राजदंडाचा सन्मान !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सेंट्रल विस्टा’ या संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले. या वेळी वेदमंत्रांच्या उच्चारात आणि होमहवन करून हे उद्घाटन करण्यात आले. येथे महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाच्या प्रारंभीच तमिळनाडूच्या पुरोहितांनी मोदी यांना मंत्रोच्चारात ‘राजदंड’ (सेंगॉल) सुपुर्द केला. हा राजदंड स्वीकारण्यापूर्वी मोदी यांनी राजदंडाला साष्टांग नमस्कार केला आणि त्यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समवेत नवीन संसद भवनात त्याची स्थापना केली. नवीन संसद भवन अल्प कालावधीत आणि पूर्वीचे प्रस्तावित मूल्य ३ सहस्र कोटी रुपये असतांना विविध कलाकृतींसह १ सहस्र २०० कोटी रुपयांमध्ये बनल्याचे वृत्त आहे. सध्याच्या संसदेपेक्षा हे संसद भवन तिप्पट मोठे आणि भारतीय वास्तूशास्त्राला अनुरूप अशी त्याची रचना आहे.
राजदंडाचा प्रवास
मूळ राजदंडाची निर्मिती ७ व्या शतकात एका तमिळ संतांनी केल्याचे म्हटले जाते. दक्षिणेतील महापराक्रमी आणि शक्तीशाली चोल साम्राज्यात राजसत्तेचे हस्तांतर या राजदंडाद्वारे व्हायचे. इंग्रजांकडून भारतियांकडे सत्ता हस्तांतर करण्याचे दिवस जवळ येत होते, तसे भारतातील शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू यांना एक प्रश्न विचारला, ‘सत्तेचे हस्तांतर कसे करावे ? म्हणजे त्यासाठी काय माध्यम ठेवावे ?’ तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी हा प्रश्न भारताचे तत्कालीन विद्वान आणि गर्व्हनर सी. राजगोपालाचारी यांना विचारला. राजगोपालाचारी यांनी अनेक ग्रंथांचा अभ्यास केल्यावर त्यांना भारतातील प्राचीन साम्राज्यांपैकी एक तमिळनाडूतील चोला साम्राज्यातील सत्तेच्या हस्तांतराची माहिती मिळाली. त्यांनी ‘सेंगॉल’ बनवण्याविषयी तमिळनाडूतील धर्माधिकार्यांना दायित्व दिले आणि त्यानंतर वुमीडी इथिराजुलू अन् वुमीडी सुधाकर यांनी तो सोन्यामध्ये सिद्ध केला. प्राचीन चोल साम्राज्यामध्ये हा राजदंड राजसत्तेवर स्थानापन्न होणार्या राजाला धर्माचार्यांकडून दिला जायचा. या राजदंडाच्या वरच्या भागात नंदीची प्रतिकृती आहे. हा राजदंड धर्माचार्य भगवान शिवाचे आवाहन करून राजाला देत. राजाने न्यायपूर्ण आणि निष्पक्ष कारभार करावा, असा त्यामागे उदात्त हेतू होता. ‘राजा हा शिवाचा अनुयायी असून तो भगवान शिवाला संमत असा राज्यकारभार करणार’, अशीही अपेक्षा राजाकडून असायची. तो अमृत काळाचे प्रतीक मानले जाते. यातून राजा आणि त्याच्या कार्याविषयी किती उदार दृष्टीकोन भारतीय संस्कृतीत विकसित होता, हे लक्षात येते.
राजदंडाचे अवमूल्यन करणारी काँग्रेस !
