कर्नाटकातील हिंदू जात्यात !
कर्नाटकमध्ये नवे सरकार आले आणि कामकाजाची लगबग चालू झाली. ‘मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार असतांना कामकाजाची दिशा कशी असणार ?’, हे वेगळे सांगायला नको. अगदी तद्वतच घडत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या बैठकीत ‘आमच्या सरकारमध्ये आम्ही पोलीस खात्याचे भगवेकरण होऊ देणार नाही’, असे विधान उपमुख्यमंत्र्यांनी नुकतेच केले. ‘आमच्या सरकारमध्ये सर्व काही स्वच्छ असले पाहिजे. लोकांना त्रास होऊ नये, असे काम करणे पुरेसे आहे. तुमचे पूर्वीचे वर्तन आमच्या सरकारला मान्य नाही. तुम्ही माझ्यासमवेत आणि सिद्धरामय्या यांच्या समवेत कसे वागलात ?, हे मला ठाऊक आहे. हे सर्व आमच्या सरकारमध्ये चालणार नाही. आम्ही द्वेष करत नाही’, असेही ते या वेळी म्हणाले. ही सगळी वाक्ये म्हणजे ‘बोलाची कढी आणि बोलाचाच भात’ असा प्रकार होय ! जनता हे सर्व ओळखून आहे. काही काळाने या पोलिसांना त्यांचा गणवेश इस्लामी पद्धतीनुसार घालावा लागण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. कदाचित् मंत्रीमहोदय त्यांना दाढीही ठेवायला सांगतील. त्यामुळे कर्नाटकातील पोलिसांनी भवितव्याचा विचार करावा. ‘भगवेकरण’ या शब्दाचा अर्थ उपमुख्यमंत्र्यांना ठाऊक तरी आहे का ? कारण पोलीसदलाचे भगवेकरण झाले असते, तर इतक्या मोठ्या प्रमाणात कर्नाटकमध्ये हिंदूंच्या हत्या झाल्या नसत्या आणि आतापर्यंत त्या करणार्यांना कठोर शिक्षाही झाली असती; पण आता भगवेकरण होणार नाही, म्हणजे हिरवेकरण होईल, यात कुणालाही शंका नाही. हिंदूंनो, हा प्रारंभ आहे. कर्नाटकात पोलीस खात्याचे हिरवेकरण झाल्यास हिंदूंसाठी ती दडपशाहीच ठरेल, हे निश्चित !
कोणता रंग हवा ?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार दोघेही हिंदु धर्मविरोधी असल्याने येत्या काळात काय काय पहावे लागणार आहे ?, यासाठी हिंदूंनी मनाची आताच सिद्धता करून ठेवावी ! उपमुख्यमंत्रीपदावर बसण्यापूर्वीच शिवकुमार यांनी टिपू सुलतानच्या थडग्याचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला. ही घटना काय सांगते ? ज्या टिपूने एका दिवसात ५० सहस्र हिंदूंचे धर्मांतर केले, त्याच टिपूच्या समाधीचे दर्शन घेणार्या उपमुख्यमंत्र्यांची विचारधारा कशी असेल?, याची पूर्वकल्पना येते. सरकारचा कार्यकाळ चालू होत नाही, तोच शिवकुमार यांनी स्वतःचे रंग दाखवायला प्रारंभ केला आहे. ‘आपल्याला हवा असलेला तो रंग हाच आहे का ?’, हे सूज्ञांनी ओळखावे !
हिंदुविरोधाला मान्यता (?)
