गोव्यात २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्याच्या अधिसूचनेला अधिकोषांकडून हरताळ
पणजी, २३ मे (वार्ता.) – ‘रिझर्व्ह बँके’ने प्रतिदिन २० सहस्र रुपयांपर्यंत २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्यासाठी ओळखपत्र किंवा कोणताही अर्ज भरण्याची आवश्यकता नसल्याची अधिसूचना यापूर्वीच काढलेली आहे; मात्र गोव्यात काही अधिकोषांकडून या अधिसूचनेला हरताळ फासण्याचा प्रकार घडत आहे. ‘अर्ज भरून दिल्याविना एकही नोट पालटून दिली जाणार नाही; अशी भूमिका काही अधिकोषांतील अधिकारी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘रिझर्व्ह बँके’ने जरी अधिसूचना काढलेली असली, तरी ती अधिसूचना केवळ ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’लाच यांनाच लागू आहे आणि इतर अधिकोषांना ती लागू नाही’, अशी उडवाउडवीची उत्तरे अधिकोषांतील काही अधिकारी देत आहेत. काही तक्रारदारांच्या मते ‘स्टेट बँके’मध्येही २ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून देण्यासाठी अर्ज भरून देण्यास सांगितले जात आहे.