तमिळनाडू येथे सिद्ध झालेला राजदंड जवाहरलाल नेहरू यांना ऑगस्ट १९४७ मध्ये मंत्रोच्चारात देण्यात आला. त्यानंतर तो कुठे अदृश्य झाला ? ते लक्षात आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही नियतकालिकांमधून राजदंडाविषयीची माहिती घेत त्याचे महत्त्व जाणले. त्यानंतर या राजदंडाचा शोध चालू झाला. राजदंड प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवला होता आणि त्याची माहिती म्हणून तेथे लिहिले होते, ‘ पंडित नेहरू यांना मिळालेली सोन्याची काठी’ (?) म्हणजे या राजदंडाचे महत्त्व तत्कालीन शासन-प्रशासन यांच्या लेखी केवळ ‘सोन्याची काठी’ इतकेच होते ! या ‘सोन्याच्या काठी’ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे पुन्हा ऐतिहासिक राजदंडाकडे वाटचाल झाली. राजदंड पुन्हा संसदेत अध्यक्षांच्या शेजारी स्थापित झाला आणि देशाला पुन्हा अमृत काळाचा अनुभव मिळाला. नव्या संसदेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहून ‘एखाद्या धार्मिक कार्यक्रमाचे उद्घाटन पहात आहोत कि काय ?’, असा अनुभव देशवासियांना आला असेल; मात्र ज्याची कल्पनाही आपण करू शकत नाही, ते पंतप्रधान मोदी यांनी सत्यात उतरवले आणि याचा सनातन धर्मियांना अभिमानही वाटला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटनामुळे विरोधी पक्षांतील अनेकांनी टीका केली, तसेच ‘तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती करणार्या भारताला पुन्हा मागच्या काळात घेऊन जाण्याचा प्रयत्न’, असेही म्हटले.
राजाचे महत्त्व
भारतीय परंपरा, संस्कृती यांच्याविषयी द्वेष, कमीपणा आणि हिंदु धर्माविषयी तिटकारा असलेल्या व्यक्तीच असे म्हणू शकतात. हा केवळ नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम नसून कालप्रवाहात झाकोळल्या गेलेल्या भारतीय परंपरांचा गौरव करण्याचाही क्षण आहे. आपल्याकडे ‘राजा म्हणजे काही मोठे अधिकार गाजवण्यासाठी, सत्ता आणि शक्ती प्रदर्शित करण्यासाठीचे पद नसून ते एक दायित्व आहे अन् ते धर्म-देवता यांना साक्षी मानून, त्यांना अपेक्षित आणि प्रजेचे हित साधले जाणार आहे’, हे अधोरेखित करणारे आहे. साहजिकच ‘राजा’ या पदावर बसणारी व्यक्ती ही कुणी सामान्य नसून ती अनेक दैवी गुणांचा परिपोष असणारी असे. वेळप्रसंगी प्रजेच्या हितासाठी कोणत्याही स्वरूपाचा त्याग, अगदी प्राणत्यागही करण्याची मनाची सिद्धता आणि वयोपरत्वे सुयोग्य व्यक्तीला हेरून अन् धर्माचार्यांच्या आदेशान्वये त्याच्याकडे राज्यकारभार सोपवून वानप्रस्थाश्रमात जाण्याचीही सिद्धता त्या व्यक्तीची असे. आपल्याकडे राजाला श्रीविष्णूचा अंशच मानले जात असे. परिणामी प्रजेने अयोग्य वर्तन केल्यास तिला दंड देण्याचा आणि प्रजेचे रक्षण करण्याचा अधिकारच त्याला प्राप्त होत असे. हा राजदंड त्याचेच प्रतीक आहे. राजदंड धारण करणारी व्यक्ती नीतीपरायण हवी. राजा आणि प्रजा हे धर्मपरायणवृद्धीसाठी बनलेले एक नाते आहे. भारतात अनेक गौरवशाली राजसंस्कृती उदयास आल्या. त्यांच्यामुळे धर्म टिकला, सकल जिवांसह पृथ्वीचेही कल्याण आणि रक्षण झाले. तोच सन्मान या राजदंडाला पंतप्रधान मोदी यांनी मिळवून द्यावा आणि भारतियांचे सर्वार्थाने कल्याण करावे, ही अपेक्षा !
धर्मपरायण, निष्पक्ष, कर्तव्यदक्ष राजा आणि नीतीमान अन् राष्ट्र-धर्माभिमानी प्रजाच राजदंडाचे महत्त्व वाढवतील ! |