हिंदुत्वनिष्ठ सावरकर !
‘एकवेळ माझी ‘स्वातंत्र्यवीर’ ही ओळख विसरलात तरी चालेल; मात्र माझे हिंदुसंघटनाचे कार्य लक्षात ठेवा !’ – हिंदुहृदयसम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर
‘ईश्वराने ‘वर माग’ असे म्हटले, तर ‘इंद्रपद’ न मागता, ‘हिंदु धर्मासाठी शेवटपर्यंत लढणारा हिंदु कर’, असा वर मागीन’, असे सावरकर म्हणत.
– श्री. विक्रम सावरकर, भूतपूर्व अध्यक्ष, अ.भा. हिंदु महासभा
‘तुमच्या द्रव्याचे दान, तुमच्या श्रमाचे दान, तुमच्या अन्नाचे दान, प्रसंगी तुमच्या मनाचे अन् अवश्य तर तुमच्या प्राणांचेही दान या ‘हिंदु राष्ट्रा’स द्या ! – स्वा. सावरकर
हिंदूसंघटनाची चळवळ ही राष्ट्राच्या अखंडत्वाची चळवळ !
निधर्मी गांधीवाद्यांनी आणि समाजवाद्यांनी हिंदु संघाच्या चळवळीवर जातीयतेचा शिक्का मारला. वस्तूतः ‘मुसलमानांचा अनुनय’, हाच जातीयवादाचा अतिशय विकृत आणि अनैसर्गिक असा प्रकार होता. अखेर त्याला कडू, जहरी फळ आले. आज होणारे जातीय दंगे, ही या षंढ निधर्मीवादाचीच फळे आहेत. ‘हिंदूसंघटन’ ही चळवळ मुळीच जातीय नव्हती; कारण ती राष्ट्र्रसंघटनेची आणि राष्ट्र्राच्या अखंडत्वाची चळवळ आहे. सावरकरांचे पूर्ववयातील कार्य हे क्रांतीकार्य आहे. उत्तरवयात त्यांनी हिंदुत्वनिष्ठ राजकारण केले, तेही प्रवाहाच्या उलट दिशेने पोहून ! – (दैनिक ‘सनातन प्रभात’, २७ मे २००६, पृष्ठ ४)
एक कुशल हिंदूसंघटक !
लहानपणी मित्र, नंतर नाशिक, पुणे, लंडन, अंदमान, रत्नागिरी, पुणे आणि मुंबई अशा सर्वच ठिकाणी त्यांनी देशकार्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संघटन केले. अंदमानात बंदीवासात असतांना बंदीवानांची भक्कम संघटना करून देशातील पहिला सत्याग्रह घडवून दाखवला. – डॉ. प्रल्हाद कुलकर्णी (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक, २०१०)
हिंदू संघटित झाले, तर राष्ट्र समर्थ आणि स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नसल्याने प्रबळ हिंदूसंघटन उभारा !
