कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
मुंबई, २४ मे (वार्ता.) – कृषी पीक कर्ज हे अल्प मुदतीचे कर्ज आहे. त्यासाठी तारणाची अट ठेवता येत नाही. वारंवर सांगूनही काही अधिकोष शेतकर्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. असे करणारे अधिकोष शासनाच्या धोरणाला खीळ घालत आहेत. अशा प्रकारे कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा, असे आवाहन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. २४ मे या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत उपस्थित अधिकार्यांना ते बोलत होते.
या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’
खरीप काळात शेतकर्यांच्या नोंदणीसाठी मोहीम राबवा !
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आधारे शेतकर्यांची नोंदणी करण्यात येते; मात्र शेतकर्यांची खरी नोंद खरीप पिकाच्या काळातच होऊ शकते. शेतकर्यांच्या नोंदणीसाठी कृषी आणि कामगार विभाग यांनीही साहाय्य करावे. योजनेचा लाभ व्हावा, यासाठी खरीप पिकाच्या काळात नोंदणीसाठी मोहीम राबवावी, असे आवाहन त्यांनी केले.