परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणेच साधकांची काळजी घेऊन त्यांच्यावर प्रीती करणारे पू. रमानंद गौडा !

१. साधिकेने पू. रमानंदअण्णा यांची अनुभवलेली प्रीती !

१ अ. साधिकेच्या पायाला अस्थिभंग झाल्याचे कळल्यावर पू. रमानंदअण्णांनी तिच्याशी भ्रमणभाषवरून बोलणे आणि त्यामुळे तिचे मन स्थिर होऊन तिचा कृतज्ञताभाव जागृत होणे : ‘३०.४.२०२२ या दिवशी माझ्या डाव्या पायाचा अस्थिभंग झाला. त्या वेळी मी उडुपी जिल्ह्यात होते. मी तेथील रुग्णालयात गेले होते. आधुनिक वैद्यांना दाखवल्यावर त्यांनी ‘पायाला अस्थिभंग झाला असल्याने शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. त्या वेळी पू. रमानंदअण्णा बागलकोट जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते; म्हणून मी त्यांना दूरभाष केला नव्हता. त्यांच्या पत्नी सौ. मंजुळा रमानंद गौडा (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांना कळवून मी त्यांच्याशी समन्वय करत होते. पू. अण्णांना याविषयी कळल्यावर दौर्‍याच्या व्यस्ततेमधून दूरभाष करून ते माझ्याशी बोलले. पू. अण्णांशी बोलल्यावर माझे मन स्थिर झाले आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.

१ आ. पू. अण्णांच्या २ घंट्यांच्या सत्संगामुळे साधिकेला पुढील ६ आठवड्यांसाठी ऊर्जा आणि प्रयत्नांसाठी दिशा मिळणे : त्यानंतर २ दिवसांनी पू. अण्णा मंगळुरू येथे परत आले. वास्तविक त्यांचा फार दूरचा प्रवास झाला होता; पण तरीही त्याच दिवशी ते मला भेटायला खोलीत आले आणि त्यांनी मला २ घंटे सत्संग दिला. त्या २ घंट्यांच्या सत्संगात त्यांनी मला ‘जिल्ह्यातील साधकांचे भाववृद्धीचे प्रयत्न, तसेच श्रद्धा कशी असायला हवी ?’, अशी अनेक सूत्रे सांगितली. या सत्संगाच्या माध्यमातून मला पुष्कळ चैतन्य मिळाले आणि माझ्या मनाची स्थिती सकारात्मक झाली. ‘त्यांच्या या सत्संगातूनच मला पुढील ६ आठवड्यांसाठी ऊर्जा आणि प्रयत्नांसाठी दिशा मिळाली’, असे मला वाटते.

आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे

१ इ. पू. अण्णांनी साधिकेला परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंगळुरू येथे काढलेल्या नामदिंडीत सहभागी होण्यास सांगणे : परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंगळुरू येथे नामदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. माझ्या पायाला अस्थिभंग झाला असल्याने मी तेथे जाऊ शकणार नव्हते आणि ‘जायला हवे’, असा विचारही माझ्या मनात आला नव्हता; पण नामदिंडीच्या दिवशी दुपारी मला पू. अण्णांचा दूरभाष आला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्ही नामदिंडीला या. तुम्ही एका गाडीत बसा आणि नामदिंडीत सहभागी व्हा.’’ ‘येण्यासाठी तुम्हाला काही अडचण नाही ना ?’, असेही त्यांनी मला विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘मला त्रास नाही; पण साधकांना मला उचलून खाली न्यावे लागते. वर उचलून आणावे लागते. साधकांनाच त्रास होतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्ही त्याचा विचार करू नका. नामदिंडी परत पहायला मिळेल, असे नाही.’’

१ ई. परात्पर गुरुदेवांच्या डोळ्यांतील साधकांबद्दलचे वात्सल्य पू. अण्णांच्या डोळ्यांत अनुभवता येणे : त्यानंतर साधकांनी मला उचलून खाली आणले. निघण्यासाठी थोडा कालावधी होता; म्हणून मी दाराजवळ एका आसंदीवर बसले होते. पू. अण्णा दिंडीला जाण्यासाठी फाटकाच्या (गेटच्या) बाहेर गाडीत बसले होते. निघता निघता त्यांनी माझ्याकडे पाहून मी खाली आल्याची निश्चिती केली. त्या वेळी मला त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरुदेवच दिसले. जसे परात्पर गुरुदेवांच्या डोळ्यांत साधकांबद्दलचे वात्सल्य असते, तसेच वात्सल्य मला त्या वेळी पू. अण्णांच्या डोळ्यांत अनुभवता आले.

१ उ. ‘जसे आईचे लक्ष आपल्या बाळाकडे सतत असते, तसेच पू. अण्णांचे लक्ष आहे’, असे साधिकेने अनुभवणे : मी नामदिंडीमध्ये गाडीत बसून सहभागी झाले. दिंडीच्या मार्गावर एका ठिकाणी गाडीची गती अल्प होती. त्या वेळी पू. अण्णा रस्त्यावरून चालत होते. तेवढ्यामध्ये ते मी बसलेल्या गाडीपाशी आले आणि त्यांनी ‘तुम्हाला काही त्रास होत नाही ना ?’, असे मला विचारले. ‘जसे आईचे लक्ष सतत आपल्या बाळाकडे असते, तसेच पू. अण्णांचे माझ्याकडे सतत लक्ष आहे’, असे मला वाटले.

