लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसला वापरता येणार नाही घड्याळ चिन्ह !
|
मुंबई, २७ मे (वार्ता.) – वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) हे ६ राष्ट्रीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत असणार आहेत.
मागील वर्षी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता होती; मात्र खासदार (पर्यायाने मताधिक्य) घटल्यामुळे या पक्षाची ‘राष्ट्रीय पक्ष’ ही मान्यता रहित झाली. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसला वर्ष २०२४ मधील लोकसभा निवडणूक त्याचे ‘घड्याळ’ हे चिन्ह वापरता येणार नाही. राष्ट्रीय पक्षांव्यतिरिक्त अन्य पक्षांना निवडणूक आयोगाकडून मिळणार्या चिन्हाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला जे चिन्ह मिळेल, त्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल.
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान ४ राज्यांमध्ये ६ टक्के मते मिळणे आवश्यक !
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी किमान ४ राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत ६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे किंवा किमान ४ लोकप्रतिनिधी लोकसभेत निवडून येेणे अपेक्षित आहे. शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किमान ३ राज्यांमध्ये लोकसभेच्या एकूण जागांपैकी २ टक्के जागा तरी निवडून येणे आवश्यक आहे किंवा किमान ४ राज्यांमध्ये राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. सध्या देशात असे केवळ ६ राजकीय पक्षच अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्रात राज्यपातळीवरील चारच पक्ष !
महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे चार पक्षच राज्यपातळीवरील पक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता आहे, त्यांना त्यांच्या अधिकृत पक्षचिन्हाद्वारे विधानसभेची निवडणूक लढवता येते. ‘राज्यपातळीवरील पक्ष’ म्हणून मान्यता प्राप्त होण्यासाठी विधानसभेच्या निवडणुकीत एकूण मतदानाच्या किमान ८ टक्के तरी मते त्या पक्षाला मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता नसलेल्या पक्षांना मात्र राज्यपातळीवर निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागते.