सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग २० वर्षे अपघातविरहित सेवा बजावलेल्या चालकांचा सत्कार

  • उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

  • रुग्णवाहिकेचे चालक असलेले सनातनचे साधक संदीप कदम यांचा सत्कार

श्री. संदीप कदम यांचा सत्कार करतांना शोभा बेहेनजी आणि समवेत अधिकारी जितेंद्र पाटील

कणकवली – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने १५ ते २१ मे या कालावधीत रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला गेला. याचे औचित्य साधून ‘ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालया’च्या ‘ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल विंग’च्या वतीने आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दीर्घकाळ अपघातविरहित सेवा बजावलेल्या जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांतील ३५ हून अधिक चालकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सनातनचे देवगड येथील साधक तथा रुग्णवाहिकेचे चालक श्री. संदीप कदम यांनाही गौरवण्यात आले.

या चालकांच्या सत्कारासाठी ‘सलाम रथवान’ हा कार्यक्रम जानवली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ‘विश्वकल्याणी भवन’ येथे १९ मे या दिवशी आयोजित करण्यात आला होता. या वेळी मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील, डॉ. विद्याधर तायशेटे, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या गोवा आणि सिंधुदुर्ग विभागाच्या संचालिका राजयोगिनी शोभा बेहेनजी, कणकवलीच्या संचालिका संध्या बेहेनजी, राजयोगीनी सुरेखा बेहेनजी, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

ब्रह्मकुमारी संस्थेच्या शोभा बेहेनजी यांच्या हस्ते चालकांचा सन्मानचिन्ह, ‘सलाम रथवान’ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी अधिकारी जितेंद्र पाटील यांनी वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणे टाळा, शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा) वापर करा, चारचाकी (कार) चालवतांना आसन पट्ट्याचा (सीट बेल्टचा) वापर करा, पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने काही बोलले, तर त्याचा राग मानू नका; रस्त्याच्या उजवीकडून चाला, असे आवाहन केले.

‘ब्रह्माकुमारी’ संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न ! –  शोभा बेहेनजी

‘जसे आपण वाहन चालवतो, तसे आपले शरीर आहे. गाडीचा एखादा भाग (पार्ट) बिघडला की, गाडी बंद पडते, तसे आपण आजारी पडलो की, आपल्या शरिराची गाडी थांबते. ब्रह्माकुमारी संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला जागृत करणे हा उद्देश आहे. ‘चालक’ या शब्दामध्ये ‘लक’ म्हणजे भाग्य आहे आणि ‘नियम’ या शब्दात ‘यम’ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा आणि वाहन चालवा, असे आवाहन ब्रह्माकुमारी संस्थेच्या शोभा बेहेनजी यांनी या वेळी चालकांना केले.