‘‘होय ! हिंदु हे स्वयंमेव राष्ट्र आहे. प्रादेशिक एकतेसमवेतच धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अशा सार्या बंधांनी आम्ही एक आहोत आणि हे हिंदू राजकीयदृष्ट्या जागृत अन् संघटित झाले, तर राष्ट्र समर्थ आणि स्वतंत्र व्हायला वेळ लागणार नाही. हिंदु-मुस्लिम ऐक्याच्या दूधखुळ्या कल्पना सोडून प्रबळ हिंदूसंघटन उभारा !’’ – स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : हिंदूसंघटक सावरकर विशेषांक, १५ ऑगस्ट २००८)
सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाने एकत्वाची आणि समरसतेची जाणीव बळकट करणे
अवघ्या तीन-चार वर्षांत म्हणजे १९३७ ते १९४० या अल्पावधीत सावरकरांनी आसेतुहिमाचल प्रचाराचा झंझावात उभा करून हिंदुत्व, हिंदु राष्ट्र्रवाद आणि हिंदु अस्मिता यांचे विराट दर्शन उभे केले. काँग्रेसला पर्याय म्हणून हिंदूमहासभा सशक्त स्वरूपात उभी केली. ‘हिंदुत्व’ या ग्रंथाने हिंदूंना संजीवनीमंत्र दिला. अमोघ ऊर्जा दिली. सशस्त्र होण्याचे बळ दिले. ‘या देशाचे सूत्रधार, शिल्पकार आणि भाग्यविधाते आपण आहोत’, हा विश्वास दिला. हिंदूंचा पाट आणि ताट-वाटी गांधींनी काढून घेतली होती. ती सावरकरांनी पुन्हा मिळवून दिली. ‘इस्लामच्या कृपा-प्रसादाने आम्ही पोट भरणार नाही, तर हा देश आम्ही पिकविणार आहोत. सुजलाम्-सुफलाम् करणार आहोत’, ही स्वामित्व आणि अधिकार याची भावना सावरकरांनी निर्माण केली. त्यांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाने प्रत्येक हिंदूला पाच सहस्र वर्षांनी श्रीमंत केले. अश्वत्थ वृक्षासारख्या चिरंतन, सुसंस्कृत, धष्ट-पुष्ट, फळ-फूल, दूध-तूप यांनी ओसंडलेल्या विशाल कुटुंबाचे आपण सन्माननीय घटक आहोत. ही एकत्वाची आणि समरसतेची जाणीव ‘हिंदुत्व’ या ग्रंथाने बळकट केली. ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसमर’ या ग्रंथाने इतिहासाचा ओघ पालटला, तसा तो ‘हिंदुत्व’ ग्रंथाने पालटला. या दोन्ही ग्रंथांनी नवा भारत निर्माण केला. फार थोड्या ग्रंथांना असे दुर्मिळ श्रेय प्राप्त होते. जागतिक महासत्ता होऊन हिंदुविचाराचा प्रभाव सर्वत्र प्रसृत करण्याच्या आपल्या स्वप्नाला समूर्त करण्याचे सामर्थ्य सावरकर यांच्या साहित्यात आहे.’
(साभार : ‘लोकजागर’, श्रीरामनगर, वालनेसवाडी, सांगली.)
‘हिंदुस्थानचे खरे आणि एकमेव भाग्यविधाते हिंदूच आहेत !’ – स्वा. सावरकर
‘राष्ट्र उभे रहाण्याला एका भक्कम पायाची आवश्यकता असतेच. राष्ट्राच्या जीवनाचे खरे अस्तित्व जर कुठे प्रकट असेल, तर ते त्या राष्ट्राच्या त्याच एका विशिष्ट लोकांच्या नि जातीच्याच जीवनात. या लोकांचे सारे हितसंबंध, भूतकाळचा सारा इतिहास आणि भविष्यकाळच्या सार्या आशा-आकांक्षा त्या राष्ट्राशी आणि त्या भूमीशीच अत्यंत एकरूपतेने निगडित झालेल्या असतात, जे खरोखर त्या राष्ट्रमंदिराचे पहिले आणि शेवटचे आधारस्तंभ असतात. या कसोटीला केवळ हिंदूच उतरतात. ‘हिंदुस्थानचे खरे आणि एकमेव भाग्यविधाते हिंदूच आहेत’, हे स्वा. सावरकरांचे शब्द वज्रलेपी आहेत.’
– श्री. माधव बिवलकर (‘स्वातंत्र्यवीर’ दिवाळी विशेषांक २०१०)
हिंदुत्वाचे स्फुल्लिंग जागृत ठेवा !
‘अग्निहोत्री ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो, त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करून ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल.’
– स्वा. सावरकर (ख्रिस्ताब्द १९४१) (अखंड हिंदू लढा, पृ. १४३, ख्रिस्ताब्द १९४१)
स्वा. सावरकरांनी हिंदूंना संघटित होण्यासाठी केलेले आवाहन !