१ ऊ. परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाची ध्वनीचित्र-चकती एकटीने पहाण्यापेक्षा सर्व साधकांच्या समवेत पहाण्यास सांगून साधिकेला समष्टीचा आनंद मिळवून देणे : परात्पर गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सभागृहात ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात येणार होती. माझा निवास पहिल्या माळ्यावरील खोलीत होता. माझ्या पायाला अस्थिभंग झाला असल्याने मला खाली जाणे शक्य नव्हते. मी खोलीतच संगणकावर ध्वनीचित्र-चकती पहाण्याचे नियोजन केले होते. दुपारी मला पू. अण्णांचा दूरभाष आला आणि त्यांनी मला सांगितले, ‘‘ध्वनीचित्र-चकती पहाण्यासाठी खाली सभागृहात या. एकटीने ध्वनीचित्र-चकती पहाण्यापेक्षा सर्व साधकांच्या समवेत पाहिल्यास तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही ‘साधकांना त्रास होईल’, असा विचार करू नका. आपण नियोजन करूया.’’

‘प्रत्येक साधकाला आनंद कसा देता येईल ?’, या त्यांच्या विचारातून मला परात्पर गुरुदेवांचेच स्मरण झाले.

१ ए. पू. अण्णा रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघत असतांना त्यांनी स्वतः वर येऊन साधिकेचा निरोप घेणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेवांची आठवण येऊन कृतज्ञता वाटणे : पू. अण्णा एका सेवेसाठी रामनाथी आश्रमात जाण्यासाठी निघत होते. तेव्हा मला त्यांना निरोप देण्यासाठी खाली जाता येत नव्हते; म्हणून मी सज्जात उभी होते. काही वेळाने मला ‘ताई ’, अशी हाक ऐकू आली. मागे वळून पहाते, तर पू. अण्णा उभे होते ! ‘मला खाली जाता येणार नाही’, हे लक्षात घेऊन ते स्वतःच वर आले होते. ‘त्यांना पाहून त्यांच्या ठिकाणी परात्पर गुरुदेवच आहेत’, असे मला वाटले. त्या वेळची माझ्या मनाची स्थिती मी शब्दांत सांगू शकत नाही. आईला बघितल्यावर बाळाला जसा आनंद होतो, तसा आनंद मला झाला होता आणि त्याच वेळी ‘भगवंताने आपल्यासाठी किती करावे !’, असा विचार मनात येऊन मला कृतज्ञता वाटत होती.

२. ‘कर्तेपणा न ठेवता प्रत्येक कृती संतांच्या चरणी अर्पण केल्याने त्यांचा संकल्प कार्यरत होऊन भगवंतच कार्य करतो’, याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !

पू. अण्णांनी आम्हाला कर्नाटक राज्यातील साधकांसाठी प्रतिदिन ३० मिनिटे भाववृद्धी सत्संग घेण्यास सांगितला. त्यांनी आम्हाला ‘हा सत्संग कसा घ्यायला हवा ?’, याची दिशा दिली. त्यांनी आम्हाला भावजागृतीचा एक छोटा प्रयोग घेऊन प्रत्येक दिवशी भाव आणि गुण यांच्या वृद्धीसाठी ध्येय घेण्यास सांगितले, तसेच त्या प्रयत्नांचा आढावा दुसर्‍या दिवशीच्या सत्संगात घेण्यास सांगितला. आरंभी आम्ही प्रयत्न करायचो आणि सत्संगात सांगायचो. अशा पद्धतीने सत्संग चालू होता; पण साधारण २ मासांनी त्यांच्याच कृपेने आम्हाला जाणीव झाली, ‘आपण आपल्या स्तरावर हे प्रयत्न करू शकत नाही, तसेच इतर साधकांकडूनही हे प्रयत्न आपण करून घेऊ शकत नाही. संतांच्या चरणी प्रतिदिनचे ध्येय अर्पण झाले, तर त्यांच्याच संकल्पाने आणि कृपेने आम्हा सर्वांचे प्रयत्न होऊ शकतात.’ त्यानंतर आम्ही प्रतिदिन भाववृद्धी सत्संगासाठी निश्चित केलेले ध्येय पू. अण्णांना पाठवण्यास आरंभ केला. आम्ही त्यांच्या चरणी प्रयत्नांसाठीचे ध्येय मानसरित्या अर्पण करणे चालू केले. त्यानंतर मला जाणवले, ‘आमच्यातील उत्साह वाढला आहे. ‘परात्पर गुरुदेव आणि पू. अण्णा यांच्या कृपेमुळे काय ध्येय ठेवायचे ?’, याविषयीची नवनवीन सूत्रे भगवंत सुचवायला लागला. आमच्या प्रयत्नांनाही गती मिळाली आणि त्यातून आनंद मिळायला लागला.’

यावरून शिकायला मिळाले, ‘कर्तेपणा न ठेवता प्रत्येक कृती संतांच्या चरणी अर्पण केल्याने त्यांचा संकल्प कार्यरत होऊन त्यांची कृपाही होते. यातून शरणागतीही वाढते आणि शरणागतीतून भगवंताचे तत्त्व कार्यरत होऊन भगवंतच कार्य करतो.’

३. प्रार्थना

‘हे गुरुमाऊली, आपल्याच कृपेने मला पू. अण्णांचा अखंड सत्संग मिळत आहे. त्यांच्या माध्यमातून आपण मला साधनेची दिशा देऊन ध्येयाच्या दिशेने घेऊन जात आहात. ‘मला पू. अण्णांच्या सत्संगाचा लाभ करून घेता येऊ दे. ते सांगत असलेली सूत्रे मला कृतीत आणता येऊ देत’, अशी आपल्या आणि पू. अण्णा यांच्या चरणी प्रार्थना करते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती चारुदत्त पिंगळे (वय ५४ वर्षे), मंगळुरू, कर्नाटक. (२८.६.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक