पोलीस शिपायाची पोलीस दलातून कायमची हकालपट्टी !
नागपूर येथे न्यायाधिशांचे वाहन चालवल्याचे प्रकरण
नागपूर – उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या बंगल्यातून न्यायाधिशांचे चारचाकी वाहन काढून शहरात फेरफटका मारल्याप्रकरणी पोलीस शिपाई अमित झिल्पे याची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलीस दलातून थेट हकालपट्टी केली आहे.
अमित झिल्पे उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधिशाच्या बंगल्यावर सुरक्षारक्षक म्हणून तैनात होता. ‘मध्यरात्रीनंतर न्यायाधिशांना कळणार नाही’, असा विचार करून त्याने न्यायाधिशांचे खासगी चारचाकी वाहन शहरात नेले. या वेळी न्यायाधिशांच्या निवासस्थानी सुरक्षेसाठी कुणीही नव्हते. एका विजेच्या खांबावर न्यायाधिशांची आलिशान गाडी ठोकली गेली. त्यामध्ये वाहनाची प्रचंड हानी झाली. अमित याने घाबरून गाडी बंगल्यात नेहमीच्या ठिकाणी आणून ठेवली. दुसर्या दिवशी सकाळी न्यायाधिशांनी गाडीची दुर्दशा पाहिल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळवले. पोलीस चौकशीच्या वेळी अमित याने ‘मीच वाहन बंगल्याबाहेर नेले होते’, असे सांगितले.