‘वैदिक, जैन, बौद्ध, शीख हे सारे हिंदु राष्ट्रांतर्गत धर्मपंथ आहेत. वैदिकातील जातीभेद मोडून, चातुर्वर्ण्य लाथाडून सार्या हिंदु राष्ट्रियांनी एक व्हावे. वैदिक, जैन, बौद्ध आणि शीख यांची पितृभूमी अन् पुण्यभूमी एकच आहे. ती म्हणजे हिंदमाता ! आपली आई वेदनांनी तळमळत असतांना भावंडांनी आपापसात भांडत बसणे थोर पाप आहे.’
– स्वा. सावरकर (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी विशेषांक २०१२)
हिंदूंनो, आपल्या हिंदुत्वाचा अभिमान बाळगा !
१. हिंदूंना राजकीय जाण येण्यासाठी प्रबोधन करण्याचे कार्य हाती घ्या !
हिंदूंनो, तुमची राजकीय दृष्टी गेली आहे. त्यामुळे तुमच्या शक्तीची जाणीव नष्ट झाली आहे. ती जाणीव हिंदु समाजाला व्हावी यासाठी त्या समाजाची राजकीय दृष्टी परत आणणे, हे या पुढचे आपले काम आहे.
२. काँग्रेसने राजकीयदृष्ट्या हिंदी केलेल्या हिंदु समाजाला पुन्हा हिंदु करा !
काँग्रेसच्या शिकवणीमुळे हिंदु समाज राजकीयदृष्ट्या ‘हिंदी’ झाला. या समाजाला राजकीयदृष्ट्या पुन्हा ‘हिंदु’ करणे, हे या पुढचे आपले काम आहे.
३. हिंदूंनो, उन्मत्त झालेल्या काँग्रेसचा सर्व स्तरांवरील पाठिंबा काढून घ्या !
‘जी काँग्रेस अत्यंत बलिष्ठ झाली आहे, तिचा सगळा पुरवठा म्हणजे मनुष्यबळ, द्रव्य नि मते … हा हिंदूंकडून होतो. तो पुरवठा बंद करा.’ – वर्ष १९३८ मधील नागपूर अधिवेशनातील अध्यक्षीय भाषण
४. हिंदूंनो, हिंदु वंश बहुसंख्येने टिकवा !
‘हिंदु वंश बहुसंख्येने टिकला, तरच हिंदुस्थानचे पाकिस्तान होण्याचे टळेल. हा सांस्कृतिक संघर्ष आहे.’
– वीर सावरकर (संदर्भ : ‘धर्मभास्कर’, ऑक्टोबर २०१३)
हिंदूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे बोल हृदयात कोरून ठेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी सिद्ध व्हा !
‘हिंदुस्थानात आम्हा हिंदूंचे पूर्वज सहस्रो वर्षे राहिले अन् नांदले. आमची पवित्र स्थाने याच भूमीत आहेत. त्यामुळे हिंदुस्थान ही केवळ आमची ‘निवासभूमी’ नसून ‘पुण्यभूमी’ही आहे. आम्हाला मानाने जगायला नि मरायलाही जगाच्या पाठीवर या देशाबाहेर स्वत:ची अशी दुसरी भूमी नाही. आमचे हिंदु राष्ट्र हे परमेश्वराचे पार्थिव प्रतीक आहे. ते या भूमीवर अनादी काळापासून ‘राष्ट्र’ म्हणून नांदत आले आहे. त्याचे लचके तोडून दुसर्यांना देण्याची भाषा काढणे म्हणजे ‘राष्ट्रद्रोह’ होय. माझ्या हृदयात अखंड भारताचे मानचित्र (नकाशा) कोरलेले आहे. मी त्यातला कोणता भाग तोडून देऊ ? काश्मीर देईन, तर हिंदुस्थानचे शीरच तोडून दिल्यासारखे होईल. मानस सरोवर देईन, तर जिथे देवांगना न्हाल्या, यक्षाने धर्मराजाला प्रश्न विचारले, ते सरोवरच जाईल ! पेशावर देईन, तर त्या प्रांतात संस्कृत व्याकरणकार पाणिनी झाला. द्वारका देईन, तर साक्षात भगवान श्रीकृष्णाचे राज्य तिथे झाले. बंगालमध्ये कालीमातेची नि चैतन्याची पूजा होते. महाराष्ट्र म्हणाल, तर मी माझे हृदयच तोडून दिल्यासारखे होईल ! हा देश म्हणजे काही घर वा धर्मशाळा नव्हे. ते आमचे एक पवित्र मंदिर आहे. आमच्या हृदयातील अखंड भारतमातेची प्रतिमा दुभंगली, तर ती मृत होईल. मग मी तिची पूजा करू शकणार नाही; म्हणून ती प्रतिमा मला अभंगच, अखंडच ठेवली पाहिजे आणि त्याकरिता प्रत्येकाने प्राणपणाने प्रतिकार केला पाहिजे.’ – स्वा. सावरकर (‘सावरकर दर्शन’ – द.स. हर्षे)
स्वा. सावरकरांची ‘हिंदु’ शब्दाची व्याख्या !
