सागरा प्राण तळमळला…
‘ब्रायटनच्या समुद्रकिनार्यावर ते दोघे उभे होते. सागराकडे बघतांना एका तरुणाचे डोळे भरून आले. किनार्यावरच त्याने बसकण मारली. दूर क्षितिजाकडे पहात तो पुटपुटू लागला. सोबतचा तरुणही खाली बसला. तो आपल्या मित्राकडे पाहू लागला. मित्राच्या दोन्ही नेत्रांतून मुक्तपणे अश्रू गळत होते. ‘मदनलालच्या फाशीमुळे आपला मित्र व्यथित झाला आहे’, हे त्या तरुणाला ठाऊक होते. तो हलकेच पुढे झुकला. आता मित्राच्या तोंडचे शब्द स्पष्ट ऐकू येऊ लागले… ‘ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला ।’… स्वा. सावरकरांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते. ते ऐकून निरंजन पाल अस्वस्थ झाले. भाषा समजत नसूनही कवीच्या मनाची तगमग त्यांना समजत होती. तो दिवस होता १०.१२.१९०९.
स्वा. सावरकरांचे हे गीत मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या गात्या गळ्याने अगदी आबालवृद्धांपर्यंत पोचवले. आज १०० वर्षे होऊन गेली, तरी हे गीत तितकीच अस्वस्थता निर्माण करते ! ज्येष्ठ गांधीवादी नेते काकासाहेब कालेलकर म्हणाले की, स्वा. सावरकरांनी केवळ हे गीत लिहून अन्य काही केले नसते, तरी ते गौरवास पात्र ठरले असते !