मुंबई महापालिकेची ‘ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा ३ वर्षांच्या आत बंद !

१३ कोटी ४६ लाख रुपये वाया !

मुंबई – नाल्यांमध्ये समुद्रातून वाहत येणारा तरंगता कचरा अडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘ट्रॅश ब्रूम’ (कचरा अडवणारी यंत्रणा) वापरले; पण ३ वर्षांच्या आतच ही यंत्रणा वारंवार नादुरूस्त होत होती. त्यामुळे अन्य ठिकाणी असे ‘ट्रॅश ब्रूम’ न बसवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या यंत्रणेसाठी ४५ कोटी २० लाख रुपये किमतीचे कंत्राट देण्यात आले होते. ‘ट्रॅश ब्रूम’ प्रणालीच्या स्थापनेची किंमत एकूण १३ कोटी ४६ लाख रुपये होती; मात्र आता हा निधी वाया गेला आहे. (यंत्रणा स्थापन करण्यापूर्वीच तिचा योग्य पद्धतीने अभ्यास केला नाही का ? कोट्यवधी रुपये वाया जाण्याला उत्तरदायी कोण ? त्यांच्याकडूनच हा पैसा वसूल करून घ्यायला हवा ! – संपादक)

भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्‍या, तसेच समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला.