सद्गुरु नंदकुमार जाधव घेत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संगामुळे साधकाला झालेले लाभ आणि त्याने अनुभवलेली गुरुकृपा !
‘सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपाय सत्संग घेण्याच्या आधीपासून साधक वैयक्तिक स्तरावर नामजपादी उपाय करत होते. त्याचा लाभ होतच होता; मात्र सद्गुरु जाधवकाकांनी नियमितपणे चालू केलेल्या उपाय सत्संगामुळे या जिवाला ‘न भूतो न भविष्यति !’ असे लाभ झाले.
१. उपाय सत्संगात देवीकवच आणि त्यानंतर ‘रामरक्षाकवच’ (टीप) म्हटले जाते. साधकांकडून भावपूर्ण प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त केल्या जातात. त्यामुळे माझे मन आणि बुद्धी यांची धारणा सत्त्वगुणी होण्यास साहाय्य होऊन माझ्यातील सात्त्विकता वाढली.
टीप – साधक श्रीरामरक्षास्तोत्रातील ‘शिरो मे राघवः पातु ….. ते पादौ बिभीषणश्रीदः, पातु रामोऽखिलं वपुः । हे श्लोक म्हणतात आणि या श्लोकांत वर्णन केल्यानुसार शरिराच्या संबंधित अवयवांवर उजव्या हाताची पाचही बोटे जुळवून ठेवतात. साधक अवयवांचे रक्षण होण्यासाठी श्रीरामाला प्रार्थना करतात.
२. साधकांकडून ‘हनुमंत त्यांची मानस दृष्ट काढत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करून घेतला जातो. मी करत असलेल्या या भावजागृतीच्या प्रयोगामुळे मला होणारा अनिष्ट शक्तींचा त्रास न्यून होऊन मला हलकेपणा जाणवला. मला शांती अनुभवायला आली. माझ्या हृदयाचे शस्त्रकर्म झाले आहे. मागील वर्षापासून माझ्या शरिरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित आहे. त्यामुळे मला उत्साही वाटते.
३. पौर्णिमा आणि अमावास्या या दिवशी माझ्या शारीरिक त्रासांत वाढ होऊन मला ३ – ४ दिवस त्रास जाणवायचा. ‘त्याचे प्रमाण ५० टक्के न्यून झाले आहे’, असे मला जाणवते.
४. माझा नामजप अधिकाधिक भावपूर्ण आणि ६ – ७ घंटे होऊ लागला.
५. मला देवाचे अस्तित्व अधिक प्रमाणात जाणवू लागले.
६. मला आध्यात्मिक बळ आणि चैतन्य मिळाल्यामुळे गुरुमाऊलींच्या कृपेने ४ – ५ घंट्यांत १० ते १२ दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांचे नूतनीकरण करता आले. त्यामुळे माझ्या आनंदात वृद्धी झाली आणि मला अधिकाधिक अनुसंधानात रहाता आले.
७. मनःशक्ती आणि ब्रह्मांडातील इच्छाशक्ती यांच्या बळावर वातावरणाची शुद्धी झाली. मी व्यायामाला नामस्मरणाची जोड दिल्याने मला नाशिक येथे झालेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गुरुमाऊलींच्या कृपेने यश प्राप्त करता आले. (वर्ष २०२२ मध्ये झालेल्या स्पर्धेतील वय ७० ते ८० वर्षे या वयोगटात)
‘गुरुमाऊलींनीच वरील विचार सुचवले आणि लिहून घेतले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. अनिल पाटील (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७६ वर्षे), नाशिक (१६.४.२०२३)
|