रांगणा गडाच्या (जिल्हा कोल्हापूर) पायथ्याशी होणार्या डांबरी रस्त्याला विरोध !
ऐतिहासिक महत्त्वाच्या रांगणा गडाकडे जाणार्या नियोजित १० किलोमीटरच्या डांबरी रस्त्यामुळे त्या परिसरातील विशेष वनस्पती, भूमी आणि पवित्र उपवने (देवराई) नष्ट होण्याची भीती
कोल्हापूर – येथील इतिहाप्रेमी आणि निसर्गप्रेमी एकत्र येऊन भटवाडी ते चिकेवाडी या दोन गावांच्या दरम्यान होणार्या नियोजित डांबरी रस्त्याला विरोध करत आहेत. हा रस्ता कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्त्वाच्या रांगणा गडाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. हा रस्ता झाल्यास तेथील वन्यजीवनावर विपरित परिणाम होईल, असे कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे निसर्गप्रेमींनी जिल्ह्यात ‘#सेव्ह रांगणा’ या नावाने मोहीम चालू केली आहे. या रस्त्याला विरोध करणारे पत्र जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग आणि वन्य विभाग यांना पाठवण्यात आले आहे.
१. इतिहास आणि निसर्गप्रेमी श्री. राम यादव यांनी सांगितले की, हा नियोजित रस्ता सुमारे १० किलोमीटर दाट जंगलातून जातो. या जंगलात वाघ, अस्वले, जंगली कुत्रे, ‘जायंट स्किवरल’ (महाराष्ट्राचा राज्यप्राणी), हिरवे साप, गेको नावाची जंगली पाल असे प्राणी आढळतात. यांपैकी गेको या पालीच्या जातीला ‘निमास्पिसीज रांगनाइसिस’ असे नाव देण्यात आले आहे. या भागात ‘सह्याद्री वाईन स्नेक’ नावाची सापाची एक दुर्मिळ जात आढळून येते. या भागात काही देवराई, पाटगाव धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि दुर्मिळ वनस्पती आहेत.
२. इतिहासकार श्री. इंद्रजीत सावंत यांनी सांगितले की, या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांनी भेट दिली होती आणि त्याचे नाव प्रसिद्धगड असे ठेवले होते. पुढे महाराणी ताराबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे या गडावर पुष्कळ काळ वास्तव्य होते. आजही येथे छत्रपतींचा राजवाडा आणि राजदरबार या वास्तू अस्तित्वात आहेत.
३. शिवदुर्ग आंदोलन समितीचे कार्यकर्ते श्री. हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘शासनाने हा प्रकल्प पुढे रेटल्यास परिसरातील इतिहास आणि पर्यावरण प्रेमींच्या वतीने एक व्यापक लोकचळवळ उभी करून त्याला विरोध केला जाईल.’’
(संदर्भ – टाईम्स ऑफ इंडिया)