सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांच्या बिकट परिस्थितीवरून उद्धव ठाकरे गटाची आंदोलनाची चेतावणी
|
सिंधुदुर्ग – जिल्हा परिषदेच्या १२९ शाळा शिक्षक नसल्याने बंद होणार आहेत, तर अन्य ५०० हून अधिक मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये १-२ शिक्षकच कार्यरत राहिले आहेत. यांमुळे जिल्ह्यात शाळांची परिस्थिती बिकट झाली आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक शिक्षणशास्त्र (डी.एड्.) पदवीधारक उमेदवारांना नियुक्त्या द्या, अन्यथा १५ जून या दिवशी सर्व पालकांसह विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक आणि जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिली आहे. (गेली अनेक वर्षे रेंगाळलेली शिक्षक भरती, नियुक्तीनंतर ५ वर्षांनी स्वत:च्या मूळ जिल्ह्यात स्थानांतर करणारे शिक्षक यांमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षकांची पदे कायमच रिक्त रहातात. सातत्याने उद्भवणार्या या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचे दिसत नाही ! त्यामुळे प्रत्येक समस्येसाठी नागरिकांना आंदोलन करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक)
आमदार वैभव नाईक आणि सतीश सावंत यांनी २४ मे या दिवशी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर अन् प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या वेळी शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी सांगितले की, जिल्ह्यात शिक्षकांची एकूण १ सहस्र १२८ पदे रिक्त झाली आहेत. शासन आदेशानुसार जिल्ह्यात १० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असतांनाही ४५१ शिक्षकांना आंतरजिल्हा स्थानांतरासाठी मुक्त करावे लागले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १२२ शाळांमध्ये एकही शिक्षक नाही, तर अन्य मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्येही एक-दोन शिक्षकच कार्यरत आहेत. शासनाकडे परीक्षा दिलेल्या उमेदवारांची सूची सिद्ध आहे; मात्र शिक्षक भरतीविषयी अद्याप कोणतेही निर्देश नाहीत. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासाठी काही कालावधी लागणार आहे.