‘सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भारतभूमीस जो आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो, तो ‘हिंदु !’ जातपात विसरून हिंदूंनी एक व्हावे. सारे हिंदू एक जात, एक रक्त आणि एक राष्ट्र आहेत.’ – स्वा. सावरकर (संदर्भ : ‘स्वातंत्रवीर’, दिवाळी विशेषांक २०१२)
सावरकरांचा प्रचंड द्वेष आणि मानसिक छळ करणार्या नेहरू सरकारच्या काळात सिद्ध झालेल्या राज्यघटनेत सावरकरांनी केलेली ‘हिंदु’ या शब्दाची हीच व्याख्या घेण्यात आली !
हिंदुत्वाच्या गंगेत मुसलमानांनी अवगाहन करावे (मिसळावे) !
स्वतंत्र भारतात हिंदु आणि मुसलमान यांना समान अधिकार असतील. हिंदू हेच या देशाचे राष्ट्रीक आहेत. म्हणून हे हिंदु राष्ट्रच असेल; पण व्यवहारात ते हिंदी राज्य होईल. जोपर्यंत राष्ट्रद्रोहाची भावना त्यांना शिवत नाही, तोपर्यंत नागरिक म्हणून मुसलमान तेथे सुखाने नांदू शकतील. हिंदूंचे प्रेम ही परमपावन गंगा आहे. दुसरीकडे कोठेतरी पाणी भरण्यासाठी बादल्या घेऊन धावण्याऐवजी हिंदुत्वाच्या गंगेत मुसलमानांनी अवगाहन करावे ! – (संदर्भ – वर्ष १९३८ मध्ये कर्णावती येथे हिंदुमहासभेच्या अधिवेशनात सावरकरांनी केलेले भाषण)
मुसलमानांना वेगळी वागणूक देण्याच्या विरोधात असलेले स्वा. सावरकर !
‘स्वा. सावरकरांचा मुसलमानांशी वैरभाव नव्हता; पण त्याचसमवेत त्यांची मर्जी संपादन करण्याकरिता काही करणे, त्यांच्या विचारात बसणारे नव्हते. मुसलमान म्हणून त्यांना वेगळी वागणूक देण्याच्या ते विरोधात होते. त्यांचे रोखठोक विचार होते, ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना आणि विरोधात जाल, तर तुमचा विरोध उच्छेदून हिंदू स्वातंत्र्य मिळवू शकतात.’ – श्री. माधव बिवलकर (स्वातंत्र्यवीर, दिवाळी विशेषांक २००८)
मी हिंदूंना बजावून सांगतो की, स्वातंत्र्यानंतरही मुसलमान लोक राष्ट्राला धोका ठरतील. पाकिस्तानचा प्रश्न हिंदूंना पिढ्यान्पिढ्या उपद्रवकारी आहे. – स्वा. सावरकर
हिंदूंनो, इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र हवे ?
