नम्रता, प्रेमभाव आणि सतत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या अनुसंधानात असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुणे येथील कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (वय ९० वर्षे) !
‘कै. पांडुरंग अनंत बोरामणीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे ज्येष्ठ शुक्ल षष्ठी (६.६.२०२२) या दिवशी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. आज २५.५.२०२३ या दिवशी (ज्येष्ठ शुक्ल ६) त्यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांना शेवटच्या दिवसांमध्ये रुग्णालयात भरती केल्यावर त्यांच्या कुटुंबियांना आलेले अनुभव येथे दिले आहेत.
१. श्री. विजय बोरामणीकर (बोरामणीकर आजोबांचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६३ वर्षे), पुणे
१ अ. नम्रता आणि प्रेमभाव : ‘ते रुग्णालयातील सर्वांशी नम्रपणे बोलत असत. त्यांच्या मनात रुग्णालयातील सर्व कर्मचार्यांप्रती कृतज्ञताभाव असायचा. ते परिचारिकांना ‘तुम्ही जेवलात का ?’, असे प्रेमाने विचारत असत. शेजारी असणार्या रुग्णाचीही ते आस्थेने चौकशी करायचे. अन्य रुग्णांच्या नातेवाइकांशीही ते प्रेमाने बोलत असत.
१ आ. इतरांचा विचार करणे : आम्ही त्यांना विचारले, ‘‘बाबा, आम्ही कुठे अल्प पडत असू, तर आम्हाला क्षमा करा.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही क्षमा मागू नका. तुम्ही माझी व्यवस्थित काळजी घेत आहात. माझा तुमच्यावर राग नाही.’’ मी सकाळी १० वाजल्यापासून त्यांच्या समवेत रुग्णालयात थांबत असे. १२ वाजले की, ते मला आग्रहाने घरी जेवायला पाठवत. यातून या स्थितीतही ते माझी काळजी घेत असल्याचे मला जाणवायचे.’
१ इ. रुग्णालयात भरती केल्यावर सतत नामजप करणे आणि गुरूंच्या अनुसंधानात असणे : १८.५.२०२२ या दिवशी बाबांची प्राणशक्ती अल्प झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती केले होते. ते अशक्त असले, तरीही ते पूर्णपणे सकारात्मक होते. प्रतिदिन ते मनातल्या मनात ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप करत. आम्ही त्यांना विचारल्यावर ते आम्हाला मोठ्याने नामजप म्हणून दाखवत. एक दिवस मी आणि माझी पत्नी (सौ. नीता बोरामणीकर) त्यांच्याजवळ बसलो होतो. त्या वेळी त्यांनी परम पूज्य डॉक्टरांची आठवण काढली. यावरून ‘ते सतत गुरूंच्या अनुसंधानात होते’, असे मला जाणवले.’
२. सौ. नीता विजय बोरामणीकर (आजोबांची सून, वय ५९ वर्षे), पुणे
२ अ. साधक आणि नातेवाईक यांची विचारपूस करणे : ‘आम्ही घरी नसतांना कोणी साधक घरी आले, तर ते साधकांना ‘पाणी पाहिजे का ?’, असे विचारत. रुग्णालयात नातेवाईक भेटायला आल्यावर त्यांना ‘कसे आलात ? चहा घेतलात का ?’, असे प्रेमाने विचारत असत, तसेच ते त्यांना ‘उभे न रहाता आसंदीत बसा’, असे म्हणत.
२ आ. कर्तेपणा नसणे : आमचे घर मध्यवर्ती भागात असल्याने मी बाबांना म्हणत असे की, ‘‘तुम्ही घर बांधल्याने आम्हाला येथे रहाता येत आहे.’’ तेव्हा ते म्हणायचे, ‘‘मी काही केले नाही. देवानेच सर्व करून घेतले.’’ त्यांना वयामुळे विस्मरण होत होते. रुग्णालयात भरती केल्यावर २ दिवसांनी ‘आपले घर कुठे आहे ?’, असे विचारल्यावर त्यांना सांगता आले नाही; मात्र ‘ते कुणी बांधले आहे ?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘श्रीकृष्णाने बांधले.’’
२ इ. रुग्णालयातही सेवा करावीशी वाटणे : एक दिवस त्यांनी ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा नामजप २ – ३ वेळा केला आणि नंतर ते मला म्हणाले, ‘‘पट्टी आण.’’ त्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्हाला पट्टी कशाला पाहिजे ?’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘नामपट्टी आण आणि इथे रुग्णालयात लाव. एकाला दिसले, तर सर्व जण मागतील.’’ तेव्हा ‘रुग्णालयातही सेवा व्हावी’, असा त्यांचा विचार होता’, असे माझ्या लक्षात आले.
२ ई. गुरूंप्रती भाव असणे : १८.५.२०२२ या दिवशी रुग्णालयात नेण्यापूर्वी आम्ही बाबांना विचारले, ‘‘तुम्हाला रुग्णालयात भरती करायचे ना ?’’ तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्हाला योग्य वाटते, ते करा.’’ त्या वेळी त्यांना ‘कोणता त्रास होत आहे ?’, हे सांगता येत नव्हते आणि त्रास सहनही होत नव्हता. तेव्हा ते म्हणाले, ‘‘प.पू. जयंत बाळाजी आठवले मला तुमच्या चरणांशी घ्या.’’ एक दिवस रुग्णालयात आम्हा दोघांनाही बाबांनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, ‘‘तू परम पूज्यांना सांग, माझी यातून लवकर सुटका करा. मला सगळे देव भेटून गेले.’’