पथनाट्यातून उलगडले स्वातंत्र्यवीर सावरकांचे शौर्य !

रत्नागिरी – अनेक क्रांतीवीर घडवणारे, अन्यायाविरूद्ध लढणारे, विदेशी कपड्यांची होळी करणारे स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या शौर्याची गाथा पोवाडा आणि पथनाट्यातून उलगडली. भारतमातेच्या या महान क्रांतीवीराचा अवमान करू नये, अशी विनंती या वेळी करण्यात आली. भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य लक्ष्मीचौक आणि मंगळवार आठवडा बाजार येथे सादर केले. या पथनाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पथनाट्य आणि पोवाडा सादरीकरणामध्ये शाहीर मयुरेश आगरे, ढोलकी वादक दर्शन शिंदे, वीर सावरकर अथर्व राडये आणि जनरल बॅरीच्या भूमिकेत मीत भोवड यांनी भूमिका बजावल्या. कोरसमध्ये अन्य कलाकार सहभागी झाले.

लक्ष्मीचौक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला उद्योजक गौरांग आगाशे, संयोजक रवींद्र भोवड, नानू सावंत, राजेंद्र फाळके, केशव भट, तनया शिवलकर आणि  विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. अविनाश रायकर यांनी श्रीफळ वाढवले. त्यानंतर पथनाट्याला प्रारंभ करण्यात आला. या वेळी ‘वीर सावरकरांचा विजय असो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘भारत माता की जय’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.