हिंदु राष्ट्रासाठी संघटित प्रयत्न करण्याचा हिंदूंचा संकल्प !
नागपूर – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त श्री सिद्ध हनुमान मंदिर, लक्ष्मीनगर येथून भव्य ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेकडो हिंदूंनी हिंदु राष्ट्रासाठी एकत्र येण्याचा संकल्प केला आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे व्रत घेतले. दिंडीत विविध संप्रदायांतील भाविक, ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, साधक सहभागी झाले होते.
अखिल भारतीय सरयुपारीण ब्राह्मण महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र यांच्या शुभहस्ते ब्रह्मध्वज आणि पालखीचे पूजन करण्यात आले. शंखनादाने दिंडी आरंभ झाली. दिंडीत धर्माभिमानी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिंडीतील पालखीतील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दिंडीत अग्रस्थानी ब्रह्मध्वज, त्यानंतर पालखी, हातात भगवा ध्वज घेऊन रणरागिणी पथक, विविध संघटनांचे कार्यकर्ते, बालसाधकांचे वाहनातील पथक सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते. दिंडीमार्गात समाजातील नागरिक, धर्मप्रेमी ब्रह्मध्वज आणि पालखीला नमस्कार करत होते. श्री सिद्ध हनुमान मंदिर समितीने या आयोजनामध्ये विशेष सहयोग दिला.
अखिल भारतीय सरयुपारीण ब्राह्मण महासंघाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्री. रामनारायण मिश्र, सर्व भाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष श्री. अनिल शर्मा आणि सचिव डॉ. राजेंद्र दीक्षित, श्रीराम मंदिर रामनगरचे विश्वस्त श्री. विनोद जोशी, माऊली बहुउदेशीय मंडळाच्या सौ. भावना कन्हेरे, सौ. रश्मी सेलोकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल अर्वेनला आदी मान्यवर उपस्थित होते. दुपारी पुष्कळ ऊन असूनही सर्वांनी दिंडीत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.