सातारा येथे क्षत्रिय राजवंश राजपूत समाजाच्या वतीने क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांची ४८३ वी जयंती उत्साहात साजरी !
सातारा, २३ मे (वार्ता.) – येथील राधिका रस्त्यावरील क्रांतीसूर्य महाराणा प्रताप चौक येथे क्षत्रिय राजवंश राजपूत समाजाच्या ‘क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती’च्या वतीने क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांची ४८३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तसेच या वेळी मनोगतही व्यक्त केले. क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी राजपूत समाजाच्या वतीने सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिराला राजपूत समाजातील युवकांकडून उदंड प्रतिसाद लाभला. सायंकाळी रणरागिणी ढोल-ताशा पथकाच्या वतीने क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यासमोर पारंपरिक वादन करण्यात आले.
कार्यक्रमाला क्षत्रिय राजवंश क्रांतीसूर्य महाराणा प्रताप राजपूत समाजाचे सर्वश्री वीरसिंह परदेशी, अवधूतसिंह परदेशी, राजेंद्र परदेशी, सुबोध परदेशी, संजयसिंह राजपूत, मुकुंद परदेशी, हणमंत परदेशी, भुपेंद्र परदेशी, विकी परदेशी, विरेंद्र परदेशी, हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यवाह अधिवक्ता दत्ताजी सणस, कार्यकारणी सदस्य उमेशजी गांधी, स्वा. सावरकर विचार मंचचे दुष्यंतराव जगदाळे, विश्व हिंदु परिषदेचे माजी सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे सुरेश पंडित, ‘सनातन प्रभात’चे राहुल कोल्हापुरे, प्रथितयश उद्योजक वसंतशेठ जोशी (हॉटेल चंद्रविलास) आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमस्थळी क्रांतीसूर्य महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुरेश पंडित यांचा श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. |