‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा रायगड येथे शुभारंभ !
रायगड – ‘हर घर सावरकर समिती’ आयोजित ‘हर घर सावरकर’ अभियानाचा शुभारंभ २१ मे या दिवशी रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून झाला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदय सामंत, आमदार भरतशेठ गोगावले, हर घर सावरकर समितीचे देवव्रत बापट, विद्याधर नारगोलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील सिंहासनारूढ मूर्तीचे पूजन, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करणारी रचना ‘हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा’ सादर करण्यात आली.
हर घर सावरकर समिती आयोजीत “हर घर सावरकर” अभियानाची सुरुवात आज किल्ले रायगड येथे माझ्या हस्ते शिवपुजनाने करण्यात आली. तसेच यंदाच्या ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी आ.भरतशेठ गोगावले,सचिन जोशी, देवव्रत बापट,अनिल गाणव आदी उपस्थित होते. pic.twitter.com/fhDoDgU8io
— Uday Samant (@samant_uday) May 21, 2023
त्यानंतर सोलापूर येथील ‘श्रीमंत बाजीराव पेशवा निवासी सैनिक शाळे’च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली, तसेच प्रसिद्ध अभिनेता अभिषेक शाळू याने प्राध्यापक मोहन शेटे लिखित ‘क्रांतीसूर्य सावरकर’ या महानाट्यातील सावरकरांचे लंडन येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुणगान करणारे भाषण सादर केले आणि त्यानंतर नृत्याद्वारे सावरकरांनी लिहिलेले ‘जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे’ हे स्वातंत्र्यदेवतेचे स्तोत्र सादर करण्यात आले. उदय सामंत यांचा सत्कार सावरकरप्रेमी श्री. विद्याधर नारगोलकर यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील १५० गिर्यारोहकांनी रायगडावर पायी येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली. त्याचप्रमाणे ५० क्रांतीकारकांच्या प्रतिमांचे पूजन या गिर्यारोहकांनी केले.
रायगडावर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वारंवार यायला पाहिजे ! – भरतशेठ गोगावले, आमदार
रायगड सारख्या पवित्र भूमीवर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडावर आज ‘हर घर सावरकर’ या अभियानाचा शुभारंभ होत आहे, याचा मला आनंद आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष २ जून या दिवशी चालू होत आहे. त्यानिमित्ताने आयोजित केल्या जाणार्या भव्य सोहळ्यासाठी सर्व शिवभक्तांनी रायगडावर यावे. आपण पंढरपूर, कोल्हापूर, तुळजापूरला जातो, मुंबईच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी जातो; पण ही मंदिरे ज्या आपल्या राजामुळे सुरक्षित राहिली, त्या रायगडावरतीही महाराजांचे दर्शन घेण्यासाठी वारंवार यायला पाहिजे.
या वेळी उदय सामंत म्हणाले की, मी भाग्यवान आहे; कारण सावरकरांनी ज्या रत्नागिरीत सामाजिक काम केले, त्या रत्नागिरीचा मी आमदार आहे आणि रायगडचा मी पालकमंत्री आहे. सावरकरांचे विचार घरोघर पोचवणारे ‘हर घर सावरकर समिती’चे सदस्य आणि या समितीला भरभक्कम पाठिंबा देणारे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस या दोघांचेही मी आभार मानतो.