पंढरपूर मंदिर आणि अक्कलकोट तीर्थक्षेत्र यांच्या विकास आराखड्याला शासनाकडून मान्यता !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत २३ मे या दिवशी राज्य शिखर समितीची बैठक मंत्रालयात झाली. या बैठकीमध्ये ७३ कोटी ८० लाख रुपयांचा पंढरपूर मंदिर विकास आराखडा आणि ३६८ कोटी रुपयांचा अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा संमत करण्यात आला.
या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांसह काही आमदार उपस्थित होते.
देवस्थानांमधील गर्दी न्यून करण्यासाठी डिजीटल मॅपिंग करण्यात येणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्यातील जी मंदिरे आणि देवस्थाने यांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते त्यांचे ‘डिजिटल मॅपिंग’ करण्यात यावे. जेणेकरून भाविकांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे शक्य होईल. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील सर्व रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी. रस्त्यावर एकही खड्डा दिसता कामा नये. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरविकास विभागाने तातडीने १० कोटी रुपयांचा निधी पंढरपूर नगर परिषदेस वितरीत करावा. वारकरी केंद्रबिंदू ठेवून पंढरपूर मंदिर विकास आराखड्यावर कार्यवाही व्हावी. मंदिराचे प्राचीन वैभव कायम ठेवत भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा यांची सांगड घालावी, असे आवाहन या वेळी एकनाथ शिंदे यांनी केले. पंढरपूर मंदिर विकास आराखड्यात
या कामांचा समावेश !
पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंढरपूर मंदिर विकास आराखड्याचे या वेळी सादरीकरण केले. यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा, गर्दी व्यवस्थापन, पर्यटक सुविधा नियोजन करण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धन कामांमध्ये अनियोजित अनावश्यक जोडण्या काढणे, पाणी गळती रोखणे, दगडी बांधकाम आवश्यकतेनुसार दुरुस्त करणे, मंदिर परिसरातील दीपमाळांची पुनर्बांधणी करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या कामांचा समावेश !
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास कामांच्या आराखड्यामध्ये वाहनतळ, रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक त्या भूसंपादन या कामांना संमती देण्यात आली. प्रस्तावित आराखड्यामध्ये वाहनतळ, वॉटर ए.टी.एम्., रस्ते विकास, शौचालय निर्मिती, हत्ती तलाव उद्यानांचा विकास, व्यापारी केंद्र, भक्त निवास, चौक सुशोभीकरण या कामांचा समावेश आहे.