पुणे येथे हिंदु एकता दिंडीच्या माध्यमातून हिंदु ऐक्याचे विलोभनीय दर्शन !
भव्य अन् दिव्य हिंदु एकता दिंडी, हिंदुत्वाची पताका फडकवे गगनी !
पुणे, २८ मे (वार्ता.) – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने २८ मे या दिवशी पुणे येथे भव्य हिंदु एकता दिंडी काढण्यात आली. संतांची वंदनीय उपस्थिती आणि हिंदु राष्ट्राचा जयघोष यांमुळे वातावरण भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण झाले होते. आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीतील श्री भवानीदेवी, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे सुवासिनींनी औक्षण करून पूजन केले. बाजीराव रस्ता येथील महाराणा प्रताप उद्यान येथून सायंकाळी ५.३० वाजता दिंडीला प्रारंभ झाला.
जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण, पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपति आणि ग्रामदेवी तांबडी जोगेश्वरी यांच्या चरणी प्रार्थना करून आणि श्री गणेशाच्या श्लोकाचे पठण झाले. चतुःशृंगी देवस्थानचे विश्वस्त श्री. नंदकुमार अनगळ यांनी धर्मध्वजाचे पूजन करून धर्मध्वजासमोर श्रीफळ वाढवले. पुरोहित उत्तम शहाणे यांनी पूजा सांगितली. हिंदु जनजागृती समितीच्या पुणे जिल्ह्यातील प्रशिक्षकांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर दिलेल्या उत्स्फूर्त घोषणांनी दिंडी मार्गस्थ झाली.