आध्यात्मिक मार्गाने विश्‍वातील समस्यांचे निराकरण शक्य ! – प्रा. डॉ. शशी बाला, आंतरराष्ट्रीय समन्वयक, ‘सी २०’

  • गोव्यात २७ मे या दिवशी ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर ‘सी २०’ परिषद !

  • परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन !

डावीकडून डॉ. (सौ.) अमृता देशमाने, प्रा. डॉ. शशी बाला आणि सौ. श्‍वेता

वास्को (गोवा), २५ मे (वार्ता.) – विश्‍वातील अनेक देश भारतापेक्षा अधिक संपन्न असून संपत्ती, शस्त्रास्त्रे आणि विकास यांत पुष्कळ पुढे आहेत; पण भारत हा अध्यात्म क्षेत्रातील गुरु आहे. अध्यात्म ही भारताची मोठी शक्ती आहे. विश्‍वभरात ज्या काही समस्या आहेत, त्यांची उत्तरे अध्यात्मातून मिळू शकतात. या दृष्टीनेच आंतरराष्ट्रीय ‘जी-२०’च्या अंतर्गत असलेली ‘सी-२०’च्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोव्यात प्रथमच आयोजित ‘सी-२०’ परिषद ही ‘विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावर होणार आहे. २७ मे २०२३ या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ‘राजहंस नौदल सभागृह’, दाबोळी, वास्को येथे ही परिषद संपन्न होत आहे. या परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सी-२०’ परिषदेच्या आंतरराष्ट्रीय समन्वयक तथा नवी देहली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’च्या अध्यक्षा प्रा. डॉ. शशी बाला यांनी केले. त्या पणजी येथील हॉटेल डेलमन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या वेळी पत्रकार परिषदेला ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या संशोधन समन्वयक सौ. श्‍वेता आणि डॉ. (सौ.) अमृता देशमाने उपस्थित होत्या.

१. ‘सी-२० परिषदे’चे आयोजन गोवा सरकार, ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय’, ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज’ आणि ‘भारतीय विद्या भवन, नवी देहली’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. भारतातील ‘सी-२०’ परिषदेच्या अध्यक्षस्थानी ‘माता अमृतानंदमयी मठा’च्या संस्थापिका परमपूज्य माता अमृतानंदमयी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिषदेला गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन खंवटे आणि सांस्कृतिक मंत्री श्री. गोविंद गावडे यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, अशी माहिती महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या सौ. श्‍वेता यांनी या वेळी दिली. भारताचे ‘जी-२०’चे अध्यक्षपद जगाला ‘उपाय, सुसंवाद आणि आशा यांचा संदेश देणारा ठरो’, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्याचे समर्थन केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

२. प्रा. डॉ. शशी बाला पुढे म्हणाल्या की, आर्थिक संकट, हवामान पालट, आतंकवाद, महामारी यांसारख्या जागतिक समस्यांच्या विरोधात लढणे, तसेच अन्न, खते, वैद्यकीय उत्पादने यांचा जागतिक पुरवठा राजकारणाच्या प्रभावातून बाहेर काढणे, भू-राजकीय तणाव टाळणे, मानवतेसाठी कार्य करणे, तसेच युद्ध आणि आतंकवाद थांबवणे, या उद्देशांनी ‘जी-२०’ची निर्मिती झाली. त्यामुळे ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण  पृथ्वी हेच कुटुंब आहे) हे ‘जी-२०’चे ब्रीदवाक्य आहे. यंदाच्या वर्षी ‘जी-२०’ परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आहे. ‘जी-२०’च्या अंतर्गत ‘सी-२०’ अर्थात् ‘सिव्हिल २०’चे ‘#YouAreTheLight’ हे ब्रीदवाक्य आहे. या ‘सी-२०’ परिषदेच्या अंतर्गत आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, तंत्रज्ञान, पारंपरिक कला आणि संस्कृती यांचे जतन अन् संवर्धन आदी १४ प्रकारचे विविध गट कार्यरत आहेत. त्यांतील केवळ ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’ या विषयावरील ‘सी-२०’ परिषदे’चे आयोजन भारतातील देहली, बिलासपूर, रांची, हमीरपूर, इंदूर, नागपूर, बेंगळुरू आदी ठिकाणी प्रत्यक्ष झाले असून इंडोनेशिया, थायलंड आदी देशांत ऑनलाईन परिषदा संपन्न झाल्या आहेत. या पुढे १० हून अधिक ठिकाणी या परिषदांचे आयोजन होणार आहे. या सर्व १४ विषयांवरील ‘सी-२०’च्या देशभरातील कार्यक्रमांमध्ये २ सहस्रांंहून अधिक संस्था आणि संघटना सहभागी झाल्या आहेत.