परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधना आणि सात्त्विकता या दृष्टीतून शिकवलेली शिवणकला !
शिवणाच्या संदर्भात प्रत्येक कृती करतांना ती सात्त्विक व्हावी; यासाठी सौ. पार्वती जनार्दन यांनी किती प्रयत्न केले, हे पुढील लेखावरून लक्षात येईल. सौ. पार्वती जनार्दन यांनी सर्व साधकांपुढे एक आदर्शच ठेवला आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढ थोडे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले (२१.५.२०२३) |
‘अन्न,वस्त्र आणि निवारा या मनुष्याच्या मूलभूत आवश्यकता आहेत. प्राचीन काळात झाडांच्या साली किंवा पाने जोडून त्याचा वस्त्र म्हणून वापर करत असत. पुढे हळूहळू नागरिकता वाढत गेल्यानंतर त्यात पालट होऊन साडी किंवा धोतर असे अखंड कापड वापरले जात होते. काळाप्रमाणे त्यातही पालट होऊन अखंड कापड कापून त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने कपडे शिवून ते वापरण्याची पद्धत आली. तेवढ्यावरच सीमित न रहाता आता विविध प्रकारच्या आकारात त्यातही ‘फॅशन’च्या नावाखाली चित्र-विचित्र पद्धतीने कपड्यांची शिलाई केली जात आहे’, हे आपण पहातच आहोत.
‘कपडे मापानुसार शिवणे आणि ‘डिझाईन’ करणे’, हीसुद्धा एक कलाच आहे. शिवणकला ही हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या ६४ कलांपैकी एक कला आहे. ‘व्यक्ती शिवणकलेतूनही ईश्वरप्राप्तीचे ध्येय कसे साध्य करू शकते ? कपडे सात्त्विक पद्धतीने कसे शिवू शकते आणि सात्त्विक कपडे घातल्याने व्यक्तीला काय लाभ होतो ?’, याचा अभ्यास करण्याचा मी छोटासा प्रयत्न केला आहे.
कलेच्या माध्यमातून साधना करतांना श्री गुरूंच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मी कपडे शिवण्याच्या संदर्भातील अभ्यास करतांना प्रथम पुरुष वापरत असलेला सदरा (कुर्ता) आणि बंडी यांचा अभ्यास केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला त्यांच्या कपड्यांवर अभ्यासासाठी प्रयोग करायला सांगितला. प्रत्येक वेळी सदरा किंवा बंडी शिवून झाल्यावर ते ‘त्यात काय सुधारणा करायला हव्यात ?’, यावर ते आम्हाला मार्गदर्शन करत होते. त्यांनी ‘केवळ स्थुलातून न पहाता सूक्ष्मातून काय जाणवते ?’, याचाही आमच्याकडून अभ्यास करून घेतला.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्यांच्या अमृत महोत्सवाच्या सोहळ्यात घालण्यासाठी सदरा आणि पायजमा शिवतांना जाणवलेली सूत्रे !
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी त्यांना अपेक्षित असा सदरा आणि पायजमा शिवतांना श्रीकृष्णाला पूर्ण शरण जाऊन प्रार्थना करून शिवणे : वर्ष २०१७ मध्ये परात्पर गुरुदेवांचा (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा) अमृत महोत्सव (७५ वा वाढदिवस) होणार होता. त्यासाठी मला त्यांच्यासाठी पांढरा सदरा आणि पायजमा शिवायचा होता. श्री. अशोक सारंगधरकाकांनी मला परात्पर गुरुदेवांच्या मापाचे कापड कापून दिले. मी पहिल्यांदाच परात्पर गुरुदेवांसाठी सदरा शिवत होते. मी इतर कपडे शिवले आहेत; पण कधी सदरा आणि पायजमा शिवला नव्हता. त्यामुळे ‘परात्पर गुरुदेवांसाठी सदरा आणि पायजमा शिवायचा आहे, तर तो परिपूर्ण व्हायला पाहिजे’, यासाठी मी श्रीकृष्णाला शरण जाऊन सदरा शिवायला घेतला.
१ आ. अनुभूती – कपड्यावर जिथे शिवण घालायची आहे, तिथे काढलेली नसूनही रेष दिसणे, त्या रेषेवर शिवत गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित असा सदरा-पायजमा शिवला जाणे : मी साधनेत येण्याअगोदर काही वर्षे दुकानात कपडे शिवण्याचे काम केले होते; पण शिवणाला अध्यात्माची जोड देऊन मी प्रथमच सदरा शिवत होते. तो शिवतांना जिथे शिलाई घालायला पाहिजे, तिथे मला रेष दिसायची आणि मी त्यावरून टीप घालायचे. ‘शिलाई घालण्याच्या ठिकाणी रेष दिसणे’, ही माझी पहिली अनुभूती आहे. त्यामुळे तो सदराही परात्पर गुरुदेवांना अपेक्षित असा शिवला गेला. आताही मधे मधे मला अशी अनुभूती येते.
१ इ. या वेळी ‘कापडाची निवड करण्यापासून ते न्यूनतम शिलाई घालून कपडे शिवणे’, असा अभ्यास करायला आरंभ होणे : यानंतर आम्हा साधकांचा शिवणाला अध्यात्माची जोड देऊन सेवा करण्यास आरंभ झाला. ‘चित्रीकरण करतांना किंवा छायाचित्रामध्ये घातलेले कपडे व्यवस्थित दिसावेत’, या दृष्टीनेही अभ्यास चालू झाला. त्यासाठी ‘सदर्याला सुरकुत्या पडणार नाहीत, असे कापड निवडणे, चुण्या पडू नयेत आणि गळ्याचा गोल आकार योग्य होण्याच्या दृष्टीने शिवणे’, अशा बर्याच बारकाव्यांचा त्यात अभ्यास केला गेला. शिलाई घालतांना कपड्याला सुईमुळे भोके पडून रजोगुण वाढतो. त्यामुळे न्यूनतम शिलाई असलेले कपडे कसे सिद्ध करू शकतो ?’, असा अभ्यास केला.
अशा प्रकारे श्री. अशोक सारंगधर, सौ. केतकी पेडणेकर आणि मी (सौ. पार्वती जनार्दन) आम्ही तीन जणांनी शिवणाचा अभ्यास केला. योग्य कापड निवडण्याच्या संदर्भातील अभ्यास श्रीमती क्षमा राणेकाकू, सौ. जान्हवी शिंदे आणि चित्रीकरण करणारे श्री. मेहूल राऊत करायचे.’
– सौ. पार्वती जनार्दन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ३३ वर्षे) (२१.५.२०२१)