परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रमाणे सर्वांवर अखंड प्रीती करणारे आणि गुरुकार्यासाठी सर्वांना अविरत मार्गदर्शन करणारे कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४७ वर्षे)!
‘प्रत्येक साधक म्हणजे गुरूंचे समष्टी रूप आहे’, ही जाणीव ठेवल्यास बहिर्मुखता न्यून होण्यास साहाय्य होईल ! – पू. रमानंद गौडा |
‘सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांचा ज्येष्ठ शुक्ल नवमी (२९.५.२०२३) या दिवशी ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या समवेत बागलकोट आणि धारवाड जिल्ह्याच्या दौर्यासाठी असणार्या सौ. स्मिता कानडे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५५ वर्षे) यांना पू. रमानंद गौडा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
पू. रमानंद गौडा यांच्या चरणी त्यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सतत साधकांच्या प्रगतीचा विचार करणारे पू. रमानंद गौडा !
१ अ. पू. रमानंदअण्णा यांना उष्णतेमुळे जिभेला जखम होऊनही त्यांनी साधकांसाठी अधिकाधिक वेळ देऊन त्यांना मार्गदर्शन करणे : ‘पू. रमानंदअण्णा यांची दौर्याच्या वेळी प्रकृती ठीक नव्हती. त्यांना उष्णतेचा त्रास होत होता. त्यांच्या जिभेला उष्णतेमुळे जखम झाली होती. तेव्हा खाता येत नसल्यामुळे पू. अण्णा केवळ शहाळ्याचे पाणी आणि फळांचा रस घेत होते. ‘दिवसभरामध्ये साधक आणि त्यांचा परिवार अन् धर्मप्रेमी यांच्याशी बोलणे, तसेच भ्रमणभाषवर साधकांशी एकत्रित संवाद साधणे’, असा त्यांचा दिनक्रम असायचा. रात्री पू. अण्णा साधनेतील स्वत:चे अनुभव आणि साधकांना प्रोत्साहन देणारी सूत्रे सांगून त्यांच्या समवेत शिकायला आलेल्या साधकांनाही मार्गदर्शन करत.
१ आ. ‘साधकांकडून परत तीच चूक होऊ नये’, यांसाठी साधकांना त्यांच्या चुका तत्त्वनिष्ठपणे सांगून जाणीव करून देणे : पू. अण्णा यांच्या समवेत शिकण्यासाठी आलेले साधक आणि जिल्ह्यातील काही दायित्व असणारे साधक यांच्याकडून गंभीर चुका होत होत्या. तेव्हा पू. अण्णा यांनी ‘परत तीच चूक होऊ नये’, यासाठी गांभीर्याने चुकांची जाणीव करून दिली आणि प्रायश्चित्तही घेण्यास सांगितले. पू. अण्णा यांच्यामुळे आम्हाला आमच्या चुकांची जाणीव झाली. यासाठी मी गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
२.️ सर्वांवर प्रीतीचा वर्षाव करणारे पू. रमानंद गौडा !
अ. एक साधक मार्गदर्शनाच्या ठिकाणचा मार्ग दाखवण्यासाठी दुचाकी घेऊन आला होता. त्या साधकाचे भोजन व्हायचे होते. पू. अण्णांनी त्या साधकाला भोजनाचा डबा घेऊन येण्यास सांगितले. नंतर ते मार्गदर्शनाच्या ठिकाणी गेले.
आ. पू. अण्णा साधकांच्या घरी गेल्यावर साधकांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीशी बोलणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाययोजना सांगणे, हे सर्व अतिशय प्रेमाने करायचे.
इ. पू. अण्णा साधिकांच्या घरातील विरोध न्यून होऊन त्यांना ‘साधनेत साहाय्य व्हावे’, यासाठी प्रयत्न करतात.
ई. कधी कधी पू. अण्णा रात्री उशिरापर्यंत मार्गदर्शन करायचे. त्या वेळी ते साधकांना ‘उद्या सकाळी थोडे उशिरा उठू शकता’, असे प्रेमाने सांगायचे.
उ. एका केंद्रातून दुसर्या केंद्रात जातांना २ – ३ घंट्यांचा प्रवास असेल, तर मध्ये ‘सर्वांनी काही खाल्ले का ?’, याची ते आठवणीने विचारपूस करायचे.
३. एखाद्या साधकाच्या घरी गेल्यावर पूर्ण कुटुंबालाच साधनेचे महत्त्व सांगून सहभागी करून घेणे आणि त्यांच्याही मनात संस्थेविषयी श्रद्धा निर्माण करणे
साधकांच्या घरी भोजन करतांना पू. अण्णा घरातील पुरुष व्यक्तीला समवेत घेऊन भोजन करायचे. त्या वेळी ‘घरातील पुरुष व्यक्तीलाही आनंद मिळावा’, यासाठी पू. अण्णा प्रयत्न करायचे. त्यामुळे त्यांच्याही मनात संस्थेविषयी श्रद्धा निर्माण होत असे. ज्या साधकांच्या घरी पू. अण्णा जात असत, त्या पूर्ण कुटुंबालाच साधनेचे महत्त्व सांगून सनातन संस्थेच्या कार्यात सहभागी करून घेत असत.
४. साधकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीचाही विचार न करता त्यांना मार्गदर्शन करणे
अ. पू. अण्णा यांना अधिक वेळ बसल्यास पाठदुखीचा त्रास होतो, तरीही ते साधकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःच्या प्रकृतीचा विचार करत नसत.
आ. साधकांच्या कुटुंबातील कुणी गाणारे अथवा तबला वाजवणारे असतील, तर ते आवर्जून ऐकत असत.
इ. पू. अण्णांनी जेवढ्या गांभीर्याने साधकांना चुका सांगितल्या, त्यापेक्षा पुष्कळ प्रेमाने साधकांना साधनेत प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
ई. शिकण्यासाठी आलेल्या साधकांचे गुण इतर साधकांना सांगण्यास सांगायचे. त्यामुळे शिकण्यासाठी आलेल्या सर्व साधकांना प्रोत्साहन मिळत असे. पू. अण्णा सर्वांना आनंद देत असत.
५. ‘साधकांची साधना चांगली व्हावी’, यांसाठी अखंड प्रयत्नरत असणारे पू. रमानंदअण्णा !
अ. दौर्याच्या कालावधीत पू. अण्णा यांनी साधकांच्या स्थितीनुसार आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना सेवा दिल्या.
आ. पू. अण्णा दौर्याच्या कालावधीत ‘साधकांसाठी उपक्रम आहेत, उपक्रमासाठी साधक नाहीत’, हे आम्हा साधकांच्या मनावर बिंबवत होते.
इ. साधकांनी सेवा आणि साधना होण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. ‘साधकांना उत्तरदायी साधकांच्या संदर्भात सतत कृतज्ञता असायला हवी’, असे पू. अण्णा यांनी सांगितले.
ई. साधकांना अनेकदा सांगून पालट होत नसल्यास आणि ‘त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी’, तसेच ‘साधकांमध्ये साधनेचे गांभीर्य निर्माण व्हावे’, यासाठी पू. अण्णांनी काही साधकांचे दायित्व पालटले.
उ. पू. अण्णांनी उत्तरदायी साधकांच्या सत्संगात समष्टी सेवेची घडी बसवण्यासाठी सत्संग आणि आढावा यांचे नियोजन करण्यास सांगितले अन् ते समायमर्यादा घालून उत्तरदायी साधकांकडून पूर्ण करून घेतले.
ऊ. ‘पू. अण्णा यांनी साधकांना मार्गदर्शनामध्ये ३ मासांमध्ये ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी काय प्रयत्न करायचे ?’, ही सूत्रे सांगून सर्वांमध्ये उत्साह निर्माण केला.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे पू. रमानंद गौडा !
मराठीमध्ये आपण जसे ‘माझी गुरुमाऊली’ म्हणतो, तसेच कन्नडमध्ये ‘नम्म गुरुगोळू’, असे म्हणतात. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) आठवणीने पू. अण्णा यांचा कंठ दाटून येतो. ते एक क्षण काहीही बोलू शकत नाहीत. त्यांचे डोळे अश्रूंनी भरून येतात. त्यांचे ते गुरुदेवांचे स्मरण ऐकून सर्व साधक भावस्थिती अनुभवतात. एकदा रात्री ते आम्हा सर्व साधकांना मार्गदर्शन करत होते. तेव्हा त्यांनी मानसपूजा घेतली आणि आम्ही सर्व साधक गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती घेऊ शकलो. सर्वजण अर्धा घंटा भावावस्थेत होते. आम्ही सर्वजण ‘दुसर्या लोकामध्ये आहोत’, असे आम्हाला सर्वांनाच वाटत होते. मानसपूजेच्या कालावधीत स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन केवळ गुरुचरणांशी रहायचे असून त्या वेळी सर्व साधकांना गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व जाणवत होते आणि ‘त्याच अवस्थेत रहावे’, असे सर्वांना वाटत होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले, तुमच्या चरणांजवळ आम्हाला पुनःपुन्हा घेऊन जाणार्या, आमच्यामध्ये गुरुकार्यासाठी तळमळ निर्माण करणार्या आणि साधना करून घेणार्या पू. अण्णा यांचा सहवास तुम्ही आम्हा सर्व साधकांना दिला. याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
परात्पर गुरुमाऊलींसारखी सर्वांवर अखंड प्रीती करणारे आणि गुरुकार्यासाठी सर्वांना सतत मार्गदर्शन करून साधना करून घेणारे पू. अण्णा यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. स्मिता कानडे (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५५ वर्षे), बागलकोट, कर्नाटक. (२३.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |