छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्याप्रकरणी ४ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद !
उपाहारगृह मालक आणि कामगार यांना मारहाण करून उपाहारगृहाची तोडफोड करणार्या धर्माधांवर गुन्हा नोंद !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड शहरातील ह.मु. शिवाजीनगर येथील रहिवासी सुनील वडगावकर यांच्या वाढदिवस होता. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा आणि अफझलखान अन् औरंगजेब यांच्या विरोधात घोषणा दिल्याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी सुनील वडगावकर, संदीप पिसाळ, विजय अण्णा जंजाळ आणि आकाश माने या हिंदु तरुणांच्या विरोधात सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. त्याचप्रमाणे वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या ‘कस्तुरी’ उपाहारगृहाची तोडफोड करून उपाहारगृहाचे मालक आणि कामगार यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांधांवर गुन्हे नोंद केले आहेत. तथापि तक्रारीत धर्मांधांची संख्या दिलेली नाही. ही घटना २० मेच्या रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली, तर गुन्हे २१ मे या दिवशी नोंदवण्यात आले आहेत.
१. २० मे या दिवशी सुनील वडगावकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यासमवेत त्याचे मित्र संदीप पिसाळ, विजय जंजाळ आणि आकाश माने हे सर्वजण भोकरदन नाका ते छत्रपती संभाजीनगर नाका येथील रस्त्यावर असलेले कस्तुरी उपाहारगृहाच्या छतावर वाढदिवस साजरा करत होते.
२. त्या वेळी त्यांनी मोठ्याने गाणी म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर त्यांनी अफझलखान आणि औरंगजेब यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
३. त्यामुळे या घोषणा ऐकून उपाहारगृहाच्या पाठीमागील चर्चपरिसर वस्तीतील मुसलमान मुलांनी उपाहारगृहाच्या छतावर दगडफेक केली. (छत्रपतींच्या घोषणा आणि मोगलांच्या विरोधात घोषणा दिल्यामुळे धर्मांधांचे पित्त खवळते यातून ते मोगलांचे समर्थक असल्याचे सिद्ध करत नाहीत का ? अशांविरुद्ध कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक)
४. नंतर वाढदिवस साजरा करणारी मुले निघून गेली; परंतु त्यांच्या घोषणामुळे २ समाजात तेढ निर्माण होऊन शत्रुत्वाची भावना निर्माण झाल्याने ४० ते ५० मुसलमान मुलांनी उपाहारगृहाचे मालक आणि कामगार यांना मारहाण करून उपाहारगृहातील आसंदी आणि पटल यांची तोडफोड करून प्रचंड हानी केली.
५. या प्रकरणी कस्तुरी उपाहारगृहाचे मालक नामदेव खिरडकर (वय ४५ वर्षे) यांच्या तक्रारीवरून धर्मांधांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच मोठ्यांनी घोषणा देऊन हिंदु-मुसलमान समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी वरील ४ हिंदु तरुणांच्या विरोधात भा.दं.वि. संहिता कलम १५३ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
६. विशेष म्हणजे पोलीस हवालदार रामानंद बुधवंत यांनी स्वतः ४ हिंदु तरुणांच्या विरोधात तक्रार केली आहे. त्यानुसार ४ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअफझलखान आणि औरंगजेब यांना आदर्श मानणारे देशात मोठ्या प्रमाणात असणे, हे हिंदूंचे दुर्दैवच होय ! छत्रपतींच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा दिल्यामुळे गुन्हे नोंद होतात, हे मोगलाईचे लक्षण नव्हे का ? |