालेल्या माहितीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयाची १०८ ही रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने ती दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली आहे. त्यामुळे तिला पर्यायी म्हणून दुसरी १०८ रुग्णवाहिका मालवण ग्रामीण रुग्णालयात देण्यात आली आहे. या रुग्णाहिकेची चाके (टायर) झिजलेल्या स्थितीत आहेत, तसेच रुग्णाला जिल्हा रुग्णालयात नेत असतांना ती मार्गात मालवण टपाल कार्यालयाजवळ बंद पडली. या घटनेमुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून हा गंभीर स्थितीतील रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असल्यामुळे शासनाने चांगल्या स्थितीतील रुग्णवाहिका रुग्णालयांना द्याव्यात, अशी मागणी केली जात आहे.