इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनामुळे ९ सहस्र महिला अटकेत !

(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)

तेहरान (इराण) – इराणमध्ये हिजाबच्या विरोधात गेल्या ९ मासांपासून आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनाच्या प्रकरणी ९ सहस्र महिलांना अटक करून कारागृहात डांबण्यात आले आहे, तर ५०० जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच १० जणांना फाशी देण्यात आली आहे. हे आंदोलन महसा अमिनी हिच्या पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर चालू झाले आहे. महसा हिने हिजाब परिधान न केल्याने पोलिसांनी तिला अटक केली होती. तिला पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आल्याने तिचा मृत्यू झाला होता.

तेहरानमध्ये होर्डिंग लावून हिजाब वापरण्यास सांगितले जात आहे. देखरेख कॅमेरे आणि कृत्रिम बुद्धीमतेद्वारे हिजाब न वापरणार्‍यांवर निगराणी ठेवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. उत्तर तेहरानमधील २३ मजली व्यापारी संकुल बंद केला आहे; कारण, तेथे बिना हिजाबच्या महिलांना अनुमती दिली होती.