स्वातंत्र्यविरांचे पसायदान !

२६ मे या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या दुसर्‍या भागात आपण ‘आयुष्यभर भारतमातेची भक्ती आणि साधना करणारे कर्मयोगी सावरकर, काळाच्या ओघातही चिरकाल टिकणारे सावरकर यांचे वाङ्मय’ आदी सूत्रे पाहिली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

प्रा. श्याम देशपांडे

८. सावरकरांना ‘भारतरत्न’ उपाधी देणे, म्हणजे हिमालयाच्या शिरावर टेकडीचा लहानसा मुकुट चढवण्यासारखे !

सावरकरांनी भारतमातेखेरिज त्यांच्या देहातील गुणभावात्मक चौरंगावर अन्य कोणत्याही आराध्याची प्रतिष्ठापना केलेली नव्हती. त्यामुळे त्यांच्याकडून प्रकट झालेल्या शब्दवाङ्मयाला रामायण, भागवतादी ग्रंथांसारखे राष्ट्र्रभक्तीच्या प्रांतात मानाचे आणि मोलाचे स्थान आहे. त्यांनी मांडलेल्या या राष्ट्र्रभक्तीच्या यज्ञात त्यांना वैश्विक नियमावर आधारित शाश्वत सिद्धांताचे दर्शन घडले. जगाच्या कल्याणास्तव त्यांना आतून अवगत झालेले हे ज्ञान त्यांच्या तपश्चर्येचे फलित होय ! राष्ट्र्रभक्ती आणि देवभक्ती यांच्या प्रांतात भक्तीचा देखावा करणार्‍यांची न्यूनता नाही. स्वार्थाच्या किनारी भक्तीचे वस्त्र विणणारे भक्त पदोपदी अनुभवावयास येतात; परंतु आत्मानंदात विहार करणार्‍यांची संख्या मोजकीच असते. जगातील समस्त राष्ट्र्रभक्तांनी ज्यांच्या चरणाशी बसून राष्ट्र्रभक्तीची संथा (दीक्षा) घ्यावी, अशी योग्यता असणार्‍या सावरकरांनी स्वातंत्र्योत्तर काळात सुईच्या टोकाएवढीही सन्मानाची अपेक्षा केली नाही. ‘माझा तीन चतुर्थांश का होईना; पण देश स्वतंत्र झालेला मी पाहिला, मी धन्य झालो; कारण या स्वातंत्र्यासाठी रणीरणांगणी मरण्यासाठी आम्ही जन्माला आलो; पण देवाच्या म्हणा किंवा दैत्याच्या, कृपेने जिवंत राहिलो आणि मातृभूमीच्या स्वातंत्र्यध्वजाचे दर्शन झाले. याहून मला अधिक काय पाहिजे !’ हे शब्द ज्या राष्ट्र्रभक्ताच्या मुखातून निघतात, त्या भक्ताची उंची काय असेल, याची कल्पना न केलेली बरी. ज्यांनी मान-सन्मान, पदे, लौकिक आणि जहागीरदारी सारे सारे नाकारले, त्यांना ‘भारतरत्न’ ही सामान्यीकरण झालेली उपाधी ‘स्वातंत्र्यवीर’ या उपाधीसमोर देणे, म्हणजे हिमालयाच्या शिरावर टेकडीचा लहानसा मुकुट चढवण्यासारखे आहे.

