रत्नागिरीत शोभायात्रा आणि सहभोजनाने वीर सावरकरांना अभिवादन !
|
रत्नागिरी, २८ मे (वार्ता.) – ‘वीर सावरकरांचा विजय असो’, ‘हिंदुत्वाचा जयजयकार’, अशा घोषणा देत आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त कारागृह येथील वीर सावरकर स्मारक ते ऐतिहासिक पतित पावन मंदिरापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच पालकमंत्री उदय सामंत यांनीही शोभायात्रेत सहभाग घेऊन लक्ष्मीचौक येथे वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर पतित पावन मंदिरात झालेल्या सहभोजन कार्यक्रमास सहस्रो लोकांनी उपस्थिती दर्शवली.
येथील स्वातंत्र्यवीर सावरकर विचार जागरण सप्ताहात २८ मे या दिवशी शोभायात्रा आणि सहभोजनाने सांगता झाली. सकाळी ८ वाजता कारागृह येथे शहराच्या विविध भागांतून हिंदुत्वाची ज्योत घेऊन शेकडो सावरकरप्रेमी आणि हिंदु बंधू-भगिनी यात्रेकरता सहभागी झाले. त्यानंतर कारागृहात वीर सावरकर यांच्या स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या शोभायात्रेस प्रारंभ झाला.
या यात्रेत हिंदुत्व ग्रंथ चित्ररथ, अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ व रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने वीर सावरकरांच्या बालपणीचा सजीव देखावा, प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या भगिनी, हिंदु जनजागृती समितीचा राष्ट्रपुरुषांचा देखावा, पतित पावन मंदिर संस्थेचा वीर सावरकरांच्या प्रतिमेचा रथ, दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या प्रतिमेचा आणि सहभोजनाचा चित्ररथ सहभागी झाला.
मिर्या येथील महिला आणि तोणदे येथील ढोल-ताशांच्या पथकाने सर्वांची मने जिंकली. ‘भगवे ध्वज’, ‘मी सावरकर’ असे लिहिलेल्या भगव्या टोप्या शेकडो युवक, महिला, मुले शोभायात्रेत सहभागी झाले. यात्रेच्या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच जयस्तंभ येथे ‘माऊली ॲक्वा’च्या वतीने पाणीवाटप, एस्.टी. स्टँड येथे गणेश धुरी यांच्या वतीने ताकवाटप करण्यात आले.
दानशूर भागोजीशेठ कीर यांनी पतित पावन मंदिर स्थापन केले. हिंदुशक्ती वाढण्याकरता आणि सप्तबंदीच्या बेडीतून हिंदु धर्म व्यापक होण्याकरता वीर सावरकरांनी सहभोजनाचे कार्यक्रम चालू केले. पहिले सहभोजन वर्ष १९३० मध्ये झाले होते. या प्रकारचे सहभोजन शोभायात्रेच्या सांगतेनंतर पतित पावन मंदिरात करण्यात आले.
या शोभायात्रेचे नियोजन सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड, अधिवक्ता बाबा परुळेकर, उन्मेश शिंदे, मंदार खेडेकर, अधिवक्ता विनय आंबुलकर, मंगेश मोभारकर, मंदार खेडेकर, संदीप रसाळ, तनया शिवलकर, केशव भट, गौरांग आगाशे, संतोष पावरी, संजय जोशी, समीर करमरकर, भरत इदाते आदी मंडळींनी यशस्वीपणे केले.
या सहभोजनात मंत्री मंगलप्रभात लोढा हेसुद्धा सहभागी झाले. त्यांच्यासमवेत भाजपचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, मुन्ना चवंडे, उमेश कुळकर्णी आदी उपस्थित होते.