‘भाजपची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेत आल्यावर आम्ही सचिवालय गोमूत्राने स्वच्छ करू आणि श्री गणेशाची पूजा करू’, असे विधानही शिवकुमार यांचेच ! ज्यांच्या सत्ताकाळात मोठ्या प्रमाणात गोवंशियांच्या हत्या करण्यात आल्या, त्यांच्याच गोमूत्राने सचिवालय स्वच्छ करण्याची भाषा करणे हा किती विरोधाभास होय ! अनेक हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या रक्ताने ज्या सरकारचे हात माखलेले, बरबटलेले आहेत, त्यांनी गोमूत्राने कितीही शुद्धी केली, तरी ते पाप तर धुतले जाणारच नाही, हे शिवकुमार यांनी लक्षात ठेवावे. बोलण्याचे भान आणि स्वतःच्याच तत्त्वांशी बांधीलकी नसणारे असे उपमुख्यमंत्री राज्यकारभार कसा करतील ?, हे येत्या काळात समजेलच. केवळ इस्लामी तत्त्वांना जुमानणारे आणि हिंदुत्वाला तिलांजली देणारे उपमुख्यमंत्री कर्नाटकमध्ये असल्याने ‘आता हिंदूंच्या ताटात पुढे आणखी काय वाढून ठेवले आहे ?’, याचा विचारच न केलेला बरा; मात्र याचा विचार करणेही क्रमप्राप्त आहे; कारण आता हिजाबवरील बंदी उठवली जाईल, गोवंशियांच्या हत्यांच्या घटना वाढतील, मुसलमानांसाठी हितावह होणारे; पण हिंदूंना अन्यायकारक ठरणारे अनेक निर्णय घेतले जातील. धोक्याची घंटा आता वाजली आहेच, त्यात भर म्हणून कि काय, भारत आणि हिंदुविरोधी मानवाधिकार संघटना ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’ची भारतीय शाखा ‘ॲम्नेस्टी इंडिया’ने कर्नाटकातील नवनिर्वाचित काँग्रेस सरकारला हिंदुविरोधी मागण्यांची सूची दिली आहे. या मागण्या लवकरच मान्य होण्याची शक्यताही संभवते; कारण हिंदुविरोधी असलेले सर्व काही मान्य किंवा लागू करणे हे काँग्रेस सरकारचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या मागण्या सत्यात उतरल्यास नवल वाटायला नको. गोहत्या आणि धर्मांतर बंदी कायदे रहित करण्याची ‘ॲम्नेस्टी इंडिया’ची मागणी मान्य झाली, तर कर्नाटक राज्यातील हिंदू जात्यात असतील ! हे सर्वच भयावह आहे.
कर्नाटकात हिंदुद्वेषी आणि राष्ट्रघातकी काँग्रेसवाल्यांना जनतेने सत्तेत बसवले आहे. याची फळे भोगावी लागणार आहेत; पण म्हणून हातावर हात ठेवून गप्प बसणे, असे हिंदूंनी करू नये. कर्नाटकमध्ये एखादा जरी राष्ट्रघातकी निर्णय घेतला गेला, तर हिंदूंनी वेळीच संघटित होऊन एकमुखाने त्या निर्णयाला वैध मार्गाने विरोध करावा. कर्नाटकातील हिंदू कृतीशील झाले नाहीत, तर येत्या काळात त्यांचे तेथील वास्तव्य प्रतिकूल ठरू शकते. याआधीच्या भाजप शासनाने कर्नाटकमधील विधानसभेच्या सभागृहामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र लावले होते; पण तेव्हाचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म. गांधी यांच्या हत्येत सहभाग असल्याने सावरकर हे वादग्रस्त व्यक्तीमत्त्व असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात न्यायालयाने सावरकरांना गांधी हत्येच्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलेले आहे; पण हिंदुद्वेष नसानसांत भिनलेला असतांना याहून वेगळे काय होणार ? सत्तेत नसल्याने केवळ विरोध केला गेला; पण आता सत्तेमुळे सर्व अधिकार हाती आले असल्याने ‘सरकार गतीमान होऊन हिंदुविरोधी पावले टाकेल’, हे आतापर्यंतचा काँग्रेसचा इतिहास सांगतो. हिंदू आणखी किती दिवस केवळ स्वतःचा गौरवशाली इतिहास सांगत बसणार ? आता नवा आणि गौरवशाली इतिहास लिहिण्याची वेळ आली आहे केवळ कर्नाटकच नव्हे, तर भारतभरात प्रभावी हिंदूसंघटन उभारून राजकारण्यांना हिंदुहितकारक निर्णय घेण्यास भाग पाडावे. या प्रभावी संघटनाचा आरंभ कर्नाटकातून व्हायला हवा, हे मात्र निश्चित !
कर्नाटकात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक ! |