केवळ हिंदू विचारधाराच पुन्हा अखंड हिंदुस्थान निर्माण करू शकेल ! ‘मी हिंदू मतदारांना सहस्र वेळा सूचना देतो, ‘या खोट्या राष्ट्रवाद्यांना जर तुम्ही सत्ताच्युत केले नाही, तर हा ‘गोंधाळ’ हिंदीवाद भारतातील मुसलमानांना सैन्य, पोलीस खाते आणि राज्यकारभार यांतील महत्त्वाच्या जागा देईल अन् बाहेरचे मुसलमान चारही दिशांनी भारतावर आक्रमण करतील. त्या वेळी हे मोक्याच्या स्थानी नेमलेले मुसलमान अचानक अंतर्गत उठाव करून या असावध गांधीवादी शासनाला पदच्युत करून भारताचा अखंड पाकिस्तान करतील ! हा धोका लक्षात घेऊन आता तुम्हाला दोन पक्षांतील नव्हे, तर दोन विचारसरणींतील एक विचारसरणी निवडायची आहे. ‘भारतातील राज्य कि हिंदु राज्य ?’, हा खरा प्रश्न नसून मुख्य प्रश्न आहे, ‘इस्लामी राज्य कि हिंदु राष्ट्र ?’ थोडक्यात अखंड हिंदुस्थान कि अखंड पाकिस्तान ?’ अशा परिस्थितीत केवळ हिंदू संघटनांची विचारधाराच या देशाचे रक्षण करून सिंधूपासून सेतूबंधापर्यंत पुन्हा अखंड हिंदुस्थान निर्माण करू शकेल !’ – स्वातंत्र्यवीर सावरकर (संदर्भ : ‘लोकजागर’, जून २०१२)
हे राष्ट्र हिंदु ध्वजाखालीच स्थापन होईल !
‘या जगात जर आपणास ‘हिंदु’ म्हणून स्वाभिमानाने जीवन जगायचे असेल, तर आपल्याला तसा पूर्ण अधिकार आहे. हे राष्ट्र हिंदु ध्वजाखालीच स्थापन होईल. माझी ही भविष्यवाणी खोटी ठरली, तर लोक मला ‘वेडा’ म्हणतील; मात्र खरी ठरली, तर मी ‘प्रेषित’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे.’ – स्वा. सावरकर (संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी अंक २००७)
सावरकरांची स्वराज्याची कल्पना !
‘स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर ५ मे १९२७ च्या ‘श्रद्धानंद’ मध्ये म्हणतात, ‘ज्यात स्वत्व अबाधित राहू शकते, ते स्वराज्य. ज्यात प्राणापलीकडे प्रिय असलेले आमचे स्वत्व, आमचे हिंदुत्व आम्हास सोडावे लागते किंवा त्याच्या सन्मानाचा ध्वज अहिंदूंच्या पायावर नमवावा लागतो, ते आम्हा हिंदूंचे स्वराज्यच नाही.’
‘परराष्ट्र्र धोरणाविषयी सावरकरांचे मत !
‘परराष्ट्र्र धोरण ठरवतांना भारताने अन्य देशांच्या प्रकटपणे केल्या जाणार्या धोरणी घोषणांवर फारसा विश्वास न ठेवता ‘स्वराष्ट्रहित’ हेच मुख्य साध्य ठेवून त्याला अनुसरून संधी-विग्रह करावेत. राष्ट्र्राराष्ट्रांच्या व्यवहारात बहुधा पक्के शत्रू वा पक्के मित्र कुणी असत नाहीत आणि ‘स्वसामर्थ्य’ असल्याविना संधी-विग्रह उपयोगी नाहीत.’
राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेले स्वा. सावरकरांचे स्फूर्तीदायी विचार !
- ‘देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सांडलेला रक्ताचा एकेक थेंब हे जगातील सर्वांत मौल्यवान रत्न होय.
- राष्ट्राचा सन्मान हा सुखसोयींपेक्षा अधिक महत्त्वाचा !
- देशासाठी बलीदान करणे, यासारखी वैभवशाली गोष्ट नाही.
