सकारात्मक राहून प्रसंगातून शिकणारे आणि अभ्यासपूर्ण सेवा करणारे ऋषितुल्य सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७१ वर्षे) !
उद्या ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२८.५.२०२३) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी धर्मप्रचारासाठी जे सद्गुरु दिले आहेत, ते साक्षात् ऋषितुल्य आहेत. त्यांचे बोलणे, चालणे, हसणे किंवा त्यांची प्रत्येक कृती आदर्श आणि ‘साधकांच्या उद्धारासाठी आहे’, हे लक्षात येते. गेली काही वर्षे मी जळगाव येथे प्रसारसेवेसाठी रहात आहे. या काळात मला सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या सान्निध्यात धर्मप्रसाराची सेवा करण्याची संधी मिळाली. भगवंताच्या कृपेने त्यांच्या सहवासात असतांना मला जाणवलेली त्यांची काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.
१. आदर्श दिनचर्या
मी त्यांना गेली अनेक वर्षे पहात आहे. त्यांचा दिनक्रम कधीही चुकत नाही. रात्री कितीही उशीर झाला, तरीही ते पहाटे ठरलेल्या वेळीच उठतात. योगासने आणि सकाळचे सर्व नामजपादी उपाय लवकर करून ते साधकांचे व्यष्टी आढावे घेण्यासाठी सिद्ध असतात. जळगाव येथे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही पुष्कळ कडक असतात; पण या वातावरणाचा त्यांच्या दिनक्रमावर कधी परिणाम होत नाही. आम्हा तरुणांनाही लाजवेल, अशी त्यांची दिनचर्या आदर्श आहे.
२. नेहमी सकारात्मक आणि शिकण्याच्या स्थितीत असलेले अन् इतरांना तसे रहायला सांगणारे सद्गुरु नंदकुमार जाधव !
२ अ. एका साधकाने त्याचे नियोजन सद्गुरु नंदकुमार जाधव यांना त्वरित न सांगितल्यावर त्यांनी ‘माझाच प्रेमभाव न्यून पडत आहे, तो वाढवण्याचे प्रयत्न करतो’, असे सांगणे : जळगाव येथील एका साधकाने एका महत्त्वाच्या सेवेविषयी निर्णय घेण्यासाठी एका संतांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर ३ – ४ दिवसांनी त्या साधकांशी संपर्क झाल्यावर मी त्या साधकाला विचारले, ‘‘हे नियोजन तू सद्गुरु जाधवकाकांना सांगितले आहेस का ?’’, तेव्हा तो म्हणाला, ‘‘१ – २ दिवसांत सांगतो.’’
माझ्यातील स्वभावदोषांमुळे माझ्या मनात लगेच प्रतिक्रिया आली, ‘त्याने लगेच हे नियोजन सद्गुरु काकांना सांगायला हवे होते.’ हा प्रसंग आणि माझ्या मनातील प्रतिक्रिया मी सद्गुरु जाधवकाकांना सांगितली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझाच प्रेमभाव अल्प पडतो; म्हणून त्या साधकाला मला लगेच सांगावेसे वाटले नसेल. आता मी माझ्यातील प्रेमभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करतो.’’
त्यांच्या या उत्तरातून मला ‘आपली स्वतःला पालटण्याची तळमळ किती वाढायला हवी ?’, हे शिकायला मिळाले.
२ आ. ‘साधकाने प्रसंगातून शिकून स्वतःमध्ये पालट करावा’, यासाठी भगवंत प्रसंग घडवतो’, असे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी प्रेमाने सांगणे : सद्गुरु काका साधकांच्या साधनेचा आढावा घेतात. प्रत्येक वेळी ते प्रेमाने सांगतात, ‘साधकांनी स्वतःला पालटावे’, यासाठी देव हे प्रसंग घडवत असतो.’
त्यांच्या या मार्गदर्शनामुळे हळूहळू माझ्यात तशी दृष्टी निर्माण होण्यास आणि प्रसंगात अडकून न रहाता किंवा प्रसंगाचा त्रास करून न घेता त्यातून शिकून पुढे जाण्याचे माझे प्रयत्न चालू झाले. ते केवळ इतरांना हे दृष्टीकोन सांगत नसून त्यांनी ते स्वतः आत्मसात् केले आहेत आणि कृतीतही आणले आहेत, हे वरील प्रसंगातून लक्षात येते.
