लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढण्यासाठी निवडणूक आयोग कामाला, मुख्य निवडणूक अधिकार्यांचा राज्य दौरा चालू !
मुंबई, २६ मे (वार्ता.) – वर्ष २०२४ मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोग आतापासून कामाला लागला आहे. राज्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याचा दौरा चालू केला आहे.
आतापर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा पुणे, विदर्भ यांचा दौरा पूर्ण झाला असून संभाजीनगर आणि कोकणातील काही भागांचाही त्यांनी दौरा केला आहे. महाविद्यालयांतील १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या युवक-युवती यांची नोंदणी करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाले की, मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी मतदार जागरूकता अभियान चालू करण्यात येणार आहे. यापूर्वी १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवती यांची नोंदणी १ जानेवारीपर्यंत करण्यात येत होती; मात्र या वर्षी प्रथमच मार्च, एप्रिल आणि मे या मासातही १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवती यांची मतदानासूचीत नोंदणी करण्यात येणार आहे. याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्यास होईल.’’
मतदान केल्याची खूण करण्यासाठी शाईविना अन्य पर्यायाचा उपयोग करण्याविषयी कोणतीही सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आलेली नाही, असे पारकर यांनीां सांगितले.