पुणे शहरात २ सहस्र रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यावर भर !
पुणे – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ सहस्र रुपयांच्या नोटा वितरणातून काढण्याचा निर्णय घेतला आहे. २३ मेपासून नोटा पालटून मिळण्यास प्रारंभ झाला; मात्र २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याकरता शहरातील बँकांमध्ये तुरळक गर्दी दिसून आली. नागरिकांनी नोट पालटून घेण्यापेक्षा ती खात्यात जमा करण्यास भर दिल्याचे दिसून आले. तसेच नोटा पालटून घेण्याची प्रक्रिया सोपी असल्याचेही दिसून आले.
एका वेळी २ सहस्र रुपयांच्या १० नोटा पालटून मिळतील. त्याकरता कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुलभ होत आहे; परंतु काही सहकारी बँकांनी मात्र नोटा पालटून देण्याकरता अर्ज लिहून घेतल्याच्या तक्रारीही येत आहेत.