३. प्रीती
सद्गुरु काकांचे मागील काही वर्षांपासून गुडघमे प्रचंड दुखतात. जळगाव सेवाकेंद्रात सद्गुरु काकांचे निवासस्थान पहिल्या माळ्यावर आहे. प्रसारातील कुणी साधक सेवाकेंद्रात आले, तर सद्गुरु काका त्यांना भेटण्यासाठी तळमजल्यावरील सभागृहात येतात. तसेच समाजातील काही जिज्ञासूंना भेटण्याचे नियोजन करण्यास ते स्वतःहून सांगतात.
४. सेवेची तळमळ
४ अ. विषयाच्या अनुषंगाने अभ्यास करून वेगवेगळी उदाहरणे देऊन विषय स्पष्ट केल्यामुळे तो विषय श्रोत्यांच्या स्मरणात रहाणे : सद्गुरु काका गेली अनेक वर्षे प्रसारसेवेत आहेत. त्यांनी प्रसारातील सर्व प्रकारच्या सेवा केल्या आहेत. असे असले, तरी ते आजही प्रत्येक वेळी कोणताही कार्यक्रम असो, अगदी एखादे प्रवचन असले, तरी ते प्रवचनात घ्यावयाच्या विषयाचा अभ्यास करतात. प्रवचनात नवनवीन उदाहरणे देता येण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. त्यांच्यातील चैतन्यामुळे आणि त्यांनी विषय घेण्यासाठी घेतलेल्या अपार कष्टामुळे त्यांचा विषय पुष्कळ प्रभावी होतो. श्रोते मन लावून त्यांचे बोलणे ऐकतात. त्यांनी सांगितलेली सूत्रे अनेक वर्षांनंतरही श्रोत्यांच्या लक्षात रहातात.
४ आ. साधकांनी सत्संगात सांगितलेली सूत्रे लिहून घेऊन त्यांचा अभ्यास करून ती सूत्रे सत्संगात सांगून साधकांना प्रोत्साहन देणे : गेले काही मास साधकांसाठी साप्ताहिक गुरुमहिमा सत्संग घेतला जातो. सद्गुरु काका या सत्संगात घ्यावयाच्या सूत्रांचा अभ्यास करतात. सत्संगात विविध साधक त्यांचे साधनेतील अनुभव सांगत असतांना सद्गुरु काका ते लिहून घेतात आणि सत्संगात ती सूत्रे सांगून इतर साधकांना साधनेसाठी प्रोत्साहित करतात.
५. अनुभूती – सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांना सेवेतील अडचणी केवळ सांगितल्यावर दूर होणे
परात्पर गुरु डॉ आठवले यांनी संत होण्याचे महत्त्व उद्धृृत करतांना सांगितले होते, ‘संत झाल्यावर केवळ विचार केला, तरी कार्य होते.’ याची प्रत्यक्ष अनुभूती मला सद्गुरु जाधवकाका यांच्या सान्निध्यात बर्याच वेळा आली आहे. एकदा आम्ही अधिवक्ता असलेल्या साधकाला एका विधीविषयक सेवेसाठी संपर्क करण्याचा अनेक दिवस प्रयत्न करत होतो; पण संपर्क होत नव्हता. एकदा शेवटचा प्रयत्न करून पाहूया आणि ‘संपर्क होण्यात अडचण येते, असे सद्गुरु काकांना सांगूया’, असा विचार करून त्या अधिवक्त्यांना संपर्क केला. तेव्हाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याविषयी सद्गुरु काकांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘आता भ्रमणभाष लावून पहा.’’ पुन्हा संपर्क केल्यावर तो संपर्क यशस्वीपणे होऊन ती सेवाही पूर्ण झाली. अशा अनुभूती आम्ही अनेक वेळा घेतल्या आहेत.
६. कृतज्ञता आणि प्रार्थना !
‘गुरुदेव, देहधारी सद्गुरूंना ओळखण्यात आम्ही अल्प पडतो. हे सद्गुरु केवळ ऋषितुल्य नसून साक्षात् ऋषिच आहेत. आपल्या कृपेमुळे त्यांचे अनमोल मार्गदर्शन आणि त्यांचा अमूल्य सहवास आम्हाला लाभत आहे. यासाठी ‘आमच्याकडून प्रत्येक श्वासागणिक कृतज्ञता व्यक्त करवून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे !’
– श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव (५.६.२०२२)