…गांधीवादाचा अस्त ?
देशाच्या संसदेच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन २८ मे २०२३ या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. विशेष म्हणजे हा उद्घाटन सोहळा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. हा निश्चितच योगायोग नाही. देशाच्या स्वातंत्र्यानंतर भारतावर काँग्रेसची एक हाती सत्ता राहिली आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या ७५ वर्षांच्या काळात तब्बल ६० वर्षे देशाचा कारभार काँग्रेसने चालवला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर सलग ३० वर्षे म्हणजे १९४७ पासून ते १९७७ पर्यंत देशाची एक हाती सत्ता काँग्रेसकडे होती. आजोबांपासून नातवापर्यंत नेहरू आणि गांधी घराण्याच्या ३ पिढ्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. यावरून देशावरील काँग्रेसच्या वर्चस्वाच्या प्रभावाची कल्पना येते. या कालावधीत देशातील शासकीय वास्तू, रस्ते, बगिचे, संस्था आदी सहस्रावधी ठिकाणांना नेहरू आणि गांधी यांची नावे देण्यात आली. ‘गांधी-नेहरू यांविना भारताचे अस्तित्व नाही’, असा मतप्रवाह देशात जाणीवपूर्वक निर्माण करून काँग्रेसने निवडणुकीत त्याचा लाभ घेतला. स्वपक्षाच्या प्रतिमेला तडा जाऊ नये, यासाठी काँग्रेसने प्रखर राष्ट्रवादी विचार असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेही खच्चीकरण केले. सावरकर यांनाच नव्हे, तर ज्यांनी ज्यांनी काँग्रेसच्या विचारधारेशी फारकत घेतली, अशा स्वत:च्या पक्षातील नेत्यांनाही काँग्रेसने दडपले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्याचेच उदाहरण आहे. काँग्रेसमध्ये राहूनही गांधी कुटुंबाची हांजी हांजी न करणारे वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, नरसिंहराव यांचे नावही काँग्रेस घेत नाही. गांधी आणि नेहरू यांच्या विचारांना मानण्यात काहीही गैर नाही; कारण लोकशाहीत हे अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र या विचारांना न मानणार्यांना काँग्रेसने दडपून टाकले, हे देशाच्या लोकशाहीसाठी घातक आहे. मागील काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल यांचे राष्ट्रीय स्तरावर पुतळे निर्माण करून त्यांच्या राष्ट्रवादी विचारांना देशापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी संसदेचे उद्घाटन होणे, हा ‘यापुढे देश त्यांच्या राष्ट्रवादी विचारांवर मार्गक्रमण करील’, हा स्पष्ट संदेशच नरेंद्र मोदी यांनी दिला आहे, हे भारतियांनी समजून घ्यावे.
एखादा पक्ष किंवा संघटना हे किती मोठा समूह आहे, यावर चालत नाही, तर ते विचारांवर चालते. पारतंत्र्याच्या काळात देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी विचारांचे नागरिक काँग्रेसमध्ये समाविष्ट झाले; मात्र स्वातंत्र्यानंतर या विचारांची जागा राष्ट्रवादाने घेतली असती, तर काँग्रेस दुर्बल झाली नसती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने गांधीवादाचा पुरस्कार केला खरा; परंतु मुळात ‘गांधीवाद’ या विचारधारेला कोणताही आधार नाही. ‘अहिंसा परमो धर्मः’ हा महाभारतातील अर्धवट श्लोक सांगून गांधींनी अहिंसेचे उदात्तीकरण केले. मुळात अहिंसा श्रेष्ठच आहे; पण तोपर्यंतच जोपर्यंत त्यामुळे कुणाचे वाईट होत नाही; पण एखादा मानव हा दानवासारखा वागण्यास प्रारंभ करतो तेव्हा अहिंसा सोडावीच लागते. या अर्धवट श्लोकाच्या आधारे गांधीवाद निर्माण झाला. प्रत्यक्षात व्यवहारातही या तथाकथित गांधीवादाचे मूल्य शून्य आहे.
गांधीवादाला तिलांजलीची आवश्यकता !
गांधीवादाच्या गप्पा मारणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत: मात्र त्याचा कधीच अंगीकार केला नाही. म. गांधी यांच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांवर अत्याचार करण्यात काँग्रेसजन आघाडीवर होते. देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने देशात शिखांचे हत्याकांड घडवून आणले. त्याच काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र ‘भारत जोडो’ यात्रेमध्ये जगाला प्रेमाने जिंकण्याच्या वल्गना करत होते. त्यांना खरोखरच प्रेमाच्या वल्गना करायच्या असतील, तर गांधी आणि इंदिरा यांच्या हत्येनंतर काँग्रेसने देशात केलेल्या दंगलीचा त्यांनी प्रथम निषेध करायला हवा. त्यामुळे ‘काँग्रेसचा गांधीवाद’ हा केवळ एक सत्ता मिळवण्याचे साधन झाला आहे. एखाद्या राक्षसाचा प्राण ज्याप्रमाणे एखाद्या पक्ष्यामध्ये असतो, त्याप्रमाणे काँग्रेसचे प्राणही गांधीवादामध्ये आहेत. त्यामुळे काँग्रेसला शक्तीहीन करण्यासाठी गांधीवाद संपवणे आवश्यक आहे.
गांधींचा बागुलबुवा !
जगात भारताची प्रतिमा मोहनदास गांधी यांच्यामुळे असल्याचा बागुलबुवा जाणीवपूर्वक निर्माण केला गेला. यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात उभारण्यात आलेला गांधींचा पुतळा, जागतिक परिषदांमध्ये गांधी यांचा यापूर्वी करण्यात येणारा गौरव आदी दाखले वेळोवेळी देण्यात येतात. येथे एक लक्षात घ्यायला हवे की, एखादा देश ज्याचे उदात्तीकरण करतो त्या देशाशी हितसंबंध प्रस्थापित करण्यासाठी त्या देशाच्या मानकांचा गौरव करावा लागतो. परराष्ट्र धोरणातील हे एक सर्वमान्य सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर असतांना, तसेच यापूर्वीही ज्या देशांचा दौरा केला त्या ठिकाणी गांधी यांचा गौरव करण्यात आला नाही; याचे कारण स्पष्ट आहे की, भारतात जोपर्यंत काँग्रेस सत्तेत होती, तोपर्यंत मोहनदास गांधी यांच्या कार्याचा गौरव करणे अन्य देशांसाठी लाभदायक होते.
एखाद्याची प्रतिमा खरोखरच भव्य असणे वेगळे आणि स्वार्थासाठी एखाद्याच्या प्रतिमेला भव्य दाखवले जाणे वेगळे. मुळात काँग्रेसचे नेतेही गांधी यांच्या विचारांवर चालत नाहीत. त्या काँग्रेसने राजकीय स्वार्थासाठी देशात गांधीवादाचा बागुलबुवा निर्माण केला आहे. स्वातंत्र्यविरांच्या जयंतीच्या दिवशी संसदेचे उद्घाटन हा गांधीवादाला सुरुंग आहे. केवळ इमारत बांधून एखादी विचारधारा संपत नसते. त्या जोडीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रवादी विचारांचा प्रचार सरकारने चालू केला आहे. त्यामुळे या लोकशाहीत लोकांनाच ठरवू द्या की, स्वातंत्र्यविरांचा प्रखर राष्ट्रवाद अंगीकारावा कि अर्धवट ज्ञानावरील गांधीवाद जोपासायचा ?