कोकण विभागाचा बारावीचा निकाल ९६.०१ टक्के  : सलग १० वर्षी अव्वल

  • सिंधुदुर्ग ९७.५१ टक्के मिळून पहिला क्रमांकावर

  • रत्नागिरीचा  ९५.२२ टक्के निकाल

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत १४ लाख १६ सहस्र ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वांत न्यून निकाल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे. मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी ४.५९ टक्क्यांनी अधिक आहे.

कोकणात सिंधुदुर्ग सवोच्च स्थानी

रत्नागिरी जिल्ह्यातून १७ सहस्र १३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १७ सहस्र ६९ परीक्षेस बसले होते. त्यातील १६ सहस्र २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९५.२२ टक्के लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ८ सहस्र ९८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ८ सहस्र ९५९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ८ सहस्र ७३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल ९७.५१ टक्के इतका लागला आहे. यावर्षीही सिंधुदुर्ग जिल्ह्याने निकालामध्ये सर्वोच्च स्थान राखले आहे.