भारताची हिंदु राष्ट्राच्या दिशेने आश्वासक वाटचाल ! – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा
रत्नागिरीत ‘सावरकर विचार जागरण सप्ताह’
रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त प्रथमच शासनाकडून विचार जागरण महोत्सव होत आहे. सावरकर हे द्रष्टे होते. ते बोललेले खरे व्हायचे. त्यांनी वर्ष १९६६ मध्ये हिंदुत्वाला पोषक वातावरण आहे. हिंदु शक्ती मोठी होणार. हिंदुत्वाचा विचार जोर धरतोय आणि भारत हिंदु राष्ट्र होणार आहे, असे बोलून ठेवले आहे. भारताची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.
महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतित पावन मंदिर संस्था आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’निमित्त साळवी स्टॉप येथील ‘ओम साई मित्रमंडळात’ प्रचंड गर्दीत कीर्तन रंगले. त्या वेळी आफळेबुवा बोलत होते.
चारुदत्त आफळेबुवा कीर्तनात पुढे म्हणाले की,
१. सावरकर यांचे वक्तृत्व जन्मजात होते. पुण्यात एस्.पी. महाविद्यालयाच्या क्रिकेट मैदानात त्यांच्या प्रचंड मोठ्या सभा होत. त्यांच्या भाषणाने नेताजी सुभाषबाबू उभे राहिले, दुसर्या महायुद्धात अनेक सैनिक सिद्ध झाले.
२. भाषेची पूजा ही मातृपूजा आहे, हे सावरकरांनी दाखवून दिले. त्यांच्या कोणत्याही कृतीत देश प्रथम आणि मग बाकी सर्व नंतर असे होते. सावरकरांनी सर्वस्वाचा त्याग केला. त्यांनी बॅरिस्टर पदवी असो वा आयुष्यातील अनेक क्षण त्यागले.
३. गोवा मुक्ती संग्राम असो वा हैद्राबाद स्वातंत्र्य. या दोन्ही वेळी ‘लष्कर घुसवावे’, असे सावरकरांचे मत होते. त्या वेळी तेच करावे लागले. सध्या सुविधा महत्त्वाची नाही, सुरक्षा महत्त्वाची आहे, हे सामान्य माणसाच्या ध्यानी आले पाहिजे. आपण कुणाला जागा, भूमी विकतोय, भारतविरोधी लोकांना पैसे मिळतायत का ?याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे.
४. वीर सावरकर हे जगात एकमेव असे लेखक, साहित्यिक आहेत की, पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच बंदी आली. १० सहस्र कवितेच्या ओळी तुरुंगात लिहिल्या, पाठ केल्या आणि नंतर पुस्तके प्रकाशित झाली. लेखनातून राष्ट्रसेवा केली. स्वतंत्रता देवीचे काव्य ‘जयोस्तुते’ लिहून ते महाकवी झाले.
५. वीर सावरकर गोमातेविषयी चुकीचे बोलले असा आक्षेप घेतला जातो; परंतु सावरकर म्हणाले होते की, ‘गोपूजक होण्यापेक्षा गो रक्षक व्हा.’ त्यांनी देश आणि कालस्थितीनुसार केलेले वक्तव्य होते. त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ कुणी लावू नये.
कीर्तनाच्या प्रारंभी श्री गणेशाचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. नाचणे गावचे सरपंच भैय्या भोंगले यांच्या हस्ते आफळेबुवांचा सत्कार करण्यात आला. संगीत साथीदारांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्य शुभम् सावंत, ओम साई मित्रमंडळाचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि विचार सप्ताहाचे संयोजक रवींद्र भोवड यांच्या हस्ते करण्यात आला. आफळेबुवांना ‘ऑर्गनसाथ’ रेशीम खेडकर, तबलासाथ मिलिंद तायवाडे, पखवाज मनोज भांडवलकर आणि व्हायोलिनसाथ प्रमोद जांभेकर यांनी केली. |