हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज ‘भगवा’च असला पाहिजे, ही मोहीम राबवायला हवी ! – पू. संभाजी भिडेगुरुजी
वर्धा – भारतमाता जेव्हा पारतंत्र्यात गेली, तेव्हा तिच्यासमवेत भगवा झेंडा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र भारतमाता मुक्त झाली, ती तिरंग्यासह ! महात्मा गांधीजींनी हे घडवून आणले होते. नुकताच आपण तिरंग्यासह आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. खरेतर हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज हा भगवा होता आणि तोच असला पाहिजे. यासाठी आताच प्रयत्न करायला हवेत, अन्यथा अजून ७५ वर्षांनी देशात पाकिस्तानचा झेंडा फडकेल, असे परखड विचार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी मांडले. २२ मे या दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने ‘शिवचरित्र, गडकोट मोहीम आणि हिंदवी स्वराज्य कडा पहारा’ या विषयावर येथील सत्यनारायण बजाज, सार्वजनिक वाचनालय, वर्धा येथे पू. भिडेगुरुजींचे सार्वजनिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी त्यांनी आपल्या देशावर कधी ? कुणी ? किती ? आक्रमणे केली, ब्रिटिशांनी देशाचा अभ्यास करून आपल्याला आपल्या संस्कृतीपासून कसे दूर नेले ? याविषयी विस्तृतपणे सांगितले. पू. भिडेगुरुजी पुढे म्हणाले की,
१. ब्रिटिशांनी भारतात येऊन अवघ्या दीड वर्षात सैन्य उभे केले. आपल्याच लोकांना त्यांनी फितुरी शिकवली.
२. आपसात लढतांना १८ मे १८८८ या दिवशी आपण पारतंत्र्यात अडकलो.
३. ‘लव्ह जिहाद’चा जन्म राजस्थानात जोधा अकबरपासून झाला आणि महाराष्ट्रात खिलजीपासून झाला.
४. जो देश, समाज आपल्या पूर्वजांचा इतिहास वाचत नाही, तो देश, समाज विश्वाच्या संघर्षात ‘वाचत’ नाही. या सर्वांचे दु:खद उदाहरण म्हणजे हिंदुस्थान होय !
कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अनुप चौधरी, श्री. शशिकांत पाध्ये, सौ. भक्ती चौधरी, सौ. भार्गवी क्षीरसागर, सौ. विजया भोळे यांनी पू. भिडेगुरुजींची सदिच्छा भेट घेतली, त्या वेळी त्यांनी समितीच्या कार्याला शुभाशीर्वाद दिले.