नागपूर येथे १ मासाच्या बाळाची हत्या केल्याप्रकरणी आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा !

प्रतीकात्मक छायाचित्र

नागपूर – शहरातील साळी येथील अवघ्या १ मासाच्या बाळाची चाकूने भोसकून हत्या करणार्‍या क्रूरकर्मा आरोपी गणेश बोरकर (वय ४० वर्षे) याला जिल्हा सत्र न्यायाधीश एस्.एम्. अली यांनी २४ मे या दिवशी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी बोरकर हा तक्रारदार रूपाली यांच्या मोठ्या बहिणीचा पती आहे.

रूपाली या बाळंतपणासाठी माहेरी आल्या होत्या. रूपाली यांची मोठी बहीण प्रतिभा यांचा पती गणेश हा आरोपी आहे. तो घरी येऊन त्याने सासरच्या लोकांना त्याची पत्नी प्रतिभा हिला सासरी का पाठवत नाही ? याचा राग मनात धरून भांडण करत होता. भांडणाच्या वेळी रूपाली एका मासाच्या बाळाला घेऊन आरोपीला समजावण्यासाठी गेली होती. त्या वेळी आरोपीने त्यांच्या लहान बाळाला चाकूने भोसकून ठार केले. सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार पडताळण्यात आले. आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्यामुळे न्यायमूर्ती अली यांनी आरोपीला भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२ अन्वये आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारच्या वतीने साहाय्यक सरकारी अधिवक्ता पंकज तपासे यांनी बाजू मांडली.