छत्रपती संभाजीनगर येथे ४ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी कामगार नेत्याला अटक !
छत्रपती संभाजीनगर – येथील उद्योजकांकडे काही विशिष्ट नेत्यांकडून खंडणी मागितली जात आहे, अशी तक्रार उद्योजकांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती; मात्र ग्रामीण पोलिसांनी प्रत्यक्षात अशा तथाकथित नेत्यांच्या विरोधात कारवाईला प्रारंभ केला असून पैठण औद्योगिक वसाहतमधील उद्योजकाकडे ४ कोटी रुपयांची खंडणी मागणार्या एका कामगार नेत्याला अटक केली आहे. विष्णू बोडखे असे या आरोपी नेत्याचे नाव आहे.
एम्.आय.डी.सी. पैठण पोलीस ठाणे अंतर्गत येणार्या एम्.आय.डी.सी. मुधलवाडीमधील एका नामवंत आस्थापनाच्या उद्योजकासह त्यांच्या आस्थापन व्यवस्थापकाला वारंवार बोडखे धमक्या देत होते, तसेच आस्थापनात जाऊन मालक आणि इतर अधिकारी यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत होते. आस्थापनाच्या कारभाराच्या विरोधात विविध सरकारी विभागांत खोटे तक्रार अर्ज देऊन आस्थापनाची अपर्कीती करत असे. हा त्रास थांबवायचा असेल, तर ४ कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी करून तात्काळ ५ लाख रुपये रोख आणि २० सहस्र रुपये प्रतिमास खंडणीची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या त्रासाला कंटाळून आस्थापन उद्योजक आणि व्यवस्थापन अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची भेट घेऊन तक्रार केली. पोलीस अधीक्षकांनी तात्काळ तक्रारीची गांभीर्याने नोंद घेत गुन्हा नोंद करून आरोपीच्या मुसक्या आवळण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना दिले होते.