- राष्ट्रातील महापुरुषांचे स्मरण हे राष्ट्रीयत्व राखण्यास एक चांगले साधन आहे.
- देशासाठी प्राणत्याग करण्यात जे सुख आहे, ते अनेक वर्षे केवळ जगण्याने थोडेच लाभणार आहे ?
- ज्यांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत सतत तेवत असते, असे नागरिक ज्या देशात असतील, त्या देशाची निश्चित प्रगती होईल.
- मातृभूमीशी एकनिष्ठ रहाणे, हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे.
- राष्ट्राचे मोल त्यातील नागरिकांच्या गुणांवरून पारखले जाते.
- खरी राष्ट्रसेवा ज्यास करावयाची आहे, त्याने लोकांस प्रिय असो वा अप्रिय, हितकारक असेल, तेच पुरस्कारिले पाहिजे.
- राष्ट्राच्या हिताचे असेल, ते ग्राह्य आणि अहिताचे ते त्याज्य समजावे.
- राष्ट्रकार्य अविरतपणे करणे, हीच ईश्वराची पूजा होय.
- राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करणे आवश्यक आहे.
- हिंदु राष्ट्राचे ध्येय अभ्युदय आणि निःश्रेयस हे असेल. आमचे हिंदु राष्ट्र धर्मनिरपेक्ष असेल !
– स्वा. सावरकर (संदर्भ : मासिक ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी विशेषांक २०१२)
हिंदूंनो, मनोराज्ये करायाची, तर अशी करा !
‘उज्जयिनी ही अखिल हिंदुसाम्राज्याची राजधानी झालेली असून तिच्यावर अप्रतिरथ असा तो कुंडलिनी कृपाणांकित हिंदुध्वज डुलत आहे ! नवे नवे भाऊसाहेब पेशवे, हरिसिंग नलवे, प्रतिचंद्रगुप्त, प्रतिविक्रमादित्य लक्ष लक्ष सैनिकांचे तुंबळ दळभार घेऊन ज्यांनी ज्यांनी आमच्या पडत्या काळात आमच्या हिंदुराष्ट्रास अवमानिले, दडपले, छळले त्यांच्या त्यांच्यावर चढाई करून चालले आहेत. त्यांची त्यांची रग जिरवून आणि सूड उगवून कुणी रुमशाम, तर कुणी लंडन गाठले आहे. कुणी लिस्बन, तर कोणी पॅरिस ! दिग्दिगंती हिंदु खड्गाचा असा दरारा बसला आहे की, हिंदुसाम्राजाकडे डोळा उचलून पहाण्याची कुणाची छातीच होऊ नये ! अद्ययावत यंत्रे, अद्ययावत तंत्रे, हिंदु विमानांचे आणि विमानांचे थवेच्या थवे आकाशात उंच उंच उडत आहेत. हिंदूंच्या प्रचंड रणभेरी पूर्व अन् पश्चिम समुद्रात (अरबी समुद्र हे नावसुद्धा पालटून) प्रचंड पाणतोफांचा खडा पहारा देत आहेत. हिंदु संशोधकांची वैमानिक पथके उत्तर ध्रुवावर नवनवे भूभाग शोधून त्यावर हिंदु ध्वज रोवत आहेत. ज्ञान, कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यक प्रभृती प्रत्येक कर्तृत्वक्षेत्रात सहस्रावधी हिंदू स्पर्धाळू वैश्विक उच्चांक पटकावत आहेत. लंडन, मॉस्को, पॅरीस, वॉशिंग्टनादी राष्ट्र प्रतिनिधींची दाटी हिंदु साम्राज्याच्या बलाढ्य राजधानीच्या त्या उज्जयिनीच्या महाद्वाराशी हिंदु छत्रपतींना आपापले पुरस्कार अर्पिण्यास्तव हाती उपायाने घेऊन वाट पहात उभी आहे. अरे मनोराज्येच करायची, तर अशी काही तरी करा !!’
– स्वा. सावरकर (१९३६ – समग्र सावरकर वाङ्मय, ३:४२०) (संदर्भ : ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २००९)