परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित मंगलमय रथोत्सवाच्या संदर्भात साधिकेला आलेल्या अनुभूती !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. रथोत्सवाच्या पूर्वी आलेल्या अनुभूती
१ अ. रथोत्सवात सहभागी होण्यास प्रथम नकार देणे; परंतु ‘रथोत्सवात परात्पर गुरुदेव आहेत’, असे सूक्ष्मातून दिसल्यावर त्यात सहभागी होण्याचे ठरवणे : ‘मे २०२२ मध्ये झालेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या आधी मला सहसाधिकेने विचारले, ‘‘तू परात्पर गुरु डॉक्टरांच्या रथोत्सवामध्ये सहभागी होऊ शकतेस का ?’’ मी म्हणाले, ‘‘मला शक्य होणार नाही.’’ तेव्हा ‘एवढा वेळ चालणे मला शक्य होणार नाही आणि इतर सेवाही आहेत’, असे मला वाटले होते. मी नकार दिल्यावर माझ्या मनाला बोचणी लागली आणि मी ईश्वराकडे क्षमायाचना केली. तेव्हा मला ‘रथोत्सवात परात्पर गुरुदेव आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले आणि माझ्या मनात तसाच विचारही आला. त्या वेळी मला वाटले, ‘मी रथोत्सवात सहभागी व्हायला पाहिजे’, अशी ईश्वराचीच इच्छा आहे.’ त्यानंतर मी त्वरित त्या साधिकेला भ्रमणभाष करून रथोत्सवात सहभागी होणार असल्याचे सांगितले. तिने विचारले, ‘‘तुला नक्की शक्य होईल ना ?’’ तेव्हा मी म्हटले, ‘‘गुरुदेवच करवून घेणार.’’
१ आ. रथोत्सवाविषयी अभ्यास करतांना आलेल्या अनुभूती
१ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समष्टी रूपाची अनुभूती येऊन भावजागृती होणे : रथोत्सवाच्या आधी अभ्यास करतांना ‘हे काहीतरी मोठे अभूतपूर्व आयोजन आहे’, असे मला वारंवार वाटत होते आणि माझी पुष्कळ भावजागृती होत होती. सर्व साधकांच्या समवेत अभ्यास करतांना मला परात्पर गुरुदेवांच्या समष्टी रूपाची अनुभूती येत होती आणि अनेक वेळा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.
१ आ २. रथोत्सवाचा अभ्यास करतांना मला तेथे देवीदेवतांची उपस्थिती अनुभवायला येत होती.
१ आ ३. ‘देवीदेवता परात्पर गुरुदेवांच्या अवतारी कार्याला संरक्षककवच प्रदान करत आहेत’, असे मला जाणवत होते.
१ आ ४. ‘रथोत्सवाचे आयोजन करणार्या साधकांना देवतांकडून दैवी शक्ती आणि मार्गदर्शन लाभत आहे’, असे मला वाटले.
२. रथोत्सवापूर्वी एक आठवडा पाऊस पडणे, संत आणि साधक यांनी ‘जन्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी प्रार्थना करणे अन् सूर्यनारायण आणि वरुणदेव यांच्या कृपेने रथोत्सवाच्या दिवशी पाऊस थांबणे
रथयात्रेच्या ६ दिवस आधीपासून प्रतिदिन पाऊस पडत होता. सर्व संत आणि साधक ‘जन्मोत्सव निर्विघ्नपणे पार पडू दे’, अशी प्रार्थना करत होते. आदल्या दिवशी, म्हणजे २१.५.२०२२ या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर मोठा पाऊस पडत होता. रात्री माझ्या मनात विचार आला, ‘उद्या जन्मोत्सवात पाऊस मुळीच पडणार नाही; कारण वरुणदेव उद्याचा पाऊस आजच पाडत आहे’ आणि अगदी तसेच घडले. जेव्हा मी सकाळी डोळे उघडले, तेव्हा मला भगवान सूर्यनारायणाचे दर्शन झाले. मी भगवान सूर्यनारायण आणि वरुणदेवता यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘त्यांनी सर्व संत आणि साधक यांची प्रार्थना ऐकली अन् ईश्वरी कार्यात येणारा अडथळा नष्ट केला’, असे मला जाणवले.
३. रथोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती
अ. रथोत्सवाच्या दिवशी सकाळपासूनच मला पुष्कळ उत्साह वाटत होता आणि माझी भावजागृती होत होती. वातावरण अत्यंत चैतन्यमय होते.
आ. रथोत्सवासाठी सिद्ध होतांना ‘आपण ईश्वराच्या दर्शनासाठी सिद्ध होत आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी माझी अंतर्मुखता वाढत होती.
इ. ‘आज जन्मोत्सवासाठी आपल्याला केवळ बाह्यतः सिद्ध व्हायचे नाही, तर आतूनसुद्धा स्वतःला भक्तीभावाच्या अलंकारांनी सजवायचे आहे’, असे मला वाटत होते. त्यामुळे माझा नामजप आपोआप होत होता.
ई. जेव्हा प्रत्यक्ष रथोत्सवाला आरंभ झाला, तेव्हा ‘वातावरणात पुष्कळ पालट होत आहे’, असे मला जाणवले.
उ. ‘जन्मोत्सवाला सर्व देवीदेवता सूक्ष्मातून आणि साधकांच्या रूपात उपस्थित आहेत. दिव्य पुष्पवृष्टी होत आहे आणि सूक्ष्म अन् दिव्य संगीत वाजत आहे’, असे मला वाटले.
ऊ. माझी भावजागृती होऊन मला आनंद आणि शांती यांचीसुद्धा अनुभूती येत होती. ‘भावजागृती, आनंद आणि शांती या तिन्हींची अनुभूती एकाच वेळी येणे’, हे पहिल्यांदाच घडत आहे’, असे मला जाणवले.
ए. रथोत्सवातील भगवे ध्वज पाहून ‘सूक्ष्मातून हिंदु राष्ट्राची स्थापना झाली आहे आणि आता केवळ स्थुलातून कृती करायचे शेष आहे’, असे मला वाटले.
ऐ. रथोत्सवात पायी चालतांना माझ्या पायांना लहानसे खडे टोचत होते. त्या वेळी होणार्या वेदनांतूनही मला पुष्कळ आनंद होत होता.
ओ. ‘ही रथयात्रा कधी संपूच नये. आम्हाला असेच आमच्या गुरूंच्या मागे मागे चालत रहायचे आहे’, असे मला वाटत होते.
औ. तिन्ही गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) एकत्र दर्शन झाल्यामुळे ‘त्यांनी आमची सत्शक्ति, चित्शक्ति आणि आत्मशक्ती जागृत करून आमचे हृदय त्यांच्या आशीर्वादरूपी प्रेमाने भरून टाकले आहे’, असे मला वाटले.
अं. त्याच वेळी मला आपले सर्वस्व तिन्ही गुरूंच्या चरणी समर्पित करण्याची इच्छा होत होती. ‘आम्हाला केवळ गुरुचरणांची भक्ती पाहिजे’, अशी माझ्याकडून प्रार्थना होत होती.
‘गुरुदेवांनी जीवनात एवढी दुर्लभ संधी दिली’, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. ‘हे गुरुदेवा, ‘आम्हा सर्व साधकांना सदैव आपल्या चरणी स्थान द्यावे आणि गुरुचरणांची भक्ती करता यावी’, अशी आपल्या श्री चरणी पुनःपुन्हा प्रार्थना आहे.’
– सुश्री (कु.) संगीता भगवंत कुमार मेनराय, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |