स्वातंत्र्य मिळवून देण्यास कारणीभूत ठरलेली सावरकरांची सैन्य जागृती !
नेताजींशी भेट !
२२ जून १९४० या दिवशी नेताजी सुभाषचंद्र आणि वीर सावरकर यांची सावरकर सदनात (मुंबई) प्रदीर्घ भेट झाली होती. ती भेट वीर सावरकरांनी अनेक वर्षे गोपनीय ठेवली होती. वर्ष १९५२ च्या भाषणात सावरकरांनी त्या भेटीतील काही भाग प्रकटपणे सांगितला. त्या भेटीमध्ये सावरकरांनी नेताजींना सांगितले ‘‘मृत ब्रिटिश अधिकार्याचे दगडी पुतळे हालवून तुमच्यासारख्या पुढार्याने बंदीवासात पडणे, म्हणजे शत्रूला जे हवे तेच नेमके आपण होऊन करणे नव्हे काय ?’ जपान या वर्षाच्या आत युद्ध पुकारील, असा उत्कट संभव दिसत आहे. जर असे झाले, तर आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी-जपानच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांनिशी आणि लढाईत मुरलेल्या सहस्रो हिंदी सैनिकांनिशी हिंदुस्थानवर बाहेरून स्वारी करण्याची कधीही न आलेली सुवर्णसंधी आपणास साधू शकता.’’ त्याच भेटीत जपानमध्ये असलेल्या रासबिहारी बोस यांच्या पत्रव्यवहाराची माहिती सावरकरांनी सुभाषबाबूंना दिली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी विचारांनी प्रभावित झालेले नेताजी बोस !
सावरकरांनी सुभाषबाबूंना सल्ला दिला की, जर्मनी आणि इटली येथील ब्रिटीश सैन्यात अनेक हिंदुस्थानी सैनिक एकत्र करून आपण मोठे सैन्य सिद्ध करावे अन् स्वतंत्र हिंदुस्थानची घोषणा द्यावी. पूर्ण स्वराज्य घोषित करावे. ब्रिटिशांवर बर्मा (ब्रह्मदेश) आणि बंगालच्या उपसागरातून आक्रमण करावे. हिंदुस्थान स्वतंत्र होईल. सावरकरांच्या तेजस्वी विचारांनी सुभाषबाबू प्रभावित झाले. सशस्त्र क्रांती, सैनिकीकरणाने स्वातंत्र्य, जहालमतवाद, पराक्रम, आत्मरक्षण, ब्रिटिशांशी अहिंसेने तडजोड न करणे या काही सूत्रांवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी बोस यांच्यात एकमत झाले.’ – प्रा. गजानन नेरकर (संदर्भ : मासिक ‘स्वयंभू’, दिवाळी अंक २०१४)
इंग्रजांचे शत्रू असलेल्या जर्मनी आणि जपान या देशांशी संगनमत करून भारतावर आक्रमण करण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांना भारताबाहेर पाठवले. तेथे सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेने’ची निर्मिती केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तरुणांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन !
सावरकरांनी भारतातील हिंदु युवकांना इंग्रजांच्या सैन्यात मोठ्या संख्येने भरती व्हायला सांगितले. त्यामागील हेतू असा होता की, युद्धशास्त्रनीती आणि सैन्य संचलनाची विद्या आत्मसात् करून त्यांनी युद्धकलेत पारंगत व्हावे. तेव्हा लाखो हिंदू सैन्यात भरती झाले आणि तेथेही त्यांनी देशभक्तीचा प्रसार केला. (यापूर्वी सैन्यात केवळ मुसलमानच जायचे.) हेच सैन्य पुढे भारताला उपयोगी पडले. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या सैनिकीकरणाच्या चळवळीत युवा समाजाला संबोधतांना म्हणायचे, ‘‘तुम्ही भारतीय सेनेत भरती होऊन सैन्याचे प्रशिक्षण घ्या. त्यानंतर वेळ येताच तुम्ही स्वत: जाणाल की बंदुकीचे तोंड कोणत्या दिशेला करायचे !’’ सावरकरांचे उद्गार खरे ठरले. त्यानंतर भारतीय सैनिकांच्या बंदुकीचे तोंड इंग्रजांच्या दिशेने होते. पुढील घटनांवरून हे लक्षात येईल !
२५ जून १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस ‘आझाद हिंद’ रेडिओवरून म्हणाले, ‘‘बहुतांश काँग्रेस नेते भारतीय सेनेच्या सैनिकांना भाडोत्री म्हणून हिणवत असतांना वीर सावरकर निर्भयतेने भारतीय युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. याच सैनिकांमधून आपल्या भारतीय राष्ट्रीय सेनेला प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत.’’
ब्रिटन सरकारला हादरवणार्या भारतीय सैन्याच्या बंडाचे प्रेरणास्रोत !
१८ फेब्रुवारी १९४६ या दिवशी भारतीय नौसेनेच्या सैनिकांनी मुंबईमध्ये एच्.एन्.आय.एम्. येथे इंग्रजांविरुद्ध विद्रोह केला. हा विद्रोह नौसेनेची २२ जहाजे आणि तटावरील नौवाहिनी येथे पसरला. २१ फेब्रुवारी १९४६ ला बैठकीत नौसेनेच्या सैनिकांनी स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नांना आरंभ केला. कराचीतही विद्रोह चालू झाला. भारत ब्रिटनच्या सैनिकांवर तोफ चालवू लागला. ‘युनियन जॅक’ खाली उतरवला आणि तिरंगा, तसेच मुस्लिम लीगचा झेंडा फडकू लागला. मुंबई आणि कोलकाता यानंतर इतर शहरांमध्येही प्रतिवादाला आरंभ झाला. पोलीस चौकी, टपाल कार्यालय, ट्रॅम डेपो, मद्याची दुकाने जाळली जाऊ लागली. वाय.एम्.सी.ए.चे केंद्रही यांतून सुटू शकले नाही. एकूण ७८ जहाजे, २० आरमार आणि नौसेनेचे अनुमाने २० सहस्र सैनिक या विद्रोहात सहभागी झाले होते, तसेच मुंबई, मद्रास, पुणे आदी शहरांत भारतीय वायूसेनेच्या सैनिकांनी संप आरंभ केला. इंग्रज सरकार भारतीय सैनिकांच्या विद्रोहाने थरथर कापू लागले. ‘सेनेतीलही सावरकरीय जागृती ब्रिटीशांची मरणघंटा ठरली. मणीपुरात विजयध्वज रोवणारी आझाद हिंद सेना; मुंबई, कराची, देहली येथील वायूदलाचे बंड; मुंबईच्या नाविक दलाचा उठाव ही ज्वाला कराची, कोलकाता, रंगून येथपर्यंत पसरली. परिणामी ब्रिटीश सेनेने ‘राम’ म्हटला.
– डॉ. प्रकाश जाधव (श्रीगजानन आशिष, नोव्हेंबर २०१०)