फेसबूकवर औरंगजेबाचे कथित आक्षेपार्ह छायाचित्र दाखवून मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एका हिंदूवर गुन्हा नोंद !

छत्रपती संभाजीनगर येथील घटना !

छत्रपती संभाजीनगर, २५ मे (वार्ता.) – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील रहिवासी श्री. सागर विठ्ठल वानखेडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाखाली औरंगजेबाचे चित्र दाखवून मुसलमान समाजाच्या भावना दुखावून २ समाजांत तेढ निर्माण केली आहे, अशी तक्रार बोरगाव बाजार येथील रहिवासी अमीर शौकत शहा यांनी सिल्लोड पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली. त्यानंतर या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी श्री. वानखेडे यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता कलम २९५ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांच्या या चुकीच्या कृतीविषयी हिंदुत्वनिष्ठ संघटनांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. (शालेय पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढल्याचे चित्र घेतले जाते. औरंगजेब हा क्रूरकर्मा, लाखो हिंदूंची हत्या करणारा, सहस्रो हिंदु मंदिरे पाडणारा होता, तर छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबाला पायाखाली घेतल्याचे चित्र दाखवले आहे, तर त्यात गैर काय ? – संपादक)

१. खरेतर औरंगजेब हा हिंदूंचा शत्रू होता. त्याने छत्रपती संभाजी महाराजांसह लक्षावधी हिंदूंची कत्तल केली. मंदिरांची तोडफोड करून तेथे मशिदी उभ्या केल्या होत्या. हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे.

२. त्याच उद्देशाने हिंदूंमध्ये स्फूर्ती निर्माण व्हावी, यासाठी श्री. सागर वानखेडे यांनी त्यांच्या फेसबूकवरील प्रोफाईल छायाचित्रात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पायाखाली हिंदुद्वेषी आणि धर्मद्वेषी औरंगजेबाचे छायाचित्र दाखवून त्यावर ‘औरंग्या’ असे मराठीत लिहिलेले आहे, तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रासमोर ‘धर्मवीर’ असे लिहिलेले आहे.

३. यालाच तक्रारदार अमीर शहा यांनी आक्षेप घेतला आहे. श्री. सागर वानखेडे यांनी १९ मे च्या रात्री ९.५४ वाजता त्यांच्या ‘सागरभाई’ नावाच्या ‘फेसबूक पेज’वर हे चित्र पोस्ट केले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.

४. ही पोस्ट पाहिल्यानंतर शहा यांनी त्या चित्राचा ‘स्क्रीन शॉट’ काढून ते गावातील शेख कलीम शेख महंमद शरीफ आणि शेख कलीम शेख शकुर यांना दाखवले.

५. त्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून शहा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. या तक्रारीत श्री. वानखेडे यांनी हे आक्षेपार्ह छायाचित्र टाकून मुसलमान समाजाच्या भावना दुखावून २ समाजांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले आहे. त्यामुळे ‘त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणी त्याने केली आहे.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधाने हिंदूंच्या देवता किंवा राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले अथवा त्यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रकाशित केल्यास पोलीस तत्परतेने धर्मांधांवर गुन्हा नोंद करतात का ?
  • काही दिवसांपूर्वी खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ केलेल्या साखळी उपोषणात त्यांच्या समर्थकांनी औरंगजेबाचे चित्र हातात घेऊन घोषणा दिल्या होत्या, त्या वेळी पोलिसांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या; म्हणून धर्मांधांवर त्वरित गुन्हा का नोंद केला नाही ?