गोवा : ‘स्मार्ट सिटी’ची कामे निकृष्ट असल्याची मंत्री बाबूश मोन्सेरात यांची स्वीकृती
पणजी, २४ मे (वार्ता.) – ‘स्मार्ट सिटी’च्या कामांविषयी टीका करणार्या लोकांना आतापर्यंत धीर धरण्याचे आवाहन करणारे पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री आणि ‘पणजी स्मार्ट सिटी महामंडळाचे संचालक बाबूश मोन्सेरात यांनी आता ही कामे निकृष्ट दर्जाची असल्याचे सांगून याचे खापर सल्लागारावर फोडून दायित्व झटकण्याचा प्रयत्न चालवला आहे.
(सौजन्य : Goan Reporter News)
मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी काहीच ज्ञान नसलेल्यांना ८ कोटी रुपये सल्लागार या नात्याने दिल्याचे म्हटले आहे; मात्र हा सल्लागार कोण ? याविषयी मंत्री मोन्सेरात यांनी स्पष्ट केलेले नाही. ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने सनदी अधिकारी संजित रॉड्रिग्स (आय.ए.एस्.) यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. या नियुक्तीनंतर मंत्री मोन्सेरात हे ‘स्मार्ट सिटी’च्या कामांविषयी विसंगत सूर लावत असल्याचे त्यांच्या अलीकडच्या विधानांवरून लक्षात येते. ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत कामे चालू झाल्यावर आतापर्यंत ट्रक, टँकर आदी मिळून एकूण १३ वाहने तेथील खड्ड्यात रुतली आहेत. विशेष म्हणजे अजूनही पणजी शहरातून जातांना टँकरचालक आणि इतर मोठ्या वाहनांना जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागत आहेत. पावसात पणजी शहर बुडण्याची भीतीही लोक व्यक्त करत आहे. यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल आणि पणजी महानगरपालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात यांनी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाच्या कामांची पहाणी करून ‘पावसात पणजी बुडणार नाही, असे सांगता येत नाही’, असे विधान केले होते. यानंतर या प्रकारामुळे लोकक्षोभ लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘आय.ए.एस्.’ अधिकारी संजित रॉड्रिग्स यांची नियुक्ती केली. ‘आय.ए.एस्.’ अधिकारी संजित रॉड्रिग्स यांनी ‘स्मार्ट सिटी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सर्व कामांची सूत्रे हाती घेतली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ मेच्या रात्री ९.३० वाजता ‘स्मार्ट सिटी’च्या कामांची पहाणी केली. कामांची पहाणी केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पावसाळ्यात शहरात मलनिस्सारण वाहिनी घालणार असल्याचे आणि शहरातील ४.३ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार असल्याचे सांगितले. पावसात पणजी शहरात पूरसदृश स्थिती निर्माण होणार नसल्याची ग्वाहीही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.