जन्म आणि जन्मकर्म याचा अर्थ त्यांना बालवयातच आकलन झाला. त्यामुळे आपण का आणि कशासाठी जन्माला आलो, याचे त्यांना प्रस्फुटीकरण होऊन त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक कर्माला भारतमातेला साक्ष ठेवून स्वधर्म सूत्राने न्याय दिला. तसेच प्रत्यक्ष आचरणातून त्याची प्रायोगिक सिद्धताही दिली. त्यामुळे त्यांच्या सिद्धांतांना अनुभवाची सिद्धता आहे, केवळ पोपटपंची नव्हे. याप्रमाणे त्यांनी मातृभूमीसाठी सार्‍या जीवनाचा सारीपाट मांडला आणि तो मातृभूमीच्या चिंतनात अन् धन्यतेच्या समाधानात गुंडाळलाही. शेवटी या भक्ताने एक शल्य हृदयात तसेच कायम ठेवून मृत्यूशी हस्तांदोलन करत देह शांत केला. स्वातंत्र्य मिळाले, हे एक आत्मिक समाधान होते; पण लांडग्यांनी मातृभूमीचा लचका तोडला, याचे अपरिमित शल्य त्यांच्या मनी होते. आई मिळाली; परंतु ती अपंग झाली, याची त्यांना प्रचंड वेदना होती. सत्तेच्या सिंहासनावर लोळण्याची लालसा धारण करणार्‍या सजनांनी भारतमातेच्या पदराला हात घालून पावित्र्य भंग केल्याचे दुःख त्यांना जाणवत होते. भारतमातेच्या कुशीत उपजलेल्या करंट्यांनी अशी ही मानखंडना मांडल्याचा साक्षात्कार त्यांना स्वातंत्र्याच्या फार पूर्वीपासूनच होऊ लागला होता. त्यामुळेच या राष्ट्रभक्ताच्या वीर वाणीतून आसेतु हिमाचल प्रचाराच्या प्रवासात विभाजनाच्या भयाने जनजागृतीचा आक्रोश चालू होता.

९. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न खंडित झाल्याने सावरकर यांच्याकडून प्रायोपवेशनाचे अनुसरण !

स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडाशेजारीच सावरकर यांनी अखंड भारताचे यज्ञकुंड साकारले होते. त्यात ते क्षात्रधर्माने कंठशोष करत सावधानतेच्या आहुती देत होते. प्रभु श्रीरामचंद्रांच्या सार्‍या अट्टहासाला अंती सीताविरहाचे दुःख चिकटले. भगवान कृष्णाच्या गीता प्रवचनानंतरही यादवांच्या यादवीचा संग्राम भगवंताला पहावाच लागला. हिंदवी स्वराज्य उभे झाल्यावरही शेवटच्या श्वासात छत्रपतींना स्वजनांचा कलह वेदनादायी ठरला. स्वजनांच्या आणि रक्ताच्या फितुरीमुळे महाराणा प्रतापांच्या वाट्याला दारुण पराभव, वनवास अन् यातना आल्या, तसेच सावरकर यांना मातृभूमीच्या विभाजनाचा अनुभव हा स्वातंत्र्ययज्ञाच्या अपूर्णतेचा अनुभव देणारा ठरला. ज्या हिंदुस्थानसाठी सावरकर यांनी हिंदुत्वाची ‘अमर गीता’ गायिली, त्या गीतेतील सिंधूच हिंदूंना पारखी झाल्याची खंत त्यांना सतत सलत राहिली. आत्मानंदामध्ये विहार करणार्‍या या राष्ट्रभक्तीच्या आधुनिक व्यासाला मातृभूमीच्या खंडनेचा व्रण अश्वत्थाम्याच्या व्रणासारखा पीडा देत राहिला. या व्रणातून सिंधूच्या सहवासाला पारखे झाल्याचे तरंग सतत उठत राहिले आणि या वेदनेतून जन्म झाला, स्वातंत्र्यविराच्या पसायदानाचा ! सिंधुसूक्ताच्या रूपाने !

स्वातंत्र्यविरांनी गायिलेले सिंधुसूक्त हे सावरकर यांचे भारतमातेच्या चरणी मागितलेले पसायदानच आहे. स्वातंत्र्याच्या रूपाने प्रसन्न झालेल्या मातृभूमीने दिलेला कृपाप्रसाद हा पूर्ण तृप्ती देणारा नाही, याची त्यांना जाणीव झाली. स्वातंत्र्योत्तर लाल बहादूर शास्त्री पंतप्रधानपदी विराजमान असतांना आणि संरक्षणाची धुरा महाराष्ट्राच्या क्षात्रधर्मीय यशवंतराव चव्हाणांच्या खांद्यावर असतांना पाकिस्तानने केलेल्या आक्रमणाच्या वेळी भारतमातेच्या शूरविरांनी भाऊसाहेब पेशव्यांप्रमाणे लाहोर आणि पेशावर यांच्या सीमा ओलांडून राष्ट्रविभाजन करणार्‍या राष्ट्रद्रोहाच्या साम्राज्य सिंहासनावर त्यांच्या पोलादी आधुनिक गदेने प्रहार केले आणि सिंधूचे प्रवाहित जल प्राशन करून आपली तहान भागवली. तेव्हा या राष्ट्रभक्ताला काय आनंद झाला अन् त्या आनंदाच्या ऊर्मीत प्रकृती प्रतिकूल असतांनाही हा भक्त उसळून उद्गारला की, ‘आता सिंधू मुक्त होणार. माझे स्वतंत्र भारताचे पराक्रमी शूरवीर सैनिक बांधव ‘याचि देही याची डोळा’ सिंधू मुक्त करून भारतमातेची अखंड मूर्ती पुन्हा मला पूजेला देणार !’ पण दुदैव ! स्वप्न आणि आशा अपूर्ण राहिल्या. विरांच्या सांडलेल्या रक्ताला गटार पाण्याचेही मोल मिळाले नाही. सैनिक गेले, असंख्य स्त्रियांची कपाळे सौभाग्यतिलकाला पारखी झाली, अनेक तुटलेल्या मंगळसूत्रांचे मणी मातीत विखुरले, बापाच्या जाण्याने बालके अनाथ झाली, राष्ट्राने कर्मयोगी पंतप्रधान गमावला आणि स्वातंत्र्यवीर अंतःकरणातून कोसळले. आता अधिक पहाणे नको; म्हणून बालपणी चेतावलेल्या यज्ञकुंडात आजपर्यंत अनेकानेकांच्या जशा भावभावनांसह समिधा समर्पिल्या, त्या वेदीवर सावरकर समर्पणासाठी स्वतःहून सिद्ध झाले. प्रायोपवेशनाचा निर्णय घेऊन मातृभूमीचा हा भक्त मृत्यूला आमंत्रित करता झाला. आत्मार्पणाच्या या सीमेवर उभे असतांनाही अंतःकरणातून प्रकट होत होते, सिंधुसूक्त ! ‘हे अंबीतमे, नदीतमे, देवीतमे, सुरसेवीनी सिंधु’, असे शब्द जेव्हा अंतरंगात उमटत असत, तेव्हा हा भक्त प्रचंड वेदनेने तळमळत असे. वैद्यांना या प्रायोपवेशनाच्या काळात वाटत असे की, ही शरीरव्याधीची तळमळ असावी; पण ती होती अंतःकरणाची वेदना; कारण शरिराचा विचार स्वातंत्र्यविरांनी कधीच केला नाही. त्यामुळेच ते अंदमान पचवू शकले.

१०. सावरकर यांच्या सिंधूयुक्त पसायदानामध्ये राष्ट्रकल्याणासाठी मातृभूमीला विनवणी !

स्वातंत्र्यवीराचे हे सिंधुसूक्त त्यांच्या तडफडत्या आत्म्याचे प्रकटीकरण आहे. त्या सूक्तातील प्रत्येक शब्दन् शब्द हा त्यांना समाधी अवस्थेत ऋषींना स्फुरलेल्या अपौरुषेय वेदवाङ्मयाच्या कुळातला आहे. ज्या स्वातंत्र्यासाठी ‘अभिनव भारत’ नामाभिधानाने स्थंडिलाची रचना केली, त्या स्थंडिलाला स्वातंत्र्याचे तोरण बांधल्यानंतर त्याच्या पूर्णाहुती प्रसंगी वर्ष १९५२ मध्ये पुण्यनगरीत केलेल्या सांगता समारोपातील निरूपणाच्या वेळी सावरकरांना या सिंधुसूक्ताचा साक्षात्कार झाला आणि या स्वातंत्र्यमहर्षींच्या मुखातून ती प्रकट झाली. आयुष्याची पूर्णाहुती ज्या सिंधुसूक्ताच्या पसायदानाने स्वातंत्र्यविरांनी केली. त्यात काय नाही ? मातृभूमीच्या भौगोलिकतेचा आणि भौतिकतेचा विस्तार आहे, राष्ट्राच्या प्राचीनतम पराक्रमी पुरुषार्थाच्या ऐतिहासिकतेची गाथा आहे, पवित्र मंगल अशी तीर्थक्षेत्रे आणि स्थानमाहात्म्य आहे. आजपर्यंत या मातीतून प्रकट झालेल्या उदात्त पुण्यकर्माचे गायन आहे, भूमीवर मुक्तपणे सातत्याने बागडणार्‍या पवित्र प्रासंगिकतेचा सुगंध आहे, संस्कृतीची गौरवगाथा आहे, नतद्रष्टांना आव्हान आहे अन् राष्ट्रभक्तांना प्रोत्साहन आहे, राष्ट्रभक्तीचा विरह आहे आणि या विरहाचा बांध फुटू न देण्यासाठी त्याला आशावादाचा किनारा आहे. या किनार्‍यावर बसून या राष्ट्रभक्ताने मातृभूमीला केलेली विनवणी, हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राष्ट्रकल्याणार्थ मागितलेले पसायदान आहे.

११. हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यावरच मृत्युंजय सावरकर यांना संपूर्ण तृप्तीचे समाधान मिळेल !

मुक्तीच्या प्रांगणातून भारतमातेची परवशता दूर करून स्वतंत्रतेचे स्तोत्र गाण्यासाठी या राष्ट्रभक्त ऋषीचा अवतार झाला असल्याने त्यांच्या प्रत्येक शब्दाला ब्रह्मरसाचा ओलावा आहे. स्वातंत्र्याच्या ब्रह्मसूक्ताचा हा निर्माता त्याच्या साहित्यमूर्तीतून सतत आमच्या सहवासात होता. त्यामुळे शरिराने जरी तो दृश्यमान नसला, तरी अक्षरवाङ्मयरूपी प्रतिभेने तो आमच्यात सदैव वास करतो. मुक्तात्मा असल्यामुळे मोक्षपदाच्या प्रांतातील हा रहिवासी जोपर्यंत मातृभूमी पूर्णरूपात साकार होत नाही, तोपर्यंत या मातीतील अंकुरांना त्याच्या शब्दरसाने पुष्ट करत सामर्थ्यशील करण्याचा प्रयत्न करतच रहाणार. ज्या ज्या देहात राष्ट्रभक्तीचा हुंकार प्रकट होत जाईल, त्या त्या देहाच्या कर्णरंध्रात हा मृत्युंजय महायोगी सिंधुसूक्ताच्या पसायदानाचा हा महामंत्र फुंकत रहाणार. तसेच इंद्र वरुणादी देवगणांनी वेदाची पहिली सामगायने ज्या सिंधूच्या तटावर गात तिच्या निर्मळ सच्छिल जलाचे प्राशन करून प्रसन्नतेने तृप्तीचा हुंकार दिला, तो तिचा तट मातृभूमीच्या खंडित मूर्तीला पुन्हा जोडलेला पहाताच ‘अंबीतमे, नदीतमे, देवतमे, सुससेवीनी सिंधु’ म्हणत तिच्या अंगावर लोळण घेऊन प्रणिपात करत पूर्ण तृप्तीच्या समाधानात पुनश्च आपल्या मोक्षमंदिरात मातेच्या साधनेत समाधिस्त होणार ! ही अवस्था त्या सिद्ध पुरुषाला केव्हा प्राप्त होईल, ते काळालाच ठाऊक ! तोपर्यंत केवळ स्मरण, चिंतन, गायन  या स्वातंत्र्यविराच्या पसायदानाचे !’

(समाप्त)

– प्रा. श्याम देशपांडे, वर्धा