शुभमंगल सावधान !
देवा-ब्राह्मणांच्या, वडीलधार्या मंडळींच्या आशीर्वादाने गृहस्थाश्रमाचा प्रारंभ करण्याचा एक आनंददायी सोहळा म्हणजे ‘विवाह संस्कार !’ कुटुंबव्यवस्थेचा पाया म्हणजे ‘विवाह संस्कार.’ एकमेकांच्या साहाय्याने जीवनातील सुख-दुःख यांमध्ये खंबीरपणे उभे राहून पुढे जाण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ देणारा, समाजव्यवस्थेची घडी बसवून देणारा, सुखी-सुरक्षित, उन्नत जीवनाची दिशा देणारा संस्कार म्हणजे ‘विवाह संस्कार !’
विवाह म्हणजे भोगवृत्ती, स्वैराचार हा संकुचित अर्थ अभिप्रेत नाही. हिंदु धर्मात याचा अर्थ प्रेम, त्याग, समर्पण, सहकार्य शिकवणारा आहे. दोन कुळांना जोडणारा प्रेमाचा धागा आणि कौटुंबिक दायित्वांचे भान जपत समाजाशी बांधिलकी जपणे असा आहे; पण आधुनिकतेच्या नावाखाली नवी पिढी अन् पुढारलेले विचारवंत विवाह ही संकल्पनाच कालबाह्य मानू लागले आहेत. भोगवादी प्रवृत्तीच्या नादी लागून अंधानुकरण करून आपण आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेत आहोत. कितीही मोहक असला, तरी पशू आणि मानव यांतील भेद विसरता कामा नये. क्षणिक सुखाच्या मागे लागून चिरंतन सुखाला आपण परके व्हायला नको. सध्या मुलेच काय, तर मुलीही बिअर, सिगारेटचे व्यसन उघडपणे करतांना दिसतात. विशेष म्हणजे हे पालकांना ठाऊक असते. ते त्याला आधुनिकतेचे गोंडस नाव देऊन चालवून घेतात. अशा वेळी निर्व्यसनी आणि सोज्वळ मुलांना अनुरूप उपवधू मिळणे अवघड झाले आहे; कारण व्यसन करणे, हे त्यांच्या आस्थापनांच्या उच्चतेचे, प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते, तसेच ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ सोयीची वाटू लागल्याने सुरक्षित विवाह हे ‘बंधन (?)’ वाटू लागले आहे, हे दुर्दैवी आहे.
कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात, चकाकणारी शैक्षणिक मोहाची बाजू बघून हरवून न जाता त्यामागे लपलेली किळसवाणी बाजू लक्षात घ्या. नैराश्य, असुरक्षितता, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक र्हास हा आधुनिक विचारांनी मांडलेल्या चुकीच्या विवाह पद्धतीमुळे होत आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. स्वतःचीच सुरक्षितता धोक्यात आणू नका. अंतर्मुख होऊन विचार करण्याची वेळ आली आहे. पालकांनी जागरूक राहून युवा पिढीला विवाह संस्कारांचे महत्त्व सांगून त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी साहाय्य करायला हवे; कारण जगात अनेक आकर्षणे आहेत की, ते ही पिढी नष्ट करायला टपली आहेत. त्यामुळे सावध व्हा आणि सुरक्षित रहा !
– सौ. कुंदा डहाळे, नागपूर