जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून वीर सावरकर यांच्या विचारांचे जागरण
रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताह !
रत्नागिरी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार क्रांतीकारक होते. आज भारताला याच विचारांची आवश्यकता आहे. सावरकरांची विविध पुस्तके आणि ग्रंथ वाचले पाहिजेत. त्यांच्या विचारांचे जागरण केले पाहिजे. त्यांची जगप्रसिद्ध उडी असू दे किंवा भाषाशुद्धी, हिंदुत्वाचे विचार किंवा सर्वांना मंदिरांत देण्यात आलेला प्रवेश, हे सारे विचार आज त्यांच्य महान कार्याची प्रचीती देतात. त्यामुळे अशा प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धांतून सावरकरांचे विचार जागरूक रहातील, असा सूर आज ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उमटले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त ‘सावरकर विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यानिमित्त २४ मे या दिवशी सकाळी शहरातील विठ्ठल मंदिरात वक्तृत्व स्पर्धा झाली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला. स्पर्धेच्या उद्घाटनाला माजी नगरसेवक राजू तोडणकर, संयोजक रवींद्र भोवड, राजेंद्र फाळके, तनया शिवलकर, भरत इदाते, साईजित शिवलकर, केशव भट, मंगेश मोभारकर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी आणि अधिवक्त्या सरोज भाटकर हे होते.
इयत्ता आठवी ते दहावी या शालेय गटासाठी ‘क्रांतीकारक स्वातंत्र्यवीर सावरकर’, ‘स्वा. सावरकरांचे बालपण’ आणि ‘सावरकरांचे चरित्र’ हे विषय दिले होते. खुल्या गटासाठी ‘सावरकर आणि आजचा भारत’, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरीतील सामाजिक सुधारणा’ आणि ‘स्वा. सावरकरांचे हिंदुत्व’ असे विषय दिले होते. दोन्ही गटांतील स्पर्धकांनी दिलेल्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. सावरकरांनी लहानपणी घेतलेली शपथ, विदेशी कपड्यांची होळी, जातींमध्ये विभागलेला हिंदु समाज एक होण्यासाठी केलेले कार्य, भागोजीशेठ कीर यांनी केलेली पतित पावन मंदिराची स्थापना, सावरकरांनी अंदमानात सहन केलेल्या हालअपेष्टा, रत्नागिरीत केलेले सामाजिक कार्य, विज्ञान विचार, नाट्य, साहित्य लेखन याविषयी स्पर्धकांनी विचार मांडले.