शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री
मुंबई, २४ मे (वार्ता.) – राज्यशासन शेतकर्यांप्रती संवेदनशील आहे. येत्या खरीप काळात शेतकर्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची कार्यवाही प्रभावीपणे होण्यासाठी शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. २४ मे या दिवशी राज्यस्तरीय खरीब हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, अन्य मंत्री, तसेच राज्यातील जिल्हाधिकारी, कृषी विद्यापिठांचे कुलगुरु, आयुक्त आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि सरकार किसानों को बीज और उर्वरकों की पर्याप्त आपूर्ति सुनिश्चित करेगीhttps://t.co/4TsCC1iq0z
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) May 24, 2023
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस, गारपीट यांमुळे शेतकर्यांची हानी झाली. त्यावेळी प्रत्यक्ष शेतात जावून शेतकर्यांशी संवाद साधता आला. त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण पथके, भरारी पथके कार्यान्वित करावीत. शेतकर्यांसाठी पुरेसे बी-बियाणे, खते यांचा साठा उपलब्ध असून तो वेळेत मिळण्याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी. शेतकर्यांनी पेरणीची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच शेतकर्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा. त्यासाठी कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांनी शेतकर्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे.’’