५६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या गोवा येथील (कै.) श्रीमती सीमा जगदीश माथूर (वय ८३ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे !
१७.५.२०२३ या दिवशी श्रीमती सीमा जगदीश माथूर (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. २७ मे या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. निधनापूर्वी जाणवलेली सूत्रे
१ अ. गुरुतत्त्व एकच असल्याने अन्य मार्गाने साधना करत असूनही आश्रमात येण्याची संधी मिळणे : ‘माझ्या (श्री. सूरजीत नारायण जगदीश माथूर यांच्या) आई (श्रीमती सीमा जगदीश माथूर) ६ वर्षांपूर्वी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आल्या. त्या साधक नसल्यामुळे त्यांना सनातन संस्थेची साधना माहिती नव्हती. त्या पूर्वीपासून पूजा-पाठ, व्रत, उपवास आणि श्रीकृष्णाचा नामजप करायच्या. गुरुतत्त्व एकच असल्याने अन्य साधना करत असूनही त्यांना आश्रमात येण्याची संधी मिळाली. ‘भक्त कोणती सेवा करतो आणि कोणत्या संप्रदायाची साधना करतो ?’, हे ईश्वर बघत नसतो. ‘गुरूंनी त्यांना स्वीकारले, म्हणजे ‘गुरु साधकाच्या समवेत साधकाच्या कुटुंबाचासुद्धा सर्व भार घेतात’, याची आम्हाला प्रचीती आली.
१ आ. आश्रमात रहाण्यास आल्यावर स्वभावात सकारात्मक पालट होणे : घरी रहात असल्यामुळे त्यांच्या सवयी वेगळ्या होत्या. त्यांचे वागणे आणि बोलणे व्यावहारिक होते. आश्रमात आल्यावर आश्रमातील चैतन्याच्या प्रभावामुळे ‘त्या स्वतः कुठे न्यून पडतात ?’, हे त्यांना समजू लागले.
‘आपण कसे वागायला हवे ?’, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले आणि तसा पालट त्यांच्यात होत गेला. यातून आश्रमातील चैतन्याचा प्रभाव आम्हाला अनुभवता आला.
१ इ. रुग्णाईत असतांना व्यवहारातील सर्व गोष्टींचे विस्मरण होऊ लागणे; मात्र श्रीकृष्णाचा नामजप लक्षात रहाणे : त्या रुग्णाईत असतांना ‘त्यांचा एक एक अवयव निकामी होणे, बुद्धीचे संतुलन जाणे आणि कुटुंबातील व्यक्तींचे विस्मरण होणे’ इत्यादी गोष्टी घडू लागल्या. स्वतःविषयीचे विस्मरण झालेले असतांनासुद्धा त्यांनी केलेला कृष्णाचा नामजप त्यांच्या स्मरणात होता.
पूर्वीपासून त्या गोमुखीत (जपमाळ ठेवण्याच्या एक प्रकारच्या पिशवीत) जपमाळ धरून नामजप करत असल्यामुळे त्यांची जपमाळ धरायची हाताची मुद्रा शेवटपर्यंत तशीच होती. आम्ही त्यांना विचारले, ‘‘कोणता नामजप करता ?’’ तेव्हा त्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असे म्हणून दाखवायच्या. यातून ‘मनुष्याचे व्यावहारिक विस्मरण होऊ शकते; पण साधनेचे संस्कार चित्तावर झाल्याने भगवंताचे विस्मरण होऊ शकत नाही’, हे आम्हाला त्यांच्या उदाहरणातून अनुभवता आले.
१ ई. ‘आध्यात्मिक कृती करण्याला बुद्धीची मर्यादा येत नाही’, हे शिकायला मिळणे : आजारपणामुळे विस्मरण झाल्यामुळे त्यांना व्यावहारिक गोष्टी आठवत नसल्या, तरी त्यांना धर्माचरण करण्याच्या कृती करण्याचे स्मरण होत होते, उदा. बाहेरून आल्यावर पाय धुणे, देवापुढे उदबत्ती लावणे, देवाला नमस्कार करणे यांची आठवण त्या सहजतेने करून देत होत्या. यातून चित्तावर धर्माचे आचरण करण्याचे संस्कार असल्यामुळे त्यांची बुद्धी कार्यरत नसली, तरी त्या या सर्व कृती करण्यास सांगत होत्या, म्हणजे ‘आध्यात्मिक कृतीला बुद्धीची मर्यादा येत नाही’, हे आम्हाला शिकायला मिळाले.
१ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भेटायला आल्यानंतर हसून प्रतिसाद देऊन त्यांच्याशी बोलणे आणि भावजागृती होणे : एरव्ही कुटुंबातील व्यक्ती भेटायला आल्यानंतर आजारपणामुळे त्यांच्या चेहर्यावर कोणतेच हावभाव नसायचे. एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ त्यांना भेटायला आल्या. त्या वेळी त्यांनी हसून प्रतिसाद दिला आणि त्या त्यांच्याशी बोलल्या. त्या गेल्यानंतर ‘या कोण होत्या ?’, असे त्यांनी विचारले. ‘त्यांच्याशी बोलल्याने मला पुष्कळ बरे वाटले’, असे त्या म्हणाल्या आणि त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले. प्रत्यक्षात त्यांना आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याविषयी कधीच काही सांगितले नव्हते. ‘साधना करणार्या जिवाला भगवंताला आध्यात्मिक स्तरावर कसे अनुभवता येते ?’, हे आम्हाला अनुभवता आले.
१ ऊ. प्रतिदिन रात्री झोप न लागणे; मात्र गुरुवारी होणारा भाववृद्धी सत्संग ऐकल्यानंतर शांत झोप लागणे : त्यांच्या बुद्धीची समजण्याची स्थिती नसली, तरी प्रत्येक गुरुवारी होणारा भाववृद्धी सत्संग त्या एकाग्रतेने ऐकायच्या आणि शांत राहून पूर्ण सत्संगाचा लाभ घ्यायच्या. त्या भाववृद्धी सत्संगाचा परिणाम त्यांच्यावर १ – २ दिवस असायचा. त्यांना रात्री झोप लागत नसे; पण ज्या दिवशी त्या भाववृद्धी सत्संग ऐकत, त्या दिवशी त्यांना शांत झोप लागत असे. यावरून ‘भाववृद्धी सत्संगाचा लाभ उच्च स्तरावर होतो’, हे आमच्या लक्षात आले.
१ ए. प्रारंभी मुलगा आणि सून यांना आश्रमात सेवेला जाऊ देण्याची मनाची स्थिती नसणे; मात्र कालांतराने त्यांना सेवेला जाऊ देणे : प्रारंभी आश्रमात आल्यावर ‘आम्ही सेवेला जाऊ का ?’, असे त्यांना विचारल्यावर ‘आम्ही त्यांच्यासह थांबायला हवे’, अशी त्यांची अपेक्षा असायची. कालांतराने त्यांच्या मनाची स्थिती पालटली. नंतर जर आम्ही त्यांना विचारले, ‘‘आम्ही सेवेला जाऊन येऊ का ?’’, तर त्या वेळी त्या लगेच होकार द्यायच्या. त्यांनी कधीच ‘सेवेला जाऊ नको’, असे म्हटले नाही. यातून ‘आमच्या अनुपस्थितीत देवच त्यांची काळजी घेत होता’, हे आमच्या लक्षात आले.
१ ऐ. प.पू. भक्तराज महाराज सूक्ष्मातून बोलत असल्याचे सांगणे : एकदा त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे हात दाखवला आणि म्हणाल्या, ‘‘हे आज माझ्याकडे आले होते. ते मला काहीतरी सांगत होते.’’ यातून ‘देवच त्यांचा भार सांभाळत आहे’, असे आम्हाला वाटले.
१ ओ. घरातील उदबत्ती विझू लागल्याचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सांगितल्यावर त्यांनी ‘आईची मुक्ती जवळ आली आहे’, असे सांगणे : ९.४.२०२३ या दिवशी त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागात ठेवले. त्या वेळी आम्ही घरी उदबत्ती लावल्यावर ती उदबत्ती विझत होती; म्हणून आम्ही सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांना याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आईची मुक्ती जवळ आली आहे. त्याचा तो संकेत आहे.’’ त्या वेळी सद्गुरु काकांनी आम्हाला ‘आईला होणारे त्रास सुसह्य होऊ देत’, अशी प्रार्थना करायला सांगितली.
१५.४.२०२३ मध्ये त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवू लागली आणि १६.४.२०२३ या दिवशी त्यांना रुग्णालयातून घरी पाठवले.
१ औ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यावरील श्रद्धा : ८.५.२०२३ या दिवशी त्यांच्या त्रासाची तीव्रता पुन्हा पूर्वीसारखी वाढली. त्या दिवसापासून त्यांची स्थिती खालावली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्या वेळी मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे दैनिकातील छायाचित्र त्यांच्या डोळ्यांसमोर धरले. तेव्हा त्या छायाचित्राची पापी घेऊ लागल्या. ‘गुरुदेवांविना कुणीच तारू शकत नाही. या यातनेतून तेच सोडवू शकतात’, ही श्रद्धा त्यांच्या या कृतीतून जाणवत होती.
१ अं. रुग्णालयात भरती केल्यावर शुद्धीत असेपर्यंत ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप करणे : पुढे त्यांना रुग्णालयात अतीदक्षता विभागामध्ये भरती केले. त्या वेळी त्यांना नामजपाची आठवण करून दिल्यावर त्या शुद्धीत असेपर्यंत ‘कृष्ण, कृष्ण’, असा नामजप करत होत्या. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी (११.५.२०२३ या दिवशी) त्यांच्या त्रासाची तीव्रता न्यून झाली.
१ क. सद्गुरु गाडगीळकाकांनी ‘प्रकृतीत सुधारणा होऊ दे’, अशी प्रार्थना करण्यास सांगणे : १२.५.२०२३ या दिवसानंतर देवाजवळ लावलेली उदबत्ती व्यवस्थित पेटत होती. त्या वेळी आईच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. सद्गुरु गाडगीळकाकांना पुन्हा उपाय विचारल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘जर मुक्तीची वेळ अजून दूर असेल, तर ‘त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ दे’, अशी प्रार्थना करा.’’
१ ख. एरव्ही डोळे बंद असणे; पण चंडीयाग पहातांना डोळे उघडता येणे : १४ आणि १५.५.२०२३ या दिवशी त्यांना रामनाथी आश्रमात होणारा चंडीयाग संगणकीय प्रणालीद्वारे दाखवला. त्या वेळी त्यांचे डोळे उघडत होते. त्या यागाचा त्यांनी पूर्ण लाभ घेतला. एरव्ही त्यांचे डोळे बंद असायचे. त्यांना डोळे उघडता येत नव्हते; पण त्या प्रयत्नपूर्वक तो याग पहात होत्या. त्या दिवसांत त्यांना चांगली शांत झोप लागली.
१ ग. ब्रह्मोत्सवाच्या विशेषांकातील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र पहाणे : १६.५.२०२३ या दिवशी त्यांच्या त्रासात पुन्हा वाढ झाली. त्या वेळी आम्ही दैनिक ‘सनातन प्रभात’चा प.पू. गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवाचा विशेषांक त्यांच्या डोळ्यांसमोर धरला. तेव्हा त्या त्या अंकातील गुरुदेवांचे छायाचित्र बघत होत्या.
१ घ. १७.५.२०२३ या दिवशी सकाळी १०.२९ वाजता त्यांचे निधन झाले.
१ च. ‘यातून ‘ब्रह्मोत्सवाच्या चैतन्याने त्यांच्या पुढच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला’, असे आम्हाला जाणवले’, याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. सूरजीत नारायण जगदीश माथूर ((कै.) श्रीमती सीमा माथूर यांचा लहान मुलगा) आणि सौ. सुप्रिया सूरजीत माथूर (स्नुषा, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.५.२०२३)
२. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
२ अ. ‘आई गेल्यावर त्या दिवशी राजहंस पक्षी घराच्या बाजूला फिरत होता. वातावरणात गारवा जाणवत होता.
२ आ. आईने नरसोबाच्या वाडीला अस्थीविसर्जन करण्याची इच्छा बोलून दाखवणे, आईचे निधन झाल्यावर ते शक्य न होणे आणि गोव्यात अस्थीविसर्जन झाल्यावर एका साधिकेच्या माध्यमातून नरसोबाच्या वाडीचा प्रसाद मिळाल्यावर देवाने आईची इच्छा पूर्ण केल्याचे जाणवणे : काही मासांपूर्वी आईशी बोलता बोलता मी त्यांना अस्थीविसर्जनाविषयी विचारले. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, ‘‘नरसोबाच्या वाडीला अस्थीविसर्जन कर.’’ आईचे निधन झाल्यावर ‘अस्थीविसर्जन नरसोबाच्या वाडीला कर’, हे आईचे शब्द मला आठवले; पण आम्ही नरसोबाच्या वाडीला जाऊ शकत नाही; म्हणून मला खंत वाटली. त्या वेळी मी भावाला सांगितले, ‘‘आता आम्ही नरसोबाच्या वाडीला जाऊ शकत नाही. त्यामुळे पुढे आईचे एखादे श्राद्ध तिकडे करूया.’’ आम्ही गोव्यात हरवळे येथील तीर्थस्थानी अस्थी विसर्जन केल्या. दुसर्या दिवशी सौ. सुप्रिया माथूर (माझी पत्नी) आश्रमात सेवेनिमित्त गेली. त्या वेळी सौ. लुकतुकेकाकूंनी तिला नरसोबाच्या वाडीचा प्रसाद दिला. पत्नीने तो प्रसाद दिल्यावर मला देवाविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. आईच्या अस्थी नरसोबाच्या वाडीला पोचवल्याची देवाने मला त्या प्रसादाच्या माध्यमातून अनुभूती दिली.’
– श्री. सूरजीत नारायण जगदीश माथूर
२ इ. ‘आईचे मृत्यूत्तर विधी करतांना मंत्रांच्या उच्चारांमुळे मला शांत वाटत होते, तसेच मनात नामजप चालू होता. विधी करतांना ‘मृत्यूत्तर विधी करत नसून एखादे चांगले कार्य करत आहे’, असे मला जाणवले.
२ ई. विधी चालू होण्यापूर्वी स्मशानभूमीत जाणवणारा त्रास विधी चालू झाल्यानंतर दूर होऊन शांत वाटणे : ज्या वेळी आईचा मृतदेह स्मशानभूमीत नेला, त्या वेळी तिथल्या वातावरणामुळे मला पुष्कळ भीती वाटत होती आणि डोके जड झाल्यासारखे वाटत होते. ज्या वेळी मंत्रासह विधी चालू झाले, त्या वेळी पुष्कळ वारा वाहू लागला आणि माझ्या मनातील भीती नाहीशी होऊन मला एकदम शांत वाटू लागले. मृतदेहाला अग्नी दिल्यावर ‘दीड घंटा कसा गेला ?’, ते मला कळलेही नाही. त्या वेळी माझ्याकडून नामजप होत होता. मला आईच्या शेवटची सेवेची संधी दिल्याबद्दल माझा गुरुचरणी कृतज्ञताभाव निर्माण झाला.’
– श्री. दीप नारायण जगदीश माथूर ((कै.) श्रीमती सीमा माथूर यांचा मोठा मुलगा), ढवळी, फोंडा, गोवा. (२१.५.२०२३)
२ उ. ‘त्यांचा चेहरा एकदम सुंदर दिसत होता आणि प्रसन्न वाटत होता.’ – श्रीमती शुभांगी संतोष देसाई ((कै.) श्रीमती सीमा माथूर यांची मोठी मुलगी) पिर्ला, रिवणा, सांगे, गोवा; सौ. विंदा विनोद सिरसाट (क्रमांक २ ची मुलगी) दुर्गाभाट, फोंडा, गोवा ; सौ. पूजा लवू पावसकर (क्रमांक ३ ची मुलगी) माणगाव, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग आणि सौ. हेमा जितेंद्र गावकर (सर्वांत लहान मुलगी), गांजे, उसगाव, गोवा.
२ ऊ. ‘आईंना बघितल्यावर मला काहीच त्रास जाणवला नाही. त्या वेळी मला चांगले वाटत होते. त्यांना बघितल्यावर ‘त्या शांत आहेत’, असे वाटत होते.’ – श्री. सुचेंद्र अग्नी ((कै.) श्रीमती सीमा माथूर यांच्या सुनेच्या बहिणीचे यजमान, श्री. सूरजीत नारायण जगदीश माथूर यांचे साडू), नागेशी, गोवा.
(सर्व लिखाणाचा दिनांक : २१.५.२०२३)