#Exclusive : हिंदु समाज क्षुद्र राजकारणात विभागला जाऊ नये, यासाठी हिंदूंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण अंगीकारणे महत्त्वाचे ! – विद्याचरण पुरंदरे, इतिहास अभ्यासक, पुणे
२८ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या असलेल्या १४० व्या जयंतीनिमित्त विशेष वृत्तमालिका !
शतपैलू सावरकर
२१ ते २८ मे या कालावधीत सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘विचार जागरण सप्ताह’ चालू आहे. यास्तव ‘शतपैलू सावरकर’ ही वृत्तमालिका चालू केली आहे. या माध्यमातून सावरकरांच्या जीवनप्रवासातील विविधांगी पैलू उलगडण्यास, तसेच युवा पिढीमध्ये जाज्वल्य राष्ट्राभिमान निर्माण होण्यास साहाय्य होईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीच्या निमित्ताने दैनिक ‘सनातन प्रभात’कडून हा छोटासा अभियानरूपी प्रयत्न !
पुणे, २३ मे (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या शेवटच्या दिवसातील एक प्रसंग आहे. त्यांना कुणीतरी ‘या देशाने तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी लक्षात ठेवावे ?’, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा अनेक गुण आणि पराक्रम यांचा समुच्चय असलेले सावरकर उत्तरले, ‘‘मला या देशाने ‘हिंदूसंघटक’ म्हणून लक्षात ठेवावे, अशी माझी इच्छा आहे !’’ हे वाक्य आजच्या काळाला अनुसरून असून ते मला अत्यंत महत्त्वाचे वाटते.
दुर्दैवाने आजचा हिंदु समाज जाती-पाती आणि क्षुद्र राजकारण यांत विभागला गेला आहे. त्यामुळे लोकशाहीत अपेक्षित असलेले राजकीय बहुमत मिळवणे हिंदु समाजाला कठीण होत आहे. याचे दूरगामी परिणाम संपूर्ण राष्ट्राला भोगावे लागू नयेत, यासाठी सावरकरांमधील ‘हिंदूसंघटक’ हा गुण हिंदु समाजाने अंगीकारणे मला महत्त्वाचे वाटते. ‘हिंदूसंघटक’ या संज्ञेला जातीपातींचा उच्छाद आणि सकल हिंदु समाजाचे संरक्षण हे २ महत्त्वाचे पैलू आहेत, असे मत प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि ‘इतिहास संस्कृती कट्टा’चे कार्यकर्ते श्री. विद्याचरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आजच्या हिंदूंसाठी कसे उपयुक्त आहेत ?’ असा प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने विचारला असता